Next
इंग्रजी – राणीची, व्यापाऱ्यांची आणि राजपुत्राची!
BOI
Monday, April 29, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

प्रिन्स चार्ल्सफ्रान्सचा मानबिंदू असलेले नोत्रे-दाम चर्च गेल्या आठवड्यात जळाले, तेव्हा आपल्या या शेजारी देशाला सहानुभूती म्हणून प्रिन्स चार्ल्स यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात अनेक शब्दांची स्पेलिंग अमेरिकी वळणाने लिहिल्याचे हे पत्र जाहीर झाल्यावर लक्षात आले. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला... या घटनेच्या निमित्ताने इंग्रजी भाषेबद्दलची चर्चा करणारा लेख...
............
‘आपल्या देशातील संस्कृती व परंपरा सातासमुद्रापार न्यायच्या असतील, तर आपल्याला उत्तम इंग्रजी येणे आवश्यक आहे. जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषा सर्वाधिक देशांत बोलली जाते. जगातील सर्वाधिक पुस्तके इंग्रजीत छापली जातात. ज्ञानी होण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले पाहिजे. इंग्रजी भाषा येणे ही आता काळाची गरज आहे.’

ही आणि अशी वाक्ये परवचा म्हणावा इतक्या सातत्याने आपल्या कानावर आदळत असतात. सततच बोलल्या-ऐकल्यामुळे आपल्याला ती खरीही वाटतात. त्यांच्या सतत्येबाबत शंका घेण्याची तसदीही आपण घेऊ शकत नाही. त्यात काही तथ्य असेलही; पण इंग्रजी म्हणजे कोणती इंग्रजी? हा प्रश्न नुकताच समोर आला आणि तोही साक्षात ब्रिटनच्या राजपुत्रामुळे! खुद्द इंग्रजांनाही आपल्याच भाषेची माहिती नाही, हेही त्यातून समोर आले आणि भाषा किती प्रवाही असते, हेही त्यातून उघड झाले.

तर झाले असे – गेल्या आठवड्यात फ्रान्सचा मानबिंदू असलेले नोत्रे-दाम चर्च जळाले, तेव्हा आपल्या या शेजारी देशाला सहानुभूती म्हणून प्रिन्स चार्ल्स यांनी एक पत्र लिहिले होते. या पत्रात अनेक शब्दांची स्पेलिंग अमेरिकी वळणाने लिहिल्याचे हे पत्र जाहीर झाल्यावर लक्षात आले. या पत्रात चार्ल्स यांनी वापरलेले agonizing, realize आणि civilization हे शब्द अनेकांना खटकले. कारण हे शब्द ब्रिटिश पद्धतीत agonising, realise आणि civilisaton असे लिहिले जातात.

जग ज्यांना ‘प्रिन्स चार्ल्स’ म्हणून ओळखते, त्यांना इंग्लंडवासीय ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्हणतात. इंग्रजी भाषा आणि या ‘प्रिन्स ऑफ वेल्स’चे राजघराणे हे दोन्ही इंग्लंडचे मानबिंदू समजले जातात. त्यामुळेच जेव्हा या ‘प्रिन्स ऑफ वेल्स’नी आपल्या प्राणप्रिय इंग्रजीची अवहेलना करत कट्टर विरोधी समजल्या जाणाऱ्या इंग्रजीचा आश्रय घेतला तेव्हा इंग्लंडवासीयांमध्ये खळबळ निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे आरोपांची आणि टीकेची एकच राळ उडाली.

चार्ल्स यांची अमेरिकी सून मेगन मार्केल हिने चार्ल्सचा पत्रव्यवहार सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे का, असा सवाल काही जणांनी केला, तर चार्ल्स यांनी इंग्रजीचा खून केल्याची भावना काही जणांनी व्यक्त केली. इतकेच नाही, तर इंग्लंडचा भविष्यातील राजा ब्रिटिशच राहायला हवा, असा सूरही काही जणांनी धरला. ‘ब्रिटिश लोकांना उद्देशून सर्व संवाद हा ब्रिटिश इंग्रजीमध्ये असायला हवा. ब्रिटिश राजेशाहीने योग्य ब्रिटिश इंग्रजीचे समर्थन केले पाहिजे,’ असे अनेकांचे म्हणणे होते.

राजघराण्याच्या वतीने या आरोपांना उत्तर देण्यात आले नाही; मात्र राजघराण्यातील काही अधिकाऱ्यांनी राजपुत्राची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. चार्ल्स हे ‘आयएसई’ऐवजी ‘आयझेडई’ असे लिहायला प्राधान्य देतात. त्यांच्या अनेक जुन्या पत्रांमध्ये या धाटणीचे लेखन केलेले समोर आले आहे. आणि त्यांच्या या पद्धतीने लिहिण्याला कारण म्हणजे १५व्या शतकात ब्रिटिश इंग्रजी अशाच पद्धतीने लिहिली जात होती आणि ती तशीच लिहिली जावी, याला चार्ल्स प्राधान्य देतात असे सांगण्यात आले.

प्रिन्स चार्ल्स यांनी लिहिलेले पत्र

‘प्रिन्स चार्ल्स यांचे शब्दलेखन २०१९मध्ये काहीसे असामान्य असेलही, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर आहे,’ असे लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतील भाषाविज्ञान विभागाचे प्राध्यापक डेव्हिड एजर यांनी ‘डेली मेल’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. अगदी ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’सारखी (ओयूपी) नावाजलेली संस्थाही याच स्पेलिंगचा वापर करते; मात्र ओयूपी हे स्पेलिंग केवळ प्राचीन ग्रीक भाषेतून आलेल्या शब्दांसाठी वापरते आणि अन्य शब्दांसाठी मात्र आयएसई वापरते. याच्या उलट अमेरिकी इंग्रजीत सरसकट सर्व शब्दांसाठी हेच स्पेलिंग वापरले जाते. यामुळे या सगळ्याच चर्चेला वेगळे वळण मिळाले आणि प्रिन्स चार्ल्स हे खऱ्या इंग्रजीचे शेवटचे राखणदार आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला.

