Next
रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा - मोहम्मद रफी
BOI
Sunday, August 04, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा असं ज्यांचं वर्णन करता येईल, त्या मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन ३१ जुलै रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत मोहम्मद रफी यांच्याबद्दल...  
...........
गुरुवार, ३१ जुलै, १९८०. मुंबईत भरपूर पाऊस पडत होता. मी एक इंग्रजी चित्रपट बघण्यासाठी पुण्याहून तिकडे गेलो होतो. दुपारनंतर ‘ती’ दु:खद, क्लेशकर बातमी आली - मोहम्मद रफी गेला! केवळ भारतच नव्हे, तर सारं जग हळहळलं. एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेला. हिंदी संगीत जगतात त्याचं स्थान अढळ होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. त्याची गाणी चिरतरुण, अमर आहेत. त्याच्या काळातले आणि आजचे गायक कलाकारही ही गोष्ट खुल्या दिलानं मान्य करतात. अवघं ५६ वर्षांचं आयुष्य लाभलेला हा गायक आपल्यातून जाऊन या ३१ जुलैला ३९ वर्षं झाली. आणखी चार वर्षांनी त्याचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल आणि वर्षभर साऱ्या जगात अनेक प्रकारचे कार्यक्रम होत राहतील; त्याची आठवण जागवण्यासाठी! आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्याच्या दमदार, मधुर आवाजातील गाणी दुमदुमत राहतील. 

एस. डी. बर्मन यांच्यासमवेत मोहम्मद रफीहिंदी चित्रपट आणि गैरफिल्मी जगतात कुंदनलाल सैगलनं १९४५-४६पर्यंत अधिराज्य गाजवलं. त्यानंतरच्या गायकांचा तोच आदर्श होता. रफी, मुकेश, किशोरकुमार हे त्यानंतरचे प्रसिद्ध गायक. ते सैगलची नक्कल (आदरानं) करत असत. ‘पहली नजर’मधलं मुकेशचं ‘दिल जलता है तो जलने दे’ हे गाणं आठवा. हुबेहूब सैगल! ‘शाहजहान’मध्ये रफी, सैगलबरोबर ‘कोरस’मध्ये गायला आहे. ‘मेऽरे सपनों की रानी’ हेच ते गाणं. गाण्याच्या शेवटी रफीला दोन-तीन ओळी स्वतंत्रपणे गायची संधी मिळाली - ‘रूही रूही रूही, मेरे सपनों की रानी.’ आजही ते ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. तलत महमूद हा सैगलपासूनच आपल्या तलम, वैशिष्ट्यपूर्ण आवाजात गात होता. मन्ना डे, हेमंतकुमार, महेंद्र कपूर हेसुद्धा नंतरच्या काळात गायक म्हणून गाजले. मन्ना डेला दीर्घायुष्य मिळालं. मुकेश, किशोर रंगमंचावर गाताना कोसळले आणि रफीसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने अनपेक्षितपणे गेला. हजारो गाणी गायल्यामुळे आणि नाही म्हटलं तरी कार्यक्रम सादर करताना येणाऱ्या ताणतणावामुळे हृदय कमकुवत होतच असणार. मृत्यू हीच त्याची परिणती!

तरुण वयातील रफीएक प्रख्यात बंगाली संगीतकार एकदा म्हणाला होता, ‘देव जर अस्तित्वात असेल, तर त्याचा आवाज हेमंतकुमारसारखा असेल.’ पटतं का? हेमंतकुमारची असंख्य गाणी अत्यंत गोडच आहेत, यात शंका नाही. माझ्या मते, संगीतकार म्हणून त्याचं कार्य अधिक चांगलं आहे आणि ‘गायक देवां’च्या मांदियाळीत मोहम्मद रफीला ‘देवेंद्र’ म्हणावं लागेल. अर्थात, ही ज्याची त्याची आवड आहे; मात्र रफीचं श्रेष्ठत्व निर्विवादच आहे. 

