Next
बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही...
BOI
Wednesday, July 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग पाहिला. या भागात जाऊ या थोडे उत्तरेकडे... सह्याद्रीच्या पायथ्याच्या कडेने....
............
रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडचा भागही निसर्गसमृद्ध आहे. अष्टविनायकापैकी पाली आणि महड ही तमाम गणेश भक्तांची आवडती श्रद्धास्थाने या भागात आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देणारी ठाणाळे खडसांबळेसारखी अनेक बौद्धलेणीही याच परिसरात आहेत. सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे या भागाचे सौंदर्य खुलवत असतात. जांभळे, करवंदांसारखा रानमेवा, विपुल वन्यजीवसंपदा या भागात आहे. 

श्री बल्लाळेश्वर

पालीचा श्री बल्लाळेश्वर :
अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे, की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. पालीचा गणपती हा अष्टविनायकांच्या परिक्रमेतील आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सूर्य उगवतो, तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणेशाचे कपाळ विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून, ती चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. ठाणाळे व खडसांबळे ही बौद्ध लेणीही याच परिसरात आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. 

श्री बल्लाळेश्वर मंदिर

पौराणिक कथेनुसार, विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख मुद्गल पुराणात आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नावाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नावाचा वैश्यवाणी राहत असे. या कुटुंबात बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासूनच ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्तिमार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे. म्हणून कल्याणशेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने ‘घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन’ अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली, की आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देऊन श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळेमध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. 

पाली खोपोलीपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून १११ किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली-पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीला रस्ता जातो. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे. 

उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंडउन्हेरे : पालीच्या जवळच नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहे. उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रित पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात, असे म्हणतात. येथे तीन कुंडे आहेत. त्यापैकी एकातील पाणी खूपच गरम असते. इतर दोन कुंडातील पाणी सौम्य आहे. त्यामध्ये स्नान करता येते. एक कुंड स्त्रियांसाठी, तर एक पुरुषांसाठी आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात मो. कृ. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. तसेच बापूसाहेब लिमये यांनी महायुद्धात सरकारला मदत करू नये असे आवाहन केल्यामुळे त्यांना शिक्षाही झाली होती. 

उद्धर रामेश्वर : रावणाने जटायूशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले व श्रीरामांनी ज्या ठिकाणी जटायूचा उद्धार केला ते ‘उद्धर’स्थान अशी लोकांची श्रद्धा आहे. रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभू स्थान असून, येथे अस्थी विसर्जनाचे कुंड आहे. येथूनच जवळ रामेश्वर वैभव हे थंड हवेचे ठिकाण आहे. (पाली येथून १४ किलोमीटर)

नेणवली/खडसांबळे लेणी : नेणवली लेण्यांनाच खडसांबळे लेणी असेही म्हणतात. खडसांबळे लेणी नेणवली गावात असल्याने त्यांना नेणवली लेणी असे म्हटले गेले पाहिजे. परंतु ब्रिटिश अभ्यासक खडसांबळे गावातून आल्यामुळे त्यांनी त्याला ते नाव दिले असावे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ही बौद्ध लेणी पालीजवळच आहेत. चौल बंदरावरून नागोठणे खाडीमार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. यांचा शोध रेव्हरंड अॅबटने १८८९ साली लावला. हेन्री कझेन्स यानेही या लेण्यांचे वर्णन केले आहे. ही लेणी इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली असावीत. या काळात सातवाहन राजवट असल्याने त्यांचीच ही निर्मिती असावी असे मानले जाते. ही लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणूनही समजली जातात. इ. स. पूर्व २०० त इ. स. ५००पर्यंत यांची कामे चालली असावीत. या लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्यसेनानी याच लेण्यांत इंग्रजांपासून लपून राहिले होते. याचा अर्थ ही लेणी त्या काळात इंग्रजांना सापडलीच नाहीत, इतक्या अवघड ठिकाणी आहेत. 

