Next
‘मी डेअरिंग करतो, रिस्क घेतो, म्हणून माझं नेपथ्य वेगळं’
BOI
Friday, May 05, 2017 | 01:11 PM
15 2 0
Share this article:

प्रदीप मुळ्येज्येष्ठ नेपथ्यकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले प्रदीप मुळ्ये यांच्याशी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मंगेश कदम आणि ‘रंगवाचा’चे संपादक मंडळ यांनी साधलेल्या संवादातून मुळ्ये यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळाली. या संवादाचे प्रसाद घाणेकर यांनी केलेले हे शब्दांकन. (मुलाखतीचा तिसरा भाग)
....................

- अलीकडे गाजत असलेल्या ‘प्रपोजल’ नाटकाच्या सेटबद्दल काय सांगाल? 
सुरेश चिखलेंचं हे संपूर्ण नाटकच रेल्वेच्या डब्यात घडतं. आधी एकदा मी या नाटकाला नकार दिला होता. मग राजन ताम्हाणेंनी दुसरा नेपथ्यकार घेतला होता. तेव्हा त्यांनी काय केलं, की एक लांबलचक लेव्हल घेतली आणि रेल्वे डबासदृश काही तरी केलं त्याच्यावर. रेल्वे दाखवलीच नव्हती; पण काही कारणानं हे नाटक पुन्हा माझ्याकडे आलं. साधारण पहिली चार-पाच पानं राजननी वाचून दाखवली आणि सेट माझ्या डोळ्यासमोर तयार झाला. इतक्या जलद गतीनं ही प्रक्रिया माझ्या कुठल्याही दुसऱ्या नाटकाबाबत झाली नव्हती. हे ‘वर्किंग ड्रॉइंग’ही वेगानं झालं. कारण एकसारखेच दोन किंवा चार एकत्र डबे बनवायचे होते. मापं मात्र मी प्रत्यक्ष लोकलच्या डब्याइतकीच घेतली. मला एकच मॉडेल करून भागलं; पण प्रत्यक्षात नाटक बघताना असं वाटतं, की मी या कामासाठी अख्खं आयुष्य घालवलं की काय! ट्रेनचा सेट बनवला. आता आत प्रसंग घडणार. मग तो दिसणार कसा, याविषयी खूप विचार सुरू होता. मागे जाणारी स्टेशन्स दिसण्यासाठी प्रोजेक्टर वापरावा यावरही चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं, की मी अत्यंत स्वस्तात तुम्हाला हे करून देतो. प्रोजेक्टरची गरज नाही आणि संपूर्ण भारतात असा एकही रंगमंच नाही, की जिथं तुम्ही मागून किंवा पुढून संपूर्ण स्टेज प्रोजेक्टरनं कव्हर करू शकाल. गाडीची गती दाखवण्यासाठी झाडं, बिल्डिंगचे फ्लॅट्स सरकवायचे, अशी एक कल्पना आली; पण या नाटकाचे दोन्ही अंक घडतात ती रात्रीची वेळ आहे. ठाण्याहून कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमधून रात्री बाहेर दिसतंय काय? फक्त काळोख आणि स्टेशनचे प्लॅटफॉर्म्स्. म्हणून मी फक्त स्टेशनच्या नावाच्या पाट्या ट्रेनच्या गतीप्रमाणे दिसतील अशा दाखवायच्या ठरवलं. अर्थात ही कल्पना उत्तम असली, तरी ती तितक्या सफाईनं बॅकस्टेजवाले करतात म्हणूनच शक्य होतं. आता प्रश्न होता, की डब्यात घडणारा प्रसंग प्रेक्षकांना दिसणार कसा? मी इथं सिनेमाचं तंत्र वापरलं. म्हणजे नायक डब्यात असतो आणि नायिका धावत-धावत येऊन ट्रेन पकडते. तो तिला आत घेतो आणि समोरची डब्याची भिंत काढून टाकली की प्रसंग दिसायला लागतो. 

