Next
काश्मीर शैवमत
शैव संप्रदायातील महत्त्वाची शाखा आणि त्यातील सिद्धांत
BOI
Sunday, July 21, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

ऋग्वेदात रुद्रदेवतेचे स्तवन आहे. त्या काळापासून शंकराला उत्पत्ती आणि विनाश करणारा सर्वश्रेष्ठ देव मानण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यालाच शैवमत असे म्हणतात. भारतात शैवमताचे अनेक उपपंथ आहेत. काश्मीर शैवमत ही त्यातीलच एक प्रसिद्ध परंपरा आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत काश्मीर शैवमताबद्दल... 
..........
ऋग्वेदात रुद्रदेवतेचे स्तवन आहे. त्या काळापासून शंकराला उत्पत्ती आणि विनाश करणारा सर्वश्रेष्ठ देव मानण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यालाच शैवमत (Shaivism) असे म्हणतात आणि त्याचे पालन (पूजन) करणारे लोक हेच शैव.  (जसे विष्णूला श्रेष्ठ मानणारे वैष्णव). भारतात शैवमताचे अनेक उपपंथ आहेत. काश्मीर शैवमत (Kashmir Shaivism) ही त्यातीलच एक प्रसिद्ध परंपरा आहे. सिंधु संस्कृतीचे लोक शिवाचे उपासक होते, याचे पुरावे उत्खननात मिळतात. आग्नेय आशियात, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम तसेच नेपाळ आणि श्रीलंका येथे शैवमताचा प्रसार होऊन शिवाची अनेक मंदिरे तिथे स्थापन झाली. स्वत:चा शोध अर्थात आत्मज्ञानप्राप्ती हेच शैव सिद्धांताचे लक्ष्य आहे. शैवमत मांडणारे हजारो ग्रंथ देश-विदेशात उपलब्ध आहेत.

शब्दश: शिव म्हणजे प्रेमळ, मित्रत्व असलेला, उदार आणि पवित्र. वैदिक साहित्यात अनेक देवतांना ‘शिव’ अशी उपमा दिलेली आहे. शैवमत हा हिंदू तत्त्वज्ञानाचाच एक अविभाज्य भाग आहे. भगवद्गीतेच्याही पूर्वी निर्माण झालेल्या श्वेजताश्वदतर उपनिषदात या मतप्रवाहाचा उगम आढळतो. तपस्वी जीवन आणि योगाचे आचरण हे त्याचे मध्यवर्ती सूत्र आहे. प्राचीन काळात शिवाला पशुपती या नावानेही ओळखले जाई. शिवपुराण, लिंगपुराण आणि काही ब्राह्मण ग्रंथांत शंकराचेच महात्म्य वर्णिलेले आहे. पाशुपत, लकुलीश, तांत्रिक शैव आणि कापालिक हे शैवांचेच चार विभाग आहेत. दक्षिण भारतात शैवमताचा प्रभाव दीर्घ काळापासून अस्तित्वात आहे. लाखो हिंदू मंदिरांमध्ये प्रामुख्याने शंकर हीच मुख्य देवता आहे. शिवलिंग हे शंकराचेच प्रतीक आहे आणि तेच गावोगाव बघावयास मिळते. शिव आणि शक्ती या एकमेकांना पूरक अशा देवता आहेत; किंबहुना ते अविभाज्य असे अंगच आहे. तांत्रिक लोक त्यांचीच उपासना करतात.