खडसांबळे लेणी

येथे ३० ते ४८ इतक्या मोठ्या संख्येने लेणी असावीत, असा संशोधकांचा कयास आहे. लेणी किती होती याबाबतीत अनेक मते आहेत. ही सर्व लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत. हा दगड थोडा ठिसूळ असल्याने लेणी क्षतिग्रस्त झाली आहेत. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. आज ती भग्न असली, तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी योजना आजच्या घडीलाही आश्चर्यकारक आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी अभ्यासकांना माहिती करून घेता येतील. 

साधारण क्रमांक १ ते ९ या लेण्यांमध्ये बरीच पडझड झालेली दिसून येते. एक-दोन ठिकाणी स्तूपांचे अवशेष दिसून येतात. लेण्यांच्या दर्शनी भागात लाकडाचे काम असावे. कारण तशा पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात. 

बरीच लेणी नष्ट झालेली आहेत, भग्नावस्थेत आहेत. बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेले असून, छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे. लेण्यांच्या एका ठिकाणी दोन स्तूपांचे अवशेष सापडतात. भिख्खूंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते. लेणे क्रमांक आठ भव्य असून, प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत दालनाच्या उजव्या बाजूस एक अंतर्दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे. बाह्यदालनाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत. खोल्यांची रचना बघता हे लेणे राहण्यासाठी असल्यासारखे वाटते. या लेण्यात एकूण पाच ओटे आहेत. त्यामुळे येथे किमान पाच भिख्खूंची झोपण्यासाठीची व्यवस्था असावी.

नऊ क्रमांच्या लेण्यात छत शिल्लक असून, मागच्या खोलीत व मागच्या भिंतीच्या बाजूला ओटे शिल्लक आहेत. दहावे लेणे हे विहार लेणे आहे. याला सभागृह किंवा मोठे चैत्यगृह म्हणता येईल. महाराष्ट्रातील मोठ्या आयताकृती आकाराच्या चैत्यगृहात याचा समावेश होतो. या लेण्यांच्या स्तूपाच्या बाजूला एकूण १७ खोल्या आहेत. येथील स्तूप इतर लेण्यांप्रमाणे आपल्याला मध्यभागी दिसत नाही. तो एका कोपऱ्यात दिसतो. त्याच्या बाजूलाच ११ ते २१ क्रमांकाची लेणी आहेत. तीही भग्नावस्थेत आणि पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या मातीने भरलेली आहेत. कड्याच्या पलीकडेही अनेक लेण्यांचा समूह आहे. कडा तुटल्यामुळे त्याचे विभाजन झालेले आहे. तिकडेही विहार संघाराम, तसेच शून्यगृह आहेत. ऐसपैस अशी जागा असणारी, कातळात कोरलेली ही लेणी आहेत. (अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.)

ठाणाळे/नाडसूर लेणी

ठाणाळे /नाडसूर लेणी :
पालीच्या गणपतीजवळ एका निसर्गरम्य ठिकाणी ही बौद्ध लेणी आहेत. तैलबैला ते मांदाड या जुन्या व्यापारी मार्गावर वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम उतरंडीवर ही लेणी एक हजार फूट उंचीवर आहेत. ठाणाळे गावापासून लेण्यांपर्यंत पायवाट आहे. सोबत वाटाड्या हवाच. हा लेणीसमूह सर्वप्रथम मराठी मिशन, मुंबई यांनी इ. स. १८९०मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ. स १८९०मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ. स. १८११मध्ये त्याने ‘Caves at Nadasur and Kharasamla’ ही पुस्तिका प्रकाशित केली. 

