Next
शिर्डी संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
डॉ. हावरे; जानेवारी २०१६पासूनची फरकाची रक्कम रोख मिळणार
प्रेस रिलीज
Saturday, July 06, 2019 | 02:51 PM
15 0 0
Share this article:

शिर्डी : श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्यवस्‍था, शिर्डीच्‍या कर्मचाऱ्यांना राज्‍य शासनाने लागू केलेला सातवा वेतन आयोग एक जानेवारी २०१६पासून लागू करण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला असून, फरकाची रक्‍कम कर्मचाऱ्यांना रोखीने देण्‍यात येऊन चालू महिन्‍यापासून सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्‍याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त अॅड. मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्‍हे, राजा बली सिंग, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा अर्चना कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, सूर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी व उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते.

डॉ. हावरे म्‍हणाले, ‘संस्‍थानच्‍या आस्‍थापनेवर असलेल्‍या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्‍याचा प्रस्‍ताव शासनाकडे पा‍ठविण्‍यात आला होता. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांची स्‍वाक्षरी झाली आहे. त्‍यावर शासनाकडून आज (पाच जुलै) पत्र प्राप्‍त झाले असून, याबाबत संस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीने निर्णय घ्‍यावा असे कळविलेले आहे. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या कायम कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्‍याचा निर्णय ५ जुलैला घेण्‍यात आला आहे. फरकाची रक्‍कम रोखीने देण्‍यात येणार असून, चालू महिन्‍याच्‍या वेतनापासून यांची कार्यवाही सुरू करण्‍यात येईल. या निर्णयामुळे फरकाच्‍या रक्‍कमेपोटी ३७ कोटी, तर पुढील वर्षासाठी २० कोटी असा ५७ कोटी रुपयाचा अर्थिक भार संस्‍थानवर पडणार असून, याचा लाभ एक हजार ९५० कर्मचाऱ्यांना होणार आहे. याबरोबरच अनुकंपा तत्‍वावर संस्‍थान सेवेत सामावून घेण्‍याबाबत अनेक वेळा मागणी करत असलेल्‍या ६३ कर्मचाऱ्यांना संस्‍थान सेवेत कायम करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून, नर्सिंग कत्रांटी कर्मचाऱ्यांना ४० टक्‍के पगारवाढ देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आलेला आहे.’

‘राज्य शासनाने ३३ कोटी वृक्षरोपण करण्‍याचे लक्ष्य ठेवून वनमहोत्‍सव कार्यक्रम राबविला आहे. याचा एक भाग म्‍हणून संस्‍थानने वृक्षरोपण कार्यक्रमाला प्रारंभ केला असून, पाच जुलैला २०० झाडे लावली आहे. अजून तीन हजार वृक्ष या कालावधीत लावले जातील. या बरोबरच वृक्षलागवड वाढवावी म्‍हणून काही सामाजिक संस्‍थांनी वृक्षांची मागणी केली, तर संस्‍थानतर्फे विनामूल्य रोपे देण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे,’ अशी माहिती डॉ. हावरे यांनी दिली. 

डॉ. सुरेश हावरे‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते चार प्रकल्‍पांचे भुमिपूजन झाले होते. त्‍यापैकी १११ कोटी रुपये खर्च करून उभारण्‍यात येणाऱ्या दर्शनरांगेचे काम प्रगतीपथावर असून, येत्‍या एक वर्षात ते पूर्ण होईल. दर्शनरांगेच्या मुख्‍य इमारतीचे बांधकाम क्षेत्र २० हजार ८२ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्‍ये तीन भव्‍य प्रवेश हॉल असून, यात मोबाइल व चप्‍पल लॉकर्स, बायोमेट्रीक पास काउंटर, सशुल्‍क पास काउंटर, लाडू विक्री काउंडर, उदी व कापडकोठी काउंटर, बुक स्‍टॉल, डोनेशन ऑफिस, चहा-कॉफी काउंटर, महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छता गृहे, उदवाहक, आरओ प्रक्रियेद्वारे शुद्ध पिण्‍याचे पाणी, वायुविजन व्‍यवस्‍था, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने फायर फायटिंग यंत्रणा व सिक्‍युरिटी चेक आदी व्‍यवस्‍था असेल. या इमारतीत एकूण १२ हॉल असतील. हे सर्व हॉल मिळून सुमारे १८ हजार साईभक्‍तांची व्‍यवस्‍था होईल. १५८ कोटी रुपये खर्चाचे शैक्षणिक संकुल उभारणी या दुसऱ्या प्रकल्पाचे  काम ही प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या १० मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारणीचे टेंडर प्रक्रिया सुरू आहे; तसेच चौथा प्रकल्‍प साइनॉलेज पार्क बीओटी तत्त्वावर उभारण्‍याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. ध्‍यान मंदिर उभारणीचे काम ही येत्‍या महिन्‍याभरात पूर्ण होईल,’ असे डॉ. हावरे यांनी नमूद केले.

शिर्डी शहर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची जबाबदारी संस्‍थानने घेतली असून, अशी जबाबदारी उचलणारे हे देशातील एकमेव देवस्‍थान असल्याचे; तसेच संस्‍थानतर्फे २० टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्‍प उभारण्‍याची निविदा प्रक्रिया सुरू असल्‍याचे डॉ. हावरे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search