‘काश्मीर शैवमत’ हे मोक्षप्राप्ती किंवा जीवनमुक्तीचे विवेचन करते. त्याच्या प्राप्तीचे विविध मार्गही सविस्तर सांगते. त्याची प्राचीन परंपरा अद्वैत तत्त्वज्ञानच सांगते. भगवान शंकराच्या ९२ तंत्रांचा त्यात समावेश आहे. त्यातच शिव, रुद्र आणि शिव तंत्रे आहेत. शिव, शक्ती आणि जीव ही तीन मूलतत्त्वे आहेत. शिव हा उत्पत्ती करणारा, शक्ती म्हणजे त्याची ताकद, ज्यायोगे उत्पत्ती होते आणि जीव म्हणजे मर्यादित सामर्थ्य असलेली व्यक्ती (परमात्मा ते जीवात्मा). त्यांचेच परा (सर्वोच्च), परापरा (माध्यम किंवा दोन्ही जोडणारी) आणि अपरा (कनिष्ठ) शक्ती म्हणतात. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कृतीशक्ती, किंवा जाणणारा, जाणणे आणि ज्ञेय (जाणण्यायोग्य) हे त्यांचेच समानार्थी शब्द आहेत. (ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान). अध्यात्माचे उद्दिष्ट आहे, जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्ती (मोक्ष). शिव हाच परमात्मा, त्याची प्राप्ती हेच मानवाचे उद्दिष्ट! वास्तविक जीव आणि शिव यांच्यात भेद नाहीच. जीव-जगत् हा शिवाचाच आविष्कार. ते जाणणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती. त्यानंतर साध्य करण्याजोगे वेगळे काही उरतच नाही.

अद्वैत तत्त्वज्ञान सांगते, की सारे जग भासमय आहे, अस्तित्वातच नाही. तो मायेचा प्रभाव आहे. काश्मीर शैवमत असे मानते, की शिवाचे साक्षात् अस्तित्व हेच सत्य आहे. मग त्याच्यातून निर्माण होणारे जग असत्य (भासमय) कसे असू शकेल? तेसुद्धा अद्वैतच आहे. निर्मात्याइतकीच त्याची निर्मितीही सत्यच आहे. अखंड सावधानतेने आपण जीवनातील आवश्यक व्यवहार केल्यास शिवाचे विस्मरण होत नाही आणि त्याचा अंश म्हणून राहणे शक्य होते. द्वैत आणि अद्वैताचा तो अपूर्व संगम आहे. म्हणजे अद्वैतच!

शंकराने हे सर्व बाह्य जगत का निर्माण केले, तर केवळ स्वत:ची ओळख (स्वरूप) पटवून घेण्यासाठी (जगाला पटवून देण्यासाठी). विश्वि हेच शिवाला जाणून घेण्याचे साधन आहे. विश्वा चा त्याग करून तो कोणालाही कळणार नाही. विश्वाघच्या संपूर्ण आविष्काराची दैवी जाणीव हेच शिवाचे स्वरूप होय. ती नसेल तर शिव हा स्वत:सुद्धा अज्ञानी असतो. स्वत:विषयी ज्ञान मिळविण्यासाठी त्यानेच हे जगतरूपी नाट्य निर्माण केले आहे. निमेष (दैवी जाणीव काढून घेणे) आणि उन्मेष (दैवी जाणीवेचा विश्वहविस्तार) या दोन्ही गोष्टी शिवामध्ये एकाच वेळी अंतर्भूत आहेत. ‘स्वत:ला विसरून जाणे आणि पुन्हा स्वत:ची ओळख पटवून घेणे,’ हाच शिवाचा खेळ आहे. हेच काश्मीर शैवमताचे सार आहे. स्वत:ला झाकून घेणे हीच माया किंवा अज्ञान. अज्ञान म्हणजे शिवाबद्दल अपुरे ज्ञान. तोच बंध! आणि एकदा पूर्ण ज्ञान झाले की तो मोक्षच!

मर्यादित जाणिवेचे रूपांतर विश्वचसंचारी जाणिवेत होण्यासाठी तीन उपाय (साधने) सांगितले आहेत. त्यातील पहिला, सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे ‘शांभवोपाय.’ दहाव्या शतकातील काश्मिरी पंडित, आचार्य अभिनव गुप्त त्याची व्याख्या काय करतात? ज्ञानोत्सुक (मुमुक्षु) व्यक्ती निर्विचारी झाली, की गुरूच्या (शिवाच्या) कृपेने ‘त्या’ पदाला प्राप्त करते. त्यासाठी ध्यान, धारणा, मंत्र या कशाचीही आवश्यकता नसते. हे साधन साक्षात शिवाशी जोडलेले आहे.

