Next
हे वर्ष नफा कमावण्याचे...
BOI
Sunday, April 01, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

आता पडत्या भावात चांगले शेअर्स घेतले व वर्षभर घायकुतीला न येता ठेवून दिले, तर डिसेंबरअखेर अनेक शेअर्स ३० ते ३५ टक्के वाढ दाखवतील. हे वर्ष नफा कमावण्याचे आहे; मात्र रोज भाव वाढण्याची उत्कंठा दाखवू नये. ग्राफाइट इंडिया, हेग आदी कंपन्यांचे शेअर आत्ता जरूर घ्यावेत. अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
............
गेल्या आठवड्यात गुरुवारी व शुक्रवारी महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त सुट्ट्या होत्या. त्यामुळे २०१७-१८च्या आर्थिक वर्षाचे व्यवहार बुधवारी, २७ तारखेलाच बंद झाले. वर्षअखेर निर्देशांक ३२ हजार ९६८वर, तर निफ्टी १० हजार ११३वर बंद झाला. गेल्या बारा महिन्यांत निर्देशांकाने ३६ हजार ४४३ ही पातळी गाठली होती व किमान पातळी २९ हजार २४१ होती. ‘निफ्टी’ची न्यूनतम पातळीवर नऊ हजार ७५ वर होती, तर वर्षभरात उच्चांक ११ हजार १७१ होता. नवीन वर्ष भारतीय पंचांगानुसार ‘विलंबी नाम’ संवत्सर असल्याने सर्वच गोष्टींत विलंब दिसून येईल; पण त्याचबरोबर एक महिना ‘अधिक’ असल्याने अधिकात अधिक फळही मिळेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत निर्देशांक ३६ हजारच्या वर व निफ्टी ११ हजार ५००च्या वर जावा; मात्र हे आकडे गाठताना निर्देशांक, निफ्टी कमी जास्त होत रहातील. त्यामुळे गुंतवणूकदारांना वर्षभर सावधानतेने व्यवहार करावे लागतील.

या वर्षात जागतिक व भारतीय आर्थिक स्थितीत बरेच चढ-उतार राजकीय व नैसर्गिक कारणांमुळे दिसतील. अमेरिकेत ‘फेडरल रिझर्व्ह’ने नुकतीच व्याजात पाव टक्का वाढ केली आहे. वर्षभरात अशी वाढ दोनदा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकही व्याजदरात वाढच करील. बँकांना त्याचा फटका बसणार नसला, तरी केंद्र सरकारला कर्जरोखे जास्त व्याजदराने काढावे लागतील. त्यामुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. बँकाही कर्जावरील व्याजदर वाढवतील. वाढत्या अनार्जित कराच्या तरतुदींसाठी त्यांना आपले उत्पन्न  वाढवावे लागणार आहे.

 मात्र कंपन्यांचे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर तिमाहीचे विक्रीचे व नफ्याचे आकडे उत्तम येणार आहेत. त्यामुळे आता पडत्या भावात चांगले शेअर्स घेतले व वर्षभर घायकुतीला न येता ठेवून दिले, तर डिसेंबरअखेर अनेक शेअर्स ३० ते ३५ टक्के वाढ दाखवतील. भागभांडारात अनावश्यक खोगीरभरती नसावी. नेमके १० ते १५ शेअर्सच असावेत व ते दीर्घ मुदतीच्या हिशेबाने घेतलेले हवेत. शेअर बाजारात भाव वाढतील, यावर श्रद्धा हवी. तसेच योग्य फळ मिळण्यासाठी सबुरी हवी. ‘सब्र का फल मीठाही होता है’ ही म्हण लक्षात ठेवायला हवी.

सध्या ग्राफाइट धातूच्या विक्रीच्या जगभरातील मागणीमुळे व या क्षेत्रातील कित्येक चिनी कंपन्या बंद पडलेल्या असल्याने भारतातील ग्राफाइट इंडिया व हेग या कंपन्यांत सध्याच्या अनुक्रमे ७४५ व ३१०० रुपये भावाला जरूर गुंतवणूक हवी. मार्चमध्ये कंपन्यांनी ग्राफाइट धातूच्या विक्रीचा दर टनाला चौदा हजार रुपये केला आहे. त्याचा परिणाम जून, सप्टेंबर या तिमाहीच्या आकड्यात दिसेल. ‘ग्राफाइट इंडिया’चा शेअर सध्या ७५० रुपयांपर्यंत मिळत आहे. वर्षभरात तो नऊशे ते नऊशे ५० रुपयांची पातळी ओलांडेल. ‘हेग’चा शेअर तीन हजार ते एकतीसशे रुपयाच्या दरम्यान खरेदी केला, तर वर्षभरात चार हजार रुपयांचा भाव दाखवून जाईल. याखेरीज रेन इंडिया, जिंदाल स्टील अँड पॉवर, जिंदाल सॉ (इस्सार), स्टरलाइट टेक्नॉलॉजी व ‘केपीआयटी टेक्नोलॉजिज’मध्ये गुंतवणूक हवी. हे वर्ष नफा कमावण्याचे आहे; मात्र रोज भाव वाढण्याची उत्कंठा दाखवू नये.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link