मुंबई : ‘डोंबिवली फास्ट’मधून अभिनेता संदीप कुलकर्णीने रंगवलेला मुंबईतील सामान्य माणसाचा चेहरा लक्षात राहणारा ठरला. अशाच एका भूमिकेत ‘डोंबिवली रिटर्न - जे जातं.. तेच परत येतं?’ या आगामी चित्रपटातून संदीप पुन्हा आपल्यासमोर येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला असून संदीप या चित्रपटात अनंत वेलणकर या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबईतील सामान्य माणसाचे आयुष्य म्हटले, की डोळ्यासमोर येते ती प्रचंड गर्दी, लोकलचे रुळ, सततची धावपळ, रोज नव्या समस्या आणि मनात सुरू असलेला कोलाहल. ‘डोंबिवली रिटर्न – जे जातं.. तेच परत येतं?’ या चित्रपटातून मुंबईतील सामान्य माणसाचे हे आयुष्य जिवंतपणे उभे केले आहे. अनंत वेलणकर आणि त्याचे कुटुंब, त्यांचा संघर्ष हे सगळे पाहताना आपलेच आयुष्य पाहतोय असा भास होतो. चित्रपटाच्या टीझरने आवश्यक तो परिणाम साधला आहे. अतिशय लक्षवेधी पद्धतीने ते मांडण्यात आले आहे. यावरून अर्थात चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
कंरबोला क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांनी केले आहे. करंबोला क्रिएशन्स संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. याबरोबरच हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदी कलाकार चित्रपटात आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.