Next
कर्तृत्ववान महाराणी गायत्रीदेवी
BOI
Saturday, October 13, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

महाराणी गायत्रीदेवी (Photo : Wikidata)अत्यंत सुंदर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कर्तृत्व यांचा मिलाफ महाराणी गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या चारचाकी गाड्या चालवण्यापासून पोलो खेळापर्यंत आणि शिकारीपासून घोडेस्वारीपर्यंत असे त्यांचे वैविध्यपूर्ण छंद होते. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर महाराणी हे बिरुद मिरवून आरामदायी जगणे शक्य असतानाही त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन लोकसेवा केली. ‘नवरत्ने’ मालिकेत आज ओळख महाराणी गायत्रीदेवींची...
............
अत्यंत देखणी, रुबाबदार, आखीव-रेखीव, तेजःपुंज, विलोभनीय, हरिणाक्षी अशा अगणित उपमांनी जिच्या सौंदर्याचे वर्णन केले गेले, ती जयपूर घराण्याची महाराणी गायत्रीदेवी ही सुंदर तर होतीच, अगदी जगातल्या पहिल्या १० सौंदर्यवतींमध्ये तिचे नाव होते, इतकी सुंदर; पण जोडीला तितकेच प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वही तिच्याकडे होते.  

गायत्रीदेवी म्हणजे एका राजघराण्यातून दुसऱ्या राजघराण्यात आलेली आणि लाडकी राजकन्या म्हणून वाढलेली आणि नंतर राणी किंवा राजमाता झालेली स्त्री. (जन्म : २३ मे १९१९, लंडन). गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आपल्या पूर्वायुष्यात त्या उत्तम प्रकारे पोलो खेळत. तसेच त्यांना शिकारीचाही छंद होता. त्या एक ख्यातनाम नेमबाजही होत्या. घोडेस्वारीची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे ते कौशल्यही वादातीत होते. वेगवेगळ्या पद्धतीच्या चारचाकी गाड्या चालवण्याचीही त्यांना आवड होती. मर्सिडीझ बेंझ कंपनीची गाडी भारतात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच मागवली होती. रोल्स रॉइसच्या गाड्यांची वेगवेगळी मॉडेल्स खरेदी करणे, हीसुद्धा त्यांची एक आवड होती. त्यांचे स्वतःचे असे एक छोटे विमानही होते. (बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) हे गायत्रीदेवींच्या आईचे वडील.) 

राजमाता किंवा महाराणी हे बिरुद मिरवत उर्वरित आयुष्य आरामदायी घालवणे सहज शक्य असताना, सर्व संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण झाल्यानंतर गायत्रीदेवींनी राजकारणात भाग घेतला. त्यांची ती कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली. आपल्या आयुष्यातल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्या विक्रमी मतांनी विजयी तर झाल्याच; शिवाय त्याची नोंद ‘गिनीज बुक’मध्येही करण्यात आली. याच ठिकाणाहून त्या त्यांच्या स्वतंत्रता पक्षाच्या तिकिटावर तीन वेळा विजयी झाल्या आणि त्यांनी १५ वर्षं यशस्वी कारभार केला. पुढे त्यांचे पती सवाई मानसिंह (द्वितीय) यांची काँग्रेस सरकारतर्फे स्पेन येथे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी गायत्रीदेवींना काँग्रेस पक्षात येण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून गायात्रीदेवींनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. १९६७ साली त्या पुन्हा एकदा जनसंघाशी युतीत असलेल्या आपल्या स्वतंत्रता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि जिंकल्यासुद्धा. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला. 

आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत संपन्न आणि आरामाचे आयुष्य व्यतीत केलेल्या गायत्रीदेवींना ‘शांतिनिकेतन’सारख्या पवित्र आणि समृद्ध गुरुकुलात शिक्षण मिळाले. त्याव्यतिरिक्त त्यांनी आधी लंडन, स्वित्झर्लंड आणि पुन्हा लंडन येथे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते. घेतलेल्या शिक्षणाचा, केलेल्या अभ्यासाचा त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. पुढे त्यांनी जयपूर येथे मुलींसाठी निवासी शाळाही सुरू केली. 

वयाची पन्नाशी पार केल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी त्यांच्या आवडीनिवडी आणि आयुष्यातील धाग्यादोऱ्यांची सांगड घालून काही पुस्तकं लिहिली. ‘ए प्रिन्सेस रिमेंबर्स’ नावाने त्यांचे आत्मचरित्र आहे. तसेच राजघराण्यातील खाद्यपदार्थ आणि त्यांच्या आठवणींबद्दलचे ‘Gourmet's Gateway : A Royal Collection’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. फ्रँकोइस लेवी या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘Memoirs of Hindu Princess’ हा चित्रपट गायत्रीदेवींच्या आयुष्यावर बेतलेला होता.  

अत्यंत गंभीर आजारावर उपचारांसाठी परदेशी गेलेल्या असताना त्यांनी परत आपल्या गावी, जयपूरला येण्याची इच्छा व्यक्त केली आणि वयाच्या ९०व्या वर्षी (२९ जुलै २००९ रोजी) जयपूर येथे त्यांचे निधन झाले. 

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search