दुसरा उपाय म्हणजे ‘शाक्तोपाय’ जो शक्तीशी संबंधित आहे. एकाग्रता करून त्या सर्वोच्च पदाचे ध्यान करणे हा त्याचा मार्ग आहे. एक विचार जिथे संपतो आणि दुसरा सुरू होतो, त्यामध्ये क्षणिक का होईना खंड (अंतर) असतो. तेच शिवाचे (निर्विकल्प समाधीचे) स्थान आहे. तो कालावधी वाढवणे, हेच साधकाच्या दृष्टीने आवश्यक आहे.

तिसरा उपाय आहे, ‘आनवोपाय’, जो सगळ्यात कमी दर्जाचा मानला जातो. त्यात साधक एखाद्या मूर्तीवर, शरीराच्या भागावर लक्ष केंद्रित करून मंत्रोच्च्चार किंवा जपजाप्य करतो; श्वागसावर नियंत्रण ठेवतो. ही साधना व्यक्तिकेंद्रित आणि साधकाच्या क्षमतेवर (मर्यादित जाणीव शक्तीवर) अवलंबून असल्यामुळे क्षुद्र - कमी प्रतीची - मानली जाते. योग्याने, साधकाने ते सर्वोच्च स्थान प्राप्त केले की त्याला ‘शांभवी स्थिती’ म्हणतात. ‘काश्मिरी शैवमता’प्रमाणे लक्ष्य - प्राप्तीचे इतरही अनेक उपाय आहेत. जो उपाय योग्य, सहजसाध्य आणि आपल्या क्षमतेमध्ये बसेल तोच निवडावा. कोणताही उपाय असला तरी, कमी-जास्त कालावधीने तो साधकाला एकाच ‘स्थानी’ नेऊन पोहोचवतो.

आचार्य अभिनवगुप्तांच्या सांगण्याप्रमाणे इच्छा, ज्ञान आणि कृती यांच्याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त झाले, की मोक्ष मिळतो. अंधाराचा अभाव हाच प्रकाश, तसेच अज्ञानाचा अभाव हाच मोक्ष. तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ होऊन जातात. पिंड-ब्रह्मांडाचे ऐक्य होते. साधकाचे स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही. सर्वत्र त्याला ‘शिव’दर्शन घडते. तो साक्षात ‘शिव’रूप होतो. ते अनुसंधान अखंड राहिले पाहिजे, म्हणजे योगी ‘जगदानंदा’त अखंड डुंबत राहतो.

कोणत्याही विषयात केवळ शाब्दिक ज्ञान उपयोगी नाही. ते अंगात मुरले पाहिजे, भिनले पाहिजे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली पाहिजे. विशेषत: तत्त्वज्ञानाच्या प्रांतात ते आवश्यक आहे. ‘काश्मिरी शैवमता’वर शेकडो ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करणे अवघड वाटू शकते. तथापि, गुरूच्या मार्गदर्शनाने, त्याच ग्रंथांचे महत्त्वाचे संदर्भ बघितल्यास त्याचे ‘सार’ काढता येते. तसाच अल्प प्रयत्न येथे केलेला आहे. तो ‘शिवा’र्पण!

आचार्य अभिनवगुप्त 
काश्मीरमधील आचार्य अभिनवगुप्त हे तत्त्वज्ञ, सौंदर्यवादी, साहित्यशास्त्री आणि गूढ तांत्रिक होते. काव्य, संगीत, नाटक, वेदान्त, तर्कशास्त्र, वेदविद्या या विषयांतही ते तज्ज्ञ होते (जन्म इ. स. ९५० आणि मृत्यू १०१६). तंत्रलोक, तंत्रसार, रससिद्धांत, परमार्थसार, ईश्व्र प्रत्याभिज्ञा हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. या दार्शनिकाने ‘काश्मीर शैवमत’ या विषयावर मौलिक लेखन केले.

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search