Next
पुण्यात ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी’ महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 11:27 AM
15 0 0
Share this article:

पुणे : प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांची नादरूप नृत्य संस्था व महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने तसेच प्राज फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने २५ व २६ मे २०१९ रोजी ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात होईल. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांसाठी खुला आहे. 

महाराष्ट्रात कोरिओग्राफीची १९३०च्या दशकात (नृत्य दिग्दर्शन) मुहूर्तमेढ लीला सोखे यांनी रोवली. त्यांना नृत्याच्या क्षेत्रात मॅडम मेनका नावाने ओळखले जाते. एका संकल्पनेभोवती बांधली गेलेली कलाकृती म्हणजे ‘कोरिओग्राफी’ अशी ढोबळ व्याख्या आपल्याला माहिती असते. मात्र कोरिओग्राफी एवढ्यापुरती मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी  आहे. कोरिओग्राफीचा खरा अर्थ शोधण्यासाठी, स्तर उंचावण्यासाठी त्यातील तत्त्व, जाणिवा, संवेदनशीलता यांचा शोध घेऊन ती जनमानसात पोहोचविण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे.

महाराष्ट्रात अनेक कला फुलल्या, बहरल्या मात्र त्यांना एकसंध बांधून त्यातून एक अनोखा कलाविष्कार निर्माण करणाऱ्या कोरीओग्राफीची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात मॅडम मेनका यांनी रोवली. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी खंडाळा येथे मॅडम मेनका स्कूल स्थापन करून तेथे भारतातील अनेक दिग्गज नृत्यगुरूंना बोलवून शिष्य घडविण्यास सांगितले व कोणत्याही एकाच नृत्य प्रकारशी बांधले न जाता सर्वसमावेश असा बॅले कार्यक्रम करण्याची त्यांनी सुरुवात केली. त्याच धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, पहिले वर्ष हे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात आले होते. कोरिओग्राफी या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असलेल्या मंडळीना आपल्या संकल्पना मांडण्याची संधी मिळावी म्हणून हे व्यासपीठ निर्माण केले आहे. 

गुरू शमा भाटेया विषयी माहिती देताना गुरू शमा भाटे म्हणाल्या, ‘ही कोरिओग्राफी तयार करण्यासाठी नव्या नर्तक-नर्तकींवर शैलीचे, विषयाचे, भाषेचे, मांडणीचे तसेच नर्तक-नर्तकींच्या संख्येचे बंधन नाही. कुठल्याही भाषेतील एखादी म्हण शोधून, त्या म्हणीला अनुसरून आपला विचार प्रभावीपणे मांडावा एवढीच अपेक्षा आहे. यातूनच सर्जनशीलतेला मोकळी वाट मिळेल व नवे काही तरी घडत राहील. हा या महोत्सवामागील उद्देश आहे. कोरिओग्राफी या शब्दामागील व्याप्ती खूप मोठी आहे. ती नीट उलगडावी म्हणून या महोत्सवांचे आम्ही डॉक्युमेंटेशन करीत आहोत. यातून कोरिओग्राफीविषयी विविध अंगांनी विचार व्हावा व या विचारमंथनातून साधारणतः शक्य तितक्या लवकर कोरिओग्राफीविषयी अभ्यासक्रम सुरू करण्याइतका ज्ञानाचा संग्रह यातून आपोआपच तयार होईल.’

महाराष्ट्रात कोरीओग्राफीला पहिल्यांदा स्फूर्ती देणाऱ्या मॅडम मेनका होत्या. त्यांनी या संकल्पनेला एक नवी ओळख मिळवून दिली होती; मात्र आता काळाच्या ओघात सगळ्यांनाच त्यांचा विसर पडल्याची खंत वाटते. त्यांचे हेच उत्तुंग काम पुन्हा एकदा रसिकांच्या स्मरणात यावे म्हणून हा महोत्सव मागील वर्षीपासून आम्ही सुरू केला असल्याचेही भाटे यांनी या वेळी सांगितले. 

या महोत्सवात विचारक्षमतेला चालना देणाऱ्या अशा विविध भाषा व प्रांतांच्या म्हणींवर आधारित पाच कोरिओग्राफी सादर होणार आहेत. नृत्य, कोरिओग्राफी, संगीत, नाटक, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांशी निगडित तज्ज्ञांचे पॅनेल प्रत्येक सादरीकरणानंतर त्याविषयी विश्लेषणात्मक चर्चा करणार आहेत. यासाठी अहमदाबाद येथील आघाडीचे कोरीओग्राफर मौलिक शहा व इशिरा पारीख यांची खास उपस्थिती असणार आहे. पॅनेलमध्ये गुरू शमा भाटे (नृत्य), शर्वरी जमेनीस (नृत्य), अजय जोशी (समीक्षक), चैतन्य आडकर (संगीत), प्रदीप वैद्य (नाटक) यांचा समावेश असणार आहे.

महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन २५ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून, गुरू शमा भाटे यांच्या पुण्यातील शिष्या अवनी गद्रे यांच्या ‘दी मोअर यू सी, दी लेस यू नो, फॉर शुअर’ या कोरिओग्राफीच्या प्रस्तुतीने महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर भरतनाट्यम गुरू दीपक मुजुमदार यांचे मुंबई येथील पवित्र भट यांचे ‘ओगट्टी नल्ली बलविदे’ या म्हणीवर, तर पुण्यातील कथ्थक नृत्यांगना शांभवी दांडेकर यांच्या शिष्या अमृता गोगटे यांचे ‘इव्हन इफ यू कम आउट ऑफ वन केज, आरन्ट यू इन जस्ट अनदर वन?’ या म्हणीच्या आधारे सादरीकरण होईल.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाची सुरुवात दिल्लीतील कथ्थक गुरू पंडित राजेंद्र गंगाणी यांच्या शिष्या स्वाती सिन्हा यांचे ‘दी क्लॉक डझन्ट मेक अ माँक’ या म्हणीवरील सादरीकरणाने होईल. भरतनाट्यम गुरू वैभव आरेकर यांच्या शिष्या स्वरदा दातार (पुणे) यांचे ‘अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह’ या म्हणीवर सादरीकरण होईल. महोत्सवाच्या समारोपात मौलिक शहा व इशिरा पारीख हे कोरिओग्राफीविषयीचे त्यांचे अनुभव, त्यांच्या काही उत्कृष्ट प्रकल्पांविषयी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

महोत्सवाविषयी :
दिवस : २५ व २६ मे २०१९ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रस्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search