Next
महिला कैदी बनवणार वाहनांसाठी सुटे भाग
येरवडा कारागृहात ‘स्पार्क मिंडा’तर्फे असेम्ब्ली युनिट कार्यान्वित
BOI
Tuesday, August 14, 2018 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

येरवडा कारागृहात महिला कैद्यांसाठी सुरू केलेल्या लॉकसेट असेम्ब्ली युनिटच्या उद्घाटन प्रसंगी कारागृह अधीक्षक स्वाती साठे, स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या सारिका मिंडा व अन्य मान्यवर

पुणे : येरवडा कारागृहातील महिला कैदी आता वाहनांसाठीचे लॉकसेट बनवणार आहेत. मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (एमसीएल) यासाठी कारागृहात एक असेम्ब्ली युनिट सुरू केले आहे.कारागृह अधीक्षक स्वाती साठे, स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या सारिका मिंडा यांच्या उपस्थितीत नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. 

मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड आणि येरवडा कारागृह यांच्यामध्ये फेब्रुवारी २०१८मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, कंपनीने कारागृहात असेम्ब्ली युनिट स्थापन केले आहे. येथे महिला कैद्यांना या उत्पादनाची मूलभूत माहिती व प्रशिक्षण देण्यात येत असून,त्या बजाज, टीव्हीएस आदी कंपन्यांच्या वाहनांसाठीच्या लॉकसेटची जुळणी करणार आहेत. ‘एमसीएल’च्या देखरेखीखाली महिला कैदी हे शॉप-फ्लोअर चालवणार व सांभाळणार आहेत. यामुळे महिला कैद्यांना कारागृहाच्या आवारात आणि नंतर बाहेरही रोजगार मिळवण्यासाठी मदत होणार आहे.

यासाठी विशेष महिला सेलमधील २५ ते ३० महिला कैद्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री कंपनीच्या ग्राहकांना, तसेच बाहेरच्या बाजारपेठेतही केली जाणार आहे. त्याचे पैसे कंपनी कारागृह अधिकाऱ्यांकडे देईल आणि अधिकारी ते पैसे कैद्यांना देतील. 

अशोक मिंडा समूह हा वाहनांना सुटे भाग पुरवणारा उद्योगसमूह असून, सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत मिंडा समूहाने समाजिक जबाबदारी म्हणून असे तुरुंगातील प्रकक्लप सुरू केले आहेत. कंपनीचा हा पाचवा प्रकल्प आहे. औरंगाबाद, तिहार कारागृहातही कंपनीने असे प्रकल्प राबवले आहेत. यासाठी कंपनी संपूर्ण मशिनरी, कच्चा माल, वस्तूंची वाहतूक आणि गुणवत्ताविषयक अन्य व्यवस्था व प्रक्रिया अशा सुविधा पुरवते. कारागृहाच्या आवारात नियुक्त केलेले ‘एमसीएल’चे अधिकारी व पर्यवेक्षक प्रोत्साहनपर उपक्रमही आयोजित करणार आहेत. यामध्ये सर्वोत्तम कर्मचारी, कार्यक्षम लाइन, सर्वोत्तम सूचना निवडणे इत्यादींचा समावेश आहे. 

या उपक्रमाविषयी बोलताना अशोक मिंडा म्हणाले, ‘आम्ही नेहमी निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतो. समूहाने उत्पादन प्रकल्प स्थापन करणे व कैद्यांना सहभागी करून घेणे, हा कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी, तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये व्यवसायविषयक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या विशेष पद्धतीचा एक भाग आहे. कैद्यांना रोजगार मिळण्याच्या हेतूने सुरू केलेल्या आमच्या सामाजिक उपक्रमासाठी आवश्यक असलेली मंजुरी देण्यासाठी अधिकारी सहकार्य करतात व प्रोत्साहन देतात. स्त्री हा खऱ्या अर्थाने समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि स्त्रीला सबल केल्यास संपूर्ण समाज सबल होऊ शकतो. तसेच आगामी पिढ्यांमध्येही स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही करत असलेल्या छोट्याशा प्रयत्नामुळे कैद्यांच्या मानसिकतेत बदल आणण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.’

महिला कैद्यांशी संवाद साधताना स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या अध्यक्षा सारिका मिंडा
स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या अध्यक्षा सारिका मिंडा यांनी सांगितले, ‘आम्ही बऱ्याच वर्षांपासून तुरुंग अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहोत. आतापर्यंत औरंगाबाद, तिहार जेल व येरवडा कारागृह यांच्याबरोबरचे आमचे काम सुरळीत सुरू झालेले आहे. आम्ही आता असंख्य कैद्यांना कौशल्ये व रोजगार उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. कैद्यांना नोकरी दिल्याने त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत होतेच. शिवाय त्यांना उद्योग क्षेत्राची माहिती होते. आमचे असे सामाजिक कल्याणाचे उपक्रम राबवण्यासाठी नेहमी सहकार्य करणाऱ्या येरवडा जेलमधील अधिकाऱ्यांचे विशेष आभार. महिलांची कार्यक्षमता केवळ घरगुती कामांपुरती मर्यादित नसते, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच महिला कैद्यांसाठी आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे.’

कारागृहातील शिस्त अबाधित राखण्यासाठी व सर्व कामे सुरळीत होण्यासाठी कच्चा माल आतमध्ये आणणे व तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे, या गोष्टी मिंडा कॉर्पोरेशनच्या नियंत्रणात ठेवण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे समन्वय साधला जाईल आणि प्रक्रिया दर्जदार पद्धतीने केली जाईल. कंपनीच्या गरजांनुसार व्यवस्था व धोरणे राबवली जात असल्याची दक्षता घेण्यासाठी व्यवस्थापनाचा गट या युनिटला वेळोवेळी भेट देईल.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप गेली काही दशके सामाजिक विकासाचे उपक्रम राबवत आहे. अशा प्रकारचा पहिला उपक्रम २००५ मध्ये, जर्मनीतील ड्रेसडन कारागृह येथील प्लास्टिक पार्टस् बनविण्यासाठी सुरू करण्यात आला. अशाच प्रकारचा एक प्रकल्प तिहार जेलमध्ये एप्रिल २०१४मध्ये वायर हार्नेस असेम्ब्लीसाठी आणि नंतर औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये लॉक बॉडी असेम्ब्ली युनिटसाठी सुरू करण्यात आला. दिवंगत एस. एल. मिंडा यांनी मोगा देवी मिंडा चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत १९८७मध्ये समूहाच्या ‘सीएसआर’ प्रकल्पांची सुरुवात केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search