तो बहुतेक सर्व कलाकारांसाठी आणि गायकांबरोबर गायला. दिलीपकुमार, देव आनंद, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर आदी नायकांना त्यानं दिलेली गाणी अगदी त्यांनीच गायल्यासारखी वाटायची-वाटतात. त्या-त्या कलाकाराला योग्य असा आवाजातील फेरफार रफी लीलया करायचा. तो अखेरपर्यंत तसाच टिकून राहिला. अगदी मृत्यूपूर्वी काही तास आधी ‘आसपास’ चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित केलेलं ‘श्याम फिर क्यों उदास है दोस्त’ हे गाणंसुद्धा त्याच गोड, तडफदार आवाजात गायलेलं होतं. अगदी थोड्याच वेळात रफी हे जग सोडून जाणार होता, याची कुणाला कल्पना तरी असेल का?

प्रेमगीत, भक्तिसंगीत, देशभक्तिपर, कव्वाली, बालगीत, गझल - गाण्याचा जो प्रकार किंवा गरज असेल, त्यानुसार त्याच्या गळ्यातून सूर बाहेर पडत. आपल्या आवाजाची त्यानं कधी घमेंड केली नाही, तर ती ‘मालिक की मेहेरबानी है।’ असं तो विनम्रतेनं म्हणे. त्याला एकलव्याप्रमाणे गुरू मानणाऱ्या गायकांच्या अनेक पिढ्या पुढे निर्माण होत राहिल्या. 

गायक मोहम्मद अजीजला एकदा कोणी तरी म्हणालं की, ‘तू अगदी रफीसारखा गातोस.’ त्यावर तो कानाला हात लावून म्हणाला, ‘ये तो खूबसूरत गलतफहमी है। मी स्वत: गायलेली ६० गाणी मला आठवत नाहीत; पण रफीसाहेबांची सहा हजार गाणी मला पाठ आहेत.’ 

ओ. पी. नय्यर, गीता दत्त आणि मोहम्मद रफी

रवींद्र जैन म्हणतात, ‘मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. माझी देवाला सदैव प्रार्थना असते, की आणखी एका रफीला निर्माण कर, म्हणजे लोकांना त्याच्या गायकीचा आनंद पुन्हा लुटता येईल.’ 

रफीचा विसर कोणाला पडू शकेल? आजही, रोज देश-विदेशात त्याची गाणी सर्व रेडिओ केंद्रांवरून लागत असतात. त्याची आठवण कायम जागी राहील, अशी ‘तुम मुझे यूँ भुला ना पाओगे’सारखी शेकडो गाणी त्यानं म्हणून ठेवली आहेत. 

त्याची किती तरी मराठी गाणी प्रसिद्ध आहेत. त्यात भाषा आणि उच्चारांची चूक त्यानं होऊ दिली नाही. ‘प्रभू तू दयाळू’, ‘शोधिसी मानवा’, ‘हे मना आज कोणी’, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’, ‘अगं पोरी, संभाळ’, ‘हसा मुलांनो हसा’, ‘हा रुसवा सोड सखे’, ‘नको आरती की नको पुष्पमाला’  इत्यादी गाणी खूपच लोकप्रिय झाली. तेलुगू, आसामी भाषेतही त्याची गाणी आहेत. त्याच्या कित्येक गाण्यांना ‘फिल्मफेअर’सारखे पुरस्कार मिळाले. त्यानं सुमारे २८ हजार गाणी गायली, अशी नोंद झालेली आहे. 

शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण नसतानाही त्यानं ‘मधुबन में रधिका’, ‘कुहू कुहू बोले कोयलिया’, ‘एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल’, ‘मन तरपत’, ‘ओ दुनिया के रखवाले’ यांसारखी गाणी अप्रतिम गायली. त्याच्या निवडक लोकप्रिय गाण्यांची यादी द्यायची झाल्यास ती प्रचंड मोठी होईल. मला आवडणाऱ्या त्याच्या शेकडो गाण्यांमधली १० सांगायची झाली तर ती अशी :

एहसान तेरा, दिन सारा गुजारा’ (जंगली), ‘अभी ना जाओ’ (हम दोनो), ‘रमय्या वस्तावय्या’ (श्री ४२०), ‘तेरे मेरे सपने’ (गाइड), ‘जो वादा किया वो’ (तामजहल), ‘धीरे धीरे चल’ (लव्ह मॅरेज), ‘जिंदगीभर नही’ (बरसात की रात), ‘तस्वीर तेरी दिल में’ (माया), ‘दो घडी तुम जो पास आ बैठे’ (गेटवे ऑफ इंडिया).

नौशाद यांच्यासह रफी‘बैजू बावरा’, ‘नौशेरवाने आदिल’, ‘आजाद’, ‘तिसरी मंजिल’, ‘तुमसा नहीं देखा’ इत्यादी चित्रपटांतली सगळीच गाणी चांगली आहेत. नौशाद, ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, रोशन आदी संगीतकारांसाठी रफीनं उत्तमोत्तम गाणी गायलेली आहेत. ती सर्व हृदयबद्ध आहेत. ही यादी केवळ प्रातिनिधिक आहे. त्याच्या गाण्यांमुळे अनेक चित्रपटांचे रौप्यमहोत्सव झालेले आहेत. सन १९४० ते ८०च्या दरम्यान पार्श्वागायनात तो सदैव आघाडीवर राहिला. 

रफीवर शेकडो पुस्तके आणि हजारो लेख लिहिले गेले आहेत. तथापि, दर वर्षी त्याच्या पुण्यतिथीला त्याचं स्मरण करणं स्वाभाविक आहे. त्याचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबमध्ये अमृतसरजवळील ‘कोटला सुलतानसिंह’ गावात झाला. तिथेच प्रारंभिक शिक्षण झालं. सातव्या वर्षी कुटुंबासह तो लाहोरला गेला. घरात संगीताचं वातावरण नसूनही त्याला गाण्याची विलक्षण आवड लागली. उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडे त्याने काही काळ संगीताचे धडे घेतले. संगीतकार श्यामसुंदर यांच्यासाठी ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटाकरिता त्यानं १९४४मध्ये पहिलं गाणं म्हटलं. १९४६मध्ये त्यानं मुंबई गाठली. नौशादसाहेबांनी सर्वांत प्रथम त्याला ‘पहले आप’ चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. ‘अनमोल घडी’पासूनच गायक म्हणून तो ख्यातनाम झाला आणि पुढे त्या क्षेत्रात त्यानं इतिहास निर्माण केला. त्याबद्दल काय आणि किती सांगायचं?

रफी अत्यंत शांत, लाजाळू, हसतमुख, निर्व्यसनी आणि नम्र होता. फाळणीनंतर त्यानं भारतात राहणं पसंत केलं. त्याला चार मुलं आणि तीन मुली झाल्या. अनेक संस्थांना मदत म्हणून त्यानं विनामानधन कार्यक्रम केले; पैशाचा हव्यास कधीच धरला नाही. भारत सरकारनं १९६५मध्ये त्याला ‘पद्मश्री’ सन्मान बहाल केला. वास्तविक तो ‘भारतरत्न’च्या योग्यतेचा होता. निदान ‘पद्मविभूषण’ देऊन त्याचा गौरव करायला हवा होता. मरणोत्तरही तसा तो देता येतो. अलीकडेच आसामचे गायक-संगीतकार भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे. 

लता मंगेशकरच्या संदर्भात ‘पुलं’ एकदा म्हणाले होते, ‘ती भारतरत्न होतीच. तिला ती पदवी सरकारनं दिली नसती तरीही!’ तसाच मोहम्मद रफी भारतरत्नच नव्हे, तर ‘विश्वरत्न’ होता आणि त्याचा आवाज ‘विश्वंभर’ आहे. त्याला दंडवत!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(मोहम्मद रफी यांच्या काही आठवणी सांगणारा आणि मेरा दिल मचल गया... या त्यांनी गायलेल्या गाण्याचा रसास्वाद घेणारा पद्माकर पाठकजी यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search