ठाणाळे स्तूप

ठाणाळे नाडसूर लेणीखडसांबळे लेणीसमूहापासून ही लेणी अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात तर येथील वातावरण आणि निसर्ग मोहून टाकणारा असतो. डोंगरावरून झेपावणारे प्रपात तुमची नजर खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या हंगामात फुलणारी फुले, जांभळे आणि करवंदांसारखा मेवा येथे उपलब्ध असतो. ठाणाळे येथील लेणीसमूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. येथे २३ लेण्यांचा समूह असून, पॉलिग्राफिक परीक्षणानुसार इसवी सनापूर्वी ५० ते सत्तर दशकात ही लेणी निर्माण केली असावीत. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. पूर्णावस्थेत नसलेल्या चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी या गुंफांचे वर्णन लिहून ठेवले आहे. गुंफा क्रमांक सात सर्व गुंफांमध्ये सर्वांत सुंदर आहे. गुहेच्या संपूर्ण भिंतीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि प्राणी यांच्या आकृतीसह सजावट केली आहे. येथे दोन उल्लेखनीय शिलालेख आहेत. त्यावर दात्यांची नावे दर्शविली आहेत. 

सरसगड : पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी तीन ते चार तास लागतात. गिरीदुर्ग प्रकारातील सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. सरसगड इ. स. १३४६मध्ये मलिक अहमद (निजामशाहीचा संस्थापक) याने ताब्यात घेतला. म्हणजे हा किल्ला त्याअगोदर अस्तित्वात होता. बहुधा कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे शिलाहार राजवटीत याचे बांधकाम झाले असावे (याला संदर्भ नाही.); मात्र शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती. सरसगडाची देखभाल १९४८ सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. . या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसराची टेहळणी करता येते. 

सरसगड

संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रवेशद्वाराची संरक्षणात्मक रचना थक्क करणारी आहे. दरवाज्याच्या आत इंग्रजी ’एल’ आकाराची देवडी बांधलेली आहे. हे दार बंद केले, तर या बाजूने शत्रू काय मुंगीसुद्धा आत येऊ शकणार नाही अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तुंग कातळाच्या भिंतीजवळ एक सुळका आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी अनेक गुहा, तळटाकी असून, त्यात भरपूर पाणी आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरुज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पाली गाव, अंबा नदी, उन्हेऱ्याची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर येथून दिसतो. किल्ला ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे. 

सुधागड

सुधागड :
पालीच्या जवळचाच हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, याची उंची ५९० मीटर आहे. पूर्वी हा गड भोरपगड म्हणूनही ओळखला जायचा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. इ. स. १६४८ साली मालवजी नाईक कारके, सरदार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक या शिवाजी महाराजांच्या शूरवीरांनी किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी या गडाचे सुधागड असे नामकरण केले. हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते. 

महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले. गडावर पाण्याचे अनेक तलाव आहेत. किल्ल्यावर पंतसचिवांचा वाडा आहे, तसेच भोरेश्वराचे मंदिर व भोराई देवीचे मंदिर आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस सुबक नक्षीकाम असलेल्या समाध्या आहेत. येथील जंगलात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. भोराई देवीच्या मंदिराजवळ पुढे पाण्याची टाकी आहेत. टाक्यांच्या डावीकडे पुढे गेल्यावर चोर दरवाजा होता. तो आता अस्तित्वात नाही. 

वरदविनायक

पाच्छापूर दरवाज्यातून गडावर गेल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्याची कोठारे, टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी आहे. गडावर रायगडच्या टकमक टोकासारखे टोक असून, येथून घनगड, कोरीगड, तैलबैला व अंबा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रायगडावरील टकमक टोकासारखेच येथेही टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे दिसतात.

वरदविनायक मंदिर

महडचा वरदविनायक :
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. सन १७२५मध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलर यांनी हे मंदिर बांधले. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एका भक्ताला त्याच्या स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात मूर्ती पडली आहे असे दिसले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून, गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. 

कसे जाल पाली परिसरात?
मुंबई-गोवा महामार्गावर वाकण येथे उतरून पालीपर्यंत जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन - नागोठणे. जवळचा विमानतळ मुंबई - १२५ किलोमीटर. मुंबई-पुणे रस्त्यावरून खोपोली गाव ओलांडल्यावर डावीकडे पालीपर्यंत रस्ता आहे. पाली येथे राहण्याची व भोजनाची उत्तम सोय आहे. येथे भरपूर हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे. 

(या भागातील काही माहितीसाठी लेणी अभ्यासक आयु. मुकेश जाधव यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search