Next
कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू
महाराष्ट्राला नऊ राष्ट्रीय पुरस्कार
BOI
Monday, November 26, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this story

कांचनमाला पांडेनवी दिल्ली : राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारांमध्ये नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली असून, नाशिकचा स्वयं पाटील देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालक पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुण्यातील मॉडर्न कॉलेज दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. संपूर्ण देशातून महाराष्ट्रातील या दोन संस्थाची निवड झाली आहे. राज्यातील सहा व्यक्ती आणि तीन संस्थांना हे पुरस्कार पटकावले असून, राष्ट्रपतींच्या हस्ते जागतिक अपंगदिनी तीन डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने जागतिक अपंगदिनानिमित्त देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार २०१८’साठी विविध १४ श्रेणींमध्ये देशातील एकूण ६९ व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. तीन डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

कांचनमाला पांडेच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल
नागपूरच्या कांचनमाला पांडे हिने मेक्सिको येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप -२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तिचा सत्कार केला होता व १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. शासनाने तिला जलतरण प्रशिक्षक म्हणून नोकरीही देऊ केली आहे. क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाची दखल घेऊन तिला सर्वोत्कृष्ट महिला दिव्यांग क्रीडापटूचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

जन्मांध असणाऱ्या कांचनमालाने हे जग बघितले नाही; मात्र जगाला तिच्या कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. मुळ अमरावतीची असलेल्या कांचनमालाने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरविले. जवळपास दहापेक्षा अधिकवेळा आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले. अंधांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये तिने जवळपास शंभराहून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. दहावी व बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कांचनामालाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असतानाच बँकींगच्या परीक्षांची तयारी केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन, गेल्या तीन वर्षांपासून ती बँकेच्या नागपूर शाखेत सहायक पदावर कार्यरत आहे.

स्वयं पाटील
जन्मत:च डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटीलच्या हृदयाला छिद्र  होते. यातून बरा होत असतानाच त्याच्यावर कानाशी संबंधित तीन शस्त्रक्रिया झाल्या. त्याच्या आई -वडिलांनी खचून न जाता त्याला धीर देत सांभाळ केला. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिर येथे आता स्वयं सामान्य मुलांच्या शाळेत पाचव्या वर्गात शिकतो. त्याने गेट वे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे पाच कि.मी.चे समुद्रातील अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करून, जलतरणात ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ स्थापित केला आहे. अपंगत्वावर मात करून, स्वयं सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेत आहे, तो उत्तम नृत्य करतो. विविध स्पर्धांमध्ये त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याने मॉडेलिंगही केले असून, ‘डीकॅथलॉन’ या नामांकित कंपनीसह नाशिकच्या ‘अशोका रिसॉर्ट’साठी जाहीरात केली आहे. स्वयंच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सृजनशील बालकाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे येथील दृष्टीहीन भूषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेल पुरस्कार, तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचाऱ्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी, मुंबईतील बोरीवलीचे योगेश दुबे यांना दिव्यांगाच्या उत्थानासाठी करत असलेल्या कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थाची निवड झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ, तर खासगी क्षेत्रात पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. मुंबईतील नॅब एम्प्लॉयमेंट या संस्थेला दिव्यांगासाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link