Next
‘दिवाळी अंक म्हणजे दिवाळी’
BOI
Friday, October 20 | 05:30 AM
15 0 0
Share this story‘भाऊबीजेतून मिळालेल्या पैशांतून दिवाळी अंक विकत घेण्यात वेगळीच मजा होती. एकंदरच, सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा सण त्या वेळी खूप मौलिक होता, असं वाटतं...’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले सांगत आहेत त्यांच्या ‘आठवणीतल्या दिवाळी’बद्दल...

.....
मंगला गोडबोलेदिवाळीची माझी सर्वांत पहिली आठवण म्हणजे सुखद हवेची. आता कुठल्याही महिन्यात कुठलाही ऋतू असतो. तसं पूर्वी नसायचं. त्याच्यामुळे दिवाळीचं पहिलं जाणवणारं आनंदाचं ठिकाण म्हणजे सुखद हवा. स्वच्छ निरभ्र आकाश आहे, गार वारा पसरलेला आहे, विशेषतः पहाटे उठणं आणि त्या वातावरणातला प्रसन्नपणा अनुभवणं हा माझ्यासाठी दिवाळीतला पहिला भाग आहे.

दिवाळीत निसर्ग जसा आपल्यातलं सगळं सुंदर, सगळे कलागुण बाहेर आणतो, तसं माणूसही आणतोय की काय असं चित्र असतं. उदाहरणार्थ रांगोळीसारखी कला. आज रांगोळी म्हटलं, की एक विशिष्ट प्रकारची रांगोळी चाळणीतनं किलोवारी रंग घालून काढतात, तशी आम्ही कधीही काढत नव्हतो. चिमटीनं बारीक बारीक ठिपके काढून, नाजूक रेषांची रांगोळी काढायचो. रांगोळीचेसुद्धा खूप प्रकार असत, जे पारंपरिक कलेचा भाग असत. जास्त चांगली चित्रकला असलेल्या बायका अथवा मुली फ्री हँड रांगोळी काढत. आताचा जमाना सगळा छापांचा झालाय. म्हणजे पदार्थही सगळे एकछाप. दोनचार महत्त्वाच्या मिठाईवाल्यांकडून शहरातल्या सगळ्यांनी आणलेले. तसं त्या वेळी नसायचं. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक व्यक्तिगत स्पर्श होता. त्याचा एक आनंद होता, असं मला वाटतं. मुंबईमध्ये काही आमची घरं मोठी मोठी नव्हती. मोठमोठी परसदारं, अंगणं असं काही नव्हतं; पण जी काही छोटीशी गॅलरी असेल, त्यात तिथली माणसं कंदील, दिवे लावायची. आहे त्या परिस्थितीत माणसं आनंद कशी घेतात, हे सांगणारा किंवा शिकवणारा तो सण होता असं मला वाटतं.

हिंदूंचे सर्व सण हे एकेक दिवसाचे आणि एकेक कारणाला वाहिलेले असतात. दिवाळीमध्ये प्राण्यांपासून, नात्यांपासून, निसर्गापासून सगळ्यांची बूज राखणारा एकेक दिवस आहे. वसुबारस म्हटलं की गाय आणि वासरू यांची पूजा करायची आहे. म्हणजे तुम्ही प्राण्यांचं स्मरण ठेवलंय. धनत्रयोदशी म्हटलं की तुम्ही धनाविषयी काहीतरी सांगता. नरक चतुर्दशी म्हटलं तर अनिष्टावर जय मिळवून आपल्याला पुढे जायचंय. पाडव्यासारखा सण हा पतीपत्नीच्या नात्याला उठाव देणारा. नाही तर मग कसं झालं असतं, की नरक चतुर्दशीला बायकांनी नवऱ्याची सेवा करायची आणि मग नवऱ्यांनी बायकोला कधी परत काय द्यायचं? तर लगेच दोन दिवसांनी सोय ठेवलीय. पाडव्याच्या दिवशी नवराही बायकोला काहीतरी भेटवस्तू देतो, तिचा आदर, सन्मान करतो. मग या सगळ्यात माहेरची आठवण कधी राहील?  हा तर सगळा सासरच्या घरचा सण झाला. म्हणून मग भाऊबीजेला भाऊ आला पाहिजे. भावाच्या बरोबर कदाचित त्याची मुलंबाळं येतील, आई वडील येतील आणि सासर-माहेरचा मेळ होईल. असं सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं सर्व देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा हा सण खूप मौलिक होता असं वाटतं. लगेच आज तो अगदी भ्रष्टच झालाय, नष्टच झालाय असं काही मला म्हणायचं नाही. परंतु तो छापील झालाय, असं मात्र मला वाटतं.

आणखी एक वैशिष्ट्य मला वाटतं ते म्हणजे, दिवाळी अंक. भारतात इतकं सगळं वैविध्य आहे. परंतु महाराष्ट्र आणि बंगाल या दोनच प्रांतांनी सणाची सांगड वाचनाशी घातलीय. सण म्हणजे कपडे घ्यायचे, दागिने घ्यायचे, छान छान खायचं, एकमेकांना भेटायचं, भेटवस्तू द्यायच्या हे झालंच. तो आनंद आहेच; पण याच्याबरोबर मी काहीतरी सकस असं वाचेन किंवा लेखक असतील तर ते त्या निमित्ताने काहीतरी लिहितील, हा आनंद वेगळा आहे. माझ्या लहानपणी जे वयानं लहान भाऊ असत म्हणजे जे कमावते नसत ते दोन रुपये भाऊबीज द्यायचे आणि जे नुकते नोकऱ्या लागलेले कमावणारे भाऊ असत ते पाच रुपये भाऊबीज द्यायचे. त्याच्यामुळे भाऊबीज आली, की ती जिवापाड जपून ठेवायची आणि कुठून तरी आपले आठ रुपये गोळा झाले की दिवाळी अंक विकत घ्यायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा, ही माझ्या मनातली दिवाळीची एक आठवण आहे. विनोदाला वाहिलेले दिवाळी अंक असा आता जो एक गट झालेला आहे, तसा तेव्हा फार कमी होता. अतिशय गंभीर अंकातदेखील एखादा विनोदी लेख असायचा. ते सगळं गंभीर वाचन पेलायची ताकद त्या एका विनोदी लेखात आहे, असं वाटायचं. दिवाळी अंक हे मराठी भाषेचं वैभव आहे आणि ते एका मोठ्या सणाशी जोडलं गेलेलं आहे. दिवाळी संपली तरी दिवाळी अंक उरायचे. पुढचे पाच-सहा महिने आम्ही ते वाचत असू. असं वाटायचं की दिवाळीची सगळी चव, गंमत, आनंद हा त्या पानापानात आहे आणि पुढचे पाच-सहा महिने आपण त्याचा आस्वाद घेता यायचा. माझ्या आठवणीतली दिवाळी ही अशी आहे.

(शब्दांकन : सुरेखा जोशी, व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link