- ही काही तुम्हाला समाधान देणारी उदाहरणं झाली; पण आपलं काम पूर्णपणे फुकट गेलं, फसवलं गेलं, असं कधी झालंय का?
‘कमळीचं काय झालं’ हे विनय आपटेंनी कलेलं त्यांचं शेवटचं नाटक हे याचं उदाहरण आहे. मी त्यासाठी चांगलं नेपथ्य सुचवलं होतं; पण विनयचा हट्ट होता, की आपण ‘फिरता रंगमंच’ वापरायचा.....‘एक बार रिव्हॉल्व्हिंग तो करेंगे.’ त्या नाटकाची मागणी फिरत्या रंगमंचाची नव्हती. तशी गरजच नव्हती; पण विनयहट्ट! मग मी ते सगळं केलं; पण बघतानाच माझ्या लक्षात आलं, की हे फारच वाईट होतंय, झालंय. विनयच्याही ते लक्षात आलं. पुढे त्यांनीही ‘फिरता रंगमंच’ थांबावायला सुरुवात केली. त्याच्या दुर्दैवानं आणि माझ्या सुदैवानं हे नाटक फार चाललं नाही आणि माझी नाचक्की थांबली.

- प्रदीपजी, तुमची स्वत:ची एक विचारधारा आहे. काही ठाम मतं आहेत. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयी तुम्ही तन्वीर पुरस्कार स्वीकारताना व्यक्तही झाला आहात. असं असताना, व्यवसायाचा भाग म्हणून तुम्हाला न पटणारी संहिता आली तर तुम्ही त्याचं नेपथ्य करता का?
खरं म्हणजे मी मला पटलं नाही तर असं नाटक करतच नाही; पण प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला आहे. मंगेश, तुला ‘नथुराम’बद्दल विचारायचंय ना? या निमित्तानं मीही आता मोकळा होतो. अगदी पहिल्यांदा ही संहिता माझ्याकडे आली, तेव्हा मी ती फेकून दिली; पण मग विनयशिष्टाई सुरू झाली. तेव्हा मला कामं देणारा विनय आपटे हा एकमेव निर्माता होता. तो मला म्हणाला, की तू हे नाटक ‘थ्रिल’ म्हणून कर. मग मीही थ्रिलरची ट्रीटमेंट या नाटकाला दिली. आता हे त्याला एकही इफेक्ट वापरत नाहीत. केवळ प्रपोजल म्हणून ते आता सादर केलं जातं. मी हे थ्रिलर म्हणून केलं आणि त्या वेळी त्यात खूप गिमिक्स वापरली. शेवटी नथुरामला फाशी देतात, तेव्हा नथुराम अगदी वरून प्रेक्षकांसमोर यायचा, मागे शॅडोमध्ये खटका दाबताना दिसायचा आणि प्रेत एकदम समोर यायचं. गांधीजींना तो गोळी मारतोय आणि हळूहळू मागचा स्क्रीन लाल व्हायला लागायचा आणि पूर्ण लालभडक व्हायचा एका क्षणी. पहिल्या निवेदनाच्या सुरुवातीला त्याची सावली ‘लार्जर दॅन लाइफ’ दिसते आणि ती सावली हळूहळू कमी होत जाते. प्रत्यक्ष मानवी आकाराची होते आणि तिथून खरा नथुराम बाहेर पडतो आणि निवेदनाला सुरुवात करतो, अशीही प्रकाशयोजना मी केली होती. मला नथुराम ‘लार्जर दॅन लाइफ’ करायचा नव्हता. जेव्हा या नाटकाला राजकीय वळण लागलं, तेव्हा पाचव्या प्रयोगानंतर मी या नाटकात माझं नाव वापरायचं नाही ही अट घातली. कारण ते माझ्या मताविरुद्धचं नाटक होतं. अर्थात तेव्हा मी हे जाहीरपणे लोकांसमोर आणू शकलो नाही. एक तर विनयमुळे माझ्यावर एक शिक्काच बसला होता आणि काही लोक मला ‘मुळ्ये’ म्हणजे ब्राह्मण समजायचे. मी इथल्या कणकवलीचा मुळे-परब आहे हे माहीतच नाही लोकांना. 

