Next
पुण्यात कचरा परिषदेला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शहराची कचरा समस्या, संभाव्य उपाय, नागरिकांचा सहभाग, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग अशा अनेक पैलूंचा उहापोह करण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करण्यासाठी शिवप्रजाराज्यम संघटना, माय अर्थ फाउंडेशन, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने कचरा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात १३ जुलैला ही परिषद  झाली. या परिषदेला पुणेकरांची चांगली उपस्थिती होती. या परिषदेत ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, पुणे महानगरपालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, पुणे महानगर परिषदेचे अॅड. गणेश सातपुते, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे सचिन निवंगुणे, कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ ललित राठी, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडियाचे नीलेश इनामदार, ग्राहक पंचायतीचे विलास लेले, अॅड. अनिरूद्ध कुलकर्णी यांनी परिषदेत विचार मांडले. 

या प्रसंगी बोलताना ‘वनराई’चे अध्यक्ष धारिया म्हणाले, ‘कचरा समस्येचे मूळ हे स्वच्छतांच्या सवयींशीही निगडीत आहे. हव्यासामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. पुण्याच्या  लोकसंख्येला साजेसे कचरा व्यवस्थापन करणे आव्हानात्मक काम आहे. सर्वांच्या प्रयत्नांनी ते शक्य असून, जनजागृती करण्याचा कचरा परिषदेच्या संयोजकांचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.’

वेलणकर म्हणाले, ‘पालिकेच्या कचरा व्यवस्थापन कामाचा लेखाजोखा घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर पुणेकरांचा वचक नाही. २५हून अधिक प्रकल्प होऊनही समस्या सुटली नाही. कोट्यवधी रुपये वाया गेले. या सर्व गोष्टींची श्वेतपत्रिका आणायची गरज आहे. सल्लागारांवर कोट्यवधी खर्च केले जातात. जुने प्रकल्प वाऱ्यावर सोडून नवे आणले जातात. महापालिका स्वतःची जबाबदारी नागरिकांवर झटकून टाकत आहे. इंदोरचा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येतो आणि पुण्याचा येत नाही, कारण इंदुरप्रमाणे पुण्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सकाळी रस्त्यावर कचरा व्यवस्थापनसाठी उपस्थित नसते.’ 

पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, ‘२१०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यातील १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पुणे महापालिका प्रामाणिकपणे कचरा समस्येवर काम करू इच्छित आहे. माझ्या कारकिर्दीत नागरिकांशी संवाद ठेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांची मानसिकता सकारात्मक करण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओला-सुका कचरा वर्गीकरणाची जबाबदारी नागरिक पार पाडणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.’


नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘नागरिकांचा  सहभाग मिळवून सातत्याने प्रयत्न केल्याने आमच्या प्रभागात ३६ कचरापेट्या काढण्यात यश मिळाले आणि घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले. ओल्या-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण ही दैनंदिन सवय बनली पाहिजे. पालिका कर्मचाऱ्यांसमवेत मी नगरसेवक या नात्याने रोज सकाळी रस्त्यावर कामाची देखरेख करते. देशभरात कचरा निर्मूलनाच्या चांगल्या प्रयोगातून नवे उपाय शिकत राहते.’  

सचिन निवंगुणे म्हणाले, ‘पूर्वी शहरातील कंपोस्ट झालेला कचरा शेतीसाठी नेला जायचा. प्लास्टिक हे पुण्यातील कचऱ्यात मिसळल्याने शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत म्हणून नेणे बंद केले. पुण्यात कचरा साठून राहत आहे ५० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आल्याने प्लास्टिक वाढलेच आहे. फक्त दंडात्मक कारवाईची सोय म्हणून दुकाने आणि व्यापाऱ्यांकडे पाहिले जाते.’

इनामदार म्हणाले, ‘प्लास्टिकपासून इंधन तयार करणे शक्य असून, घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण, विघटन करून ते बागांसाठी वापरता येईल. घरचे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी अनेक नवी संशोधने आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे.’ 

कचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापनाकडे समस्या म्हणून न पाहता सर्व समाजाने येऊन त्यासाठी मॉडेल उभे करावे, असे राठी सांगितले. 

अॅड. गणेश सातपुते म्हणाले, ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणात न्यायाधीशांची नियुक्ती झाल्या पाहिजेत. कचरा आणि पर्यावरणविषयक प्रश्नांची तड लागली असते. सर्व सोसायट्यांमध्ये कचरा परिषदा झाल्या पाहिजेत. कचरापेट्या काढल्याने कोठेही कचरा टाकला जातो.’

प्रारंभी कचरा समस्येवर पथनाट्य सादर करण्यात आले. शेवटी कचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली. परिषदेचे संयोजक अनंत घरत यांनी प्रास्ताविक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search