Next
अलविदा २०१७ – भाग १
BOI
Wednesday, December 27 | 01:14 PM
15 0 0
Share this story


अखेर ३१ डिसेंबरचा दिवस जवळ आलाय. अनेक चांगल्या-वाईट घटना या वर्षभरात घडल्या. २०१७ या सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षभरात विविध क्षेत्रांत घडलेल्या काही निवडक घटनांचा आढावा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या पाच दिवसांत घेतला जाणार आहे. त्यातील हा पहिला भाग...
.........
संरक्षण क्षेत्र

१२ जानेवारी : ‘खांदेरी’ पाणबुडीचे जलावतरण. टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी नौदलाच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ करणारी आहे. 

११ फेब्रुवारी : ‘पृथ्वी डिफेन्स व्हेइकल’ (पीडीव्ही) या क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

६ मार्च : ५७ वर्षे भारतीय नौदलात कर्तव्य बजावणाऱ्या आयएनएस विराट या युद्धनौकेला निरोप.

११ मार्च : ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. तीनशे किलो अस्त्रे वाहून नेण्याची क्षमता. 

२५ मार्च : राजस्थानच्या तनुश्री पारीक (२५) सीमा सुरक्षा दलात पहिल्या महिला लढाऊ अधिकारी म्हणून रुजू.

१२ मे : नर्सिंग सेवेसाठी देण्यात येणारा फ्लोरेन्स नाइटिंगेल हा राष्ट्रीय पुरस्कार मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील नर्सिंग सुपरिटेंडन्ट स्वप्ना सतीश जोशी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान.

१८ मे : भारतीय लष्करात तीस वर्षांनी तोफा दाखल.

२० जून : एफ १६ ही लढाऊ विमाने भारतात बनविण्यासाठी टाटा समूह आणि लॉकहीड मार्टिन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार. 

३ सप्टेंबर : स्वतंत्र कार्यभार असलेल्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी घेतली संरक्षणमंत्रिपदाची शपथ. 

१० सप्टेंबर : आयएनएसव्ही तारिणी या शिडाच्या नौकेतून नौदलाच्या सहा महिला अधिकारी जगप्रदक्षिणेला निघाल्या. नाविका सागर परिक्रमा असं या प्रकल्पाचं नाव.

२४ नोव्हेंबर : केरळची शुभांगी स्वरूप नौदलातली पहिली महिला वैमानिक बनली. आस्था सेहगल, रूपा ए. व माया एस. या तिघी नौदलाच्या शस्त्रास्त्र विभागातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या.

२२ नोव्हेंबर : सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात अचूक लक्ष्यभेद केला. त्यामुळे भारताची संहारक शक्ती अनेक पटींनी वाढल्याचे सिद्ध.

१४ डिसेंबर : आयएनएस कलवरी या पाणबुडीचे माझगाव गोदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत निर्मिती. भारतीय नौदलाच्या पाणबुडी विभागाला पन्नास वर्षे पूर्ण.

अन्य उल्लेखनीय घटना

२८ फेब्रुवारी : आयएफआरएस या लेखापालांच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत पुण्याची प्राजक्ता जगताप जगात दुसरी.

४ एप्रिल : गीता जोहरी यांच्या रूपाने गुजरातच्या पोलीस प्रमुखपदी प्रथमच महिला. 

जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींची ३३व्या स्थानावरून विसाव्या स्थानावर झेप. सलग चौथ्या वर्षी बिल गेट्स प्रथम स्थानावर. 

२४ मार्च : इंद्रा नूयी, फरीद झकेरिया यांना एलिस आयलंड पुरस्कार. स्थलांतरित नागरिकांसाठीचा अमेरिकेतील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. यात दिनेश पालीवाल, डॉ. अन्नपूर्णा एस. किणी, यशवंत पटेल, मोहन पटेल व डॉ. आदिल भारतीय या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचाही समावेश.

६ मे : इंग्लंडमधील राजगौरी पवार या बारा वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीने बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीत १६२ गुण मिळवून ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांना मागे टाकले.

२१ मे : अरुणाचल प्रदेशातील दोन मुलांची आई असलेल्या अंशू जामसेनपा या महिलेने एव्हरेस्ट शिखर पाच दिवसांत दोनदा आणि एकूण पाच वेळा सर केले. अशी कामगिरी करणारी पहिली महिला.

२७ जून : फेमिना मिस इंडिया २०१७ या सौंदर्यस्पर्धेमध्ये हरियाणाची सौंदर्यवती मानुषी छिल्लरने ‘मिस इंडिया वर्ल्ड’चा किताब पटकावला. पुढे १८ नोव्हेंबर रोजी ती झाली मिस वर्ल्ड.  भारताची सहावी मिस वर्ल्ड. १७ वर्षांनी भारताला मान.

२३ जून : वृत्तपत्र, दूध यांच्याप्रमाणे डिझेलही घरपोच मिळणारे बेंगळुरू हे जगातील पहिले शहर बनले.

१३ जुलै : आकाश ‘सरस्वती’चा शोध. आकाशगंगेपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा अतिशय घन असा महासमूह भारतीय खगोलशास्त्रज्ञांना सापडला.

२२ सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी दूतावासातील प्रथम सचिव ईनम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानला टेररिस्तान असे संबोधून खडे बोल सुनावले.

७ ऑक्टोबर : पोलंडमधील मिस व्हीलचेअर जागतिक सौंदर्यस्पर्धेत बेंगळुरूची दंतशल्यचिकित्सक डॉ. राजलक्ष्मी एस. जे. हिला ‘मिस पॉप्युलॅरिटी टायटल.’

५ डिसेंबर : श्रीनगरच्या रस्त्यावर उतरून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अफ्शान आशिकची जम्मू काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड. आता देश आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार! तिच्या या विलक्षण प्रवासावर हिंदी सिनेमा बनणार.

७ डिसेंबर : देशातली पहिली हॅप्लोआयडेंटिकल ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मुंबईत चर्नी रोडमधील एचएन रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये यशस्वी. डॉ. श्वेता बन्सल यांनी ‘नन्ही’ या रक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीच्या उपचारांसाठी तिच्या वडिलांच्या बोन मॅरोतून स्टेम सेल्स काढून त्यांचे नन्हीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manisha Lele About 356 Days ago
Inspirational clip from BOI Keep it up !
0
0

Select Language
Share Link