- नेपथ्यरचना करताना नेपथ्यकार नाट्यसंहितेचा विचार कशा पद्धतीनं करतो? मराठी रंगभूमीवरचा ‘दिवाणखाना’ नेपथ्यरचनेतून बाद करणं नेपथ्यकाराला शक्य आहे का?
- मी तुमच्या उपप्रश्नाचं उत्तर आधी देतो. त्यातून मुख्य प्रश्नाचं उत्तर मिळेल असं वाटतं. जोपर्यंत नाटककार रंगभूमी, रंगमंच या माध्यमावर हुकूमत मिळवत नाहीत, तोपर्यंत ‘दिवाणखाना’ मराठी नाटकातून जाणार नाही. मराठी नाटककारच दिवाणखान्यातून बाहेर पडायला तयार नाहीत. उदाहरणार्थ : जयवंत दळवींच्या ‘स्पर्श’ या नाटकाची संहिता तुम्ही वाचलीत, तर तुम्हाला असं आढळून येईल. पहिलं पानभर दळवी, ज्या वास्तूत नाटक घडणार आहे त्याच्या भोवतालचं, परिसराचं एवढं चांगलं वर्णन करतात की, माझ्यासारखा नेपथ्यकार भारावून जातो. त्याला त्यात नाटकाच्या विषयाशी सुसंगत अशा अनेक गोष्टींचं वर्णन आढळतं; पण त्या वर्णनाच्या शेवटी दळवी म्हणतात, ‘हे सर्व दिसत नाही, दिसतो तो दिवाणखाना.’ मला वाटतं, ज्या अर्थी दळवींना हे वर्णन करावंसं वाटतं, त्या अर्थी तो सभोवताल ही त्या नाटकाच्या विषयाची गरज आहे; पण कदाचित दळवींना हे सर्व रंगमंचावर आपण दाखवू शकू का, याबद्दल शंका होती.  मुळात व्यावसायिक नाटकांची मर्यादा आपण लक्षात घेऊ. शिवाजी मंदिरचं २७ फुटांचं ओपनिंग, बसवर सेट घेऊन जायचं म्हणजे त्याचे फोल्ड्स धरून किती उंची ठेवायची, देवदार लाकूड, प्रॉप्स किती वापरायचं याचा विचार केला, की नंतरच सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी हा विचार येतो. 

- नेपथ्यकला ही विशेष कला आहे, याचा अभ्यास असावा लागतो, असं तुम्हाला वाटतं का? हल्ली इंजिनीअर, इंटेरिअर डिझायनर नेपथ्य करताना दिसतात. त्यात आणि तुम्ही करत असलेल्या नेपथ्यात नेमका काय फरक असतो?
- सेट डिझायनिंगला बेसिक डिझायनिंगची जशी मूलतत्त्वे आहेत, तशीच मूलतत्त्वे आहेत. म्हणजे कागदाचे नऊ भाग केले तर मधल्या चौकोनाचे जे चार बिंदू येतात ते महत्त्वाचे असतात. आपला हा कागद आडवा केला, की रंगमंच तयार होतो. यात अपस्टेज/डाउनस्टेज या संकल्पना येतात. अपस्टेज हे तात्कालिक, केवळ प्रवेशाकरिता (एंट्री), फारसे महत्त्व नसलेल्या प्रसंगासाठी वापरायचे असते आणि महत्त्वाचे सर्व आशयघन प्रसंग ‘डाउनस्टेज’ला करायचे ही माहितीच मुळात फार थोड्या जणांना आहे. अपस्टेज/डाउनस्टेज ही संकल्पना तर दिल्लीच्या एनएसडी येथील तीन वर्षांच्या प्रशिक्षणातही कुणी सांगत नाही. रससिद्धांतासारख्या रंगभूमीवरील अवकाशाचा नेमका उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्याकडे कुठल्याही नाट्यविषयक अभ्यासात याचा समावेश नाही. नेपथ्य म्हणजे नुसती कला नाही, ते विज्ञान आहे, गणित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो नेपथ्य करतो, करू इच्छितो त्याला ‘नाटक’ या माध्यमाची जाण हवी. या माध्यमाची शक्तिस्थानं आणