Next
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’
प्रेस रिलीज
Saturday, May 26, 2018 | 01:56 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला; सर्वसामान्यांसाठी काम करतानाच संविधानाचाही मान राखणाऱ्या मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर अभिनंदनही केले.

आठवले म्हणाले, ‘सबका साथ, सबका का विकास, असा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने चार वर्षे पूर्ण केली असून, या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीची उजळणी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. गेली चार वर्षे फक्त सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केल्याने २०१९ मध्येही मोदी सरकारला पर्याय नाही.’

‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात पहिल्यांदाच लागू करत कररचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. देशात सध्या तब्बल साडेसहा लाख कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत. महिलांना विनातारण कर्ज देण्याची योजना मोदींनी सुरू केली. या शिवाय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा धाडसी निर्णयही या सरकारने घेतला. अनेक बोगस कंपन्या बंद केल्याच, शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदींचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराची एकही मोठी घटना घडली नाही. त्यामुळेच गोरगरिबांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी सरकारला पर्याय नाही,’ असे त्यांनी नमूद केले.

‘या सरकारने ग्रामीण विद्युतीकरण योजना यशस्वीपणे राबवत संपूर्ण देशातील एकही गाव वीजपुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. शिवाय सौभाग्य अनुदानित एलपीजी योजना आणि गरिबांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनाही प्रभावीपणे राबविली,’ असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना, जन औषधी योजना, ग्रामीण सडक योजना, जलद पासपोर्टसेवा आणि नवसंकल्पित उद्योगांना चालना देण्यासाठीच्या स्टार्ट अप योजनेचेही त्यांनी कौतुक केले.

या शिवाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. या संविधानाबद्दल तसेच संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत या सरकारच्या मनात आदर असल्याचे सांगत आठवले म्हणाले की, ‘संविधानाच्या गौरवासाठी या सरकारने संसदेचे दोन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घेतले; तसेच २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून संविधानाला कोणताच धोका नसून केवळ राजकारणासाठी विरोधक संविधानाला धोका असल्याचा खोडसाळ आरोप करत आहेत. तसेच इंदू मील येथील महामानव डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, नवी दिल्लीतील २६, अलीपूर रोड येथील स्मारक आणि लंडन येथील स्मारकाच्या कामालाही या सरकारने गती दिली आहे.’

पालघर पोटनिवडणुकीतील भाजपच्या प्रचारात सहभागी होत आठवले यांनी काही जाहीर सभा घेतल्या. या सभेदरम्यानही त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील, तसेच राज्यातील सरकारचे कौतुक केले. सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सरकारचे हात बळकट करण्यासाठी पालघरमधील विजय गरजेचा असून, मतदानाच्या दिवशी फक्त भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनाच मतदान करा’, असे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search