Next
पिंपरी बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर!
BOI
Friday, February 03, 2017 | 06:31 PM
15 0 0
Share this article:

खेड तालुक्‍यातील पिंपरी बुद्रुक येथे बिबट्याच्या वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाकूर पिंपरी परिसराची पाहणी करून पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खेड तालुक्‍यातील पिंपरी बुद्रुक या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करत आहेत. भामाआसखेड धरणातील पाणी भामा नदीद्वारे शेती आणि पिण्यासाठी सोडण्यात येते आहे. त्यामुळे या भागात बारमाही पाणी उपलब्ध असते. पाण्याची अडचण येत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली आहे. बिबट्याला पिण्यासाठी पाणी आणि दडण्यासाठी ऊसाची शेती उपयुक्‍त ठरत आहे. त्यामुळे बिबट्या या भागात अधूनमधून दिसून येतो. मागील चार-पाच दिवसांपासून येथील वाडी वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर होत असल्याने कुत्री मोठ्यांनी भुंगतात तसेच ऊसाच्या शेतात आणि इतर बागायती शेतीत पळापळ होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

हा बिबट्या बिरदवडी, आंबेठाण, रोहकल, पिंपरी खुर्द, गोनवडी, बोरदरा, कोरेगाव या गावातील परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी अधूनमधून दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी चाकण येथील भामा पेट्रोल पंपाजवळून बिबट्या सकाळी सहाच्या सुमारास गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कडाचीवाडी भागातील वनविभागाच्या जंगलात बिबट्या सदृश्‍य प्राणी दिसून आल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. भामनेर खोऱ्याच्या भागातून भामा नदी जात असल्याने या परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनीत ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. बिबट्याला दडण्यासठी ऊस तसेच पिण्यासाठी पाणी मिळत असल्याने या भागात या बिबट्याचा वावर वाढत आहे. उसाच्या शेतातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. जंगली भाग तसेच डोंगरी वने सोडून हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. नष्ट होत चाललेली जंगले याला कारणीभूत ठरत आहेत. अन्न, पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी मनुष्यावरही हल्ले करून ठार करत आहेत. खेड तालुक्‍याच्या पूर्व भागातही मागच्या आठवड्यात एक मेंढी ठार केली असल्याची घटना ताजीच आहे. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यात रोजच बिबट्याच्या हल्ल्‌याच्या घटना घडत आहेत. वन विभागाला वन्यजीव महत्त्वाचे आहेत. परंतु त्यांचे पाळीव प्राणी आणि मनुष्यावर होणारे हल्ले ही देखील तेवढीच गंभीर बाब आहे. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search