इंग्रजी ही इंडो-युरोपियन कुटुंबातील जर्मानिक गटाची भाषा. ती मुळात इंग्लंडची भाषा. नंतर ती इंग्रजांच्या वसाहतींमध्ये व त्यांच्या स्वामित्वाखालील प्रदेशांत पसरली. आज ती इंग्लंडबाहेर आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, ऱ्होडेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका, त्याचप्रमाणे जगाच्या इतर काही भागांत बोलली जाते. भारतात अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांची ती राजभाषा आहे. पहिल्या महायुद्धापर्यंत जागतिक व्यवहारात फ्रेंचचे महत्त्व होते. पहिल्या महायुद्धानंतर फ्रेंचचे महत्त्व कमी होऊन ते इंग्रजीकडे गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वच क्षेत्रांत अमेरिकेचे वर्चस्व वाढले. त्यामुळे इंग्रजीवर अमेरिकेचाच अधिकाधिक प्रभाव पडत आहे.

...मात्र खुद्द इंग्लंडमध्ये म्हणजे या भाषेच्या मायभूमीत बोलली जाणारी इंग्रजी आणि इंग्लंडबाहेरच्या जगात बोलली जाणारी इंग्रजी यात कमालीचा फरक आहे. अमेरिकेसारख्या काही देशांत इंग्लिश बोलणाऱ्या लोकांनी, म्हणजे इंग्रजांनी जाऊन वसाहत केली; मात्र तिथे स्पॅनिश आणि जर्मन भाषकांची संख्या आधी जास्त होती. त्यामुळे त्या भाषांचा प्रभाव तेथील इंग्रजीवर पडला आहे. अन्य काही देशांमध्ये मात्र इंग्रजांच्या वसाहतीतील देशांनी आपली मूळ भाषा टाकून देऊन किंवा तिच्यासह इंग्रजीचा अंगीकार केला. उदा. दक्षिण आफ्रिका व भारत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, तसेच भारत व पाकिस्तान हे इंग्रजी भाषकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत; मात्र त्या प्रत्येक देशातील इंग्रजी वेगळी व तिचे स्वरूपही वेगळे. म्हणूनच ब्रिटिश इंग्रजी वगळता इंग्रजीच्या अन्य कोणत्याही स्वरूपाकडे ब्रिटिश लोक तुच्छतेने पाहतात. त्याचमुळे अमेरिकेत ब्रिटिश इंग्रजीबाबत तीव्र आक्षेप घेतला जातो आणि तोच प्रकार ब्रिटनमध्ये अमेरिकी इंग्रजीबाबत दिसतो.

ब्रिटनची इंग्रजी ही राणीची इंग्रजी (क्वीन्स इंग्लिश) समजली जाते, तर अमेरिकेची इंग्रजी ही व्यापाऱ्यांची इंग्रजी!. त्यामुळेच ब्रिटन आणि अमेरिकेत इंग्रजी ही समान भाषा असूनही ती त्यांना सांधणारी नव्हे, तर विभागणारी भाषा ठरली आहे. ख्रिस्तोफर डेव्हिस या लेखकाने याचे सुरेख वर्णन करणारे शीर्षक आपल्या पुस्तकाला दिले आहे – डिव्हायडेड बाय ए कॉमन लँग्वेज (सामाईक भाषेने विभागलेला देश)!

ब्रिटनमध्ये दररोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या चार हजार शब्दांचे अर्थ अमेरिकी इंग्रजीत वेगळेच काही होतात किंवा ते वेगळ्या पद्धतीने वापरतात, असा एक अंदाज आहे. आपल्याकडे हिंदी आणि मराठीच्या बाबतीत असा प्रकार आढळतो. संस्कृतमधून आलेल्या अनेक शब्दांचे अर्थ या दोन भाषांमध्ये वेगळे होतात. उदाहरणार्थ, सर्दी हा आपल्याकडे एक आजार आहे, तर हिंदीत ती ‘थंडी’ बनते. आग्रह हा आपल्याकडे पाठपुराव्यासाठी असतो, तर हिंदीत तो मागणी बनतो. काहीशी अशीच गत सर्व भारतीय भाषांची आहे. शब्द तेच असतात, परंतु त्यांचा अर्थ वेगळा असतो.

कालप्रवाहात आणि लोकव्यवहारात शब्द बदलतात, शब्दांची रूपे बदलतात आणि अर्थही बदलतात. ते अर्थ उघड करण्यासाठी असा एखादा जुनाट रीती पाळणारा राजपुत्र यावा लागतो. त्यामुळे आपल्याच भाषेची आपल्याला नव्याने ओळख होते. ‘राजा कालस्य कारणम्’ म्हणतात ते या अर्थानेही खरे आहे तर!


– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 64 Days ago
English language is more likely to help a person make a living in a large part of the world . That is the litmus taste
0
0
BDGramopadhye About 112 Days ago
purity of a language ? People look upon language as a tool which helps them in life . For them , it does not have to be Pure . What good is something which is of no use in life ?
0
0

Select Language
Share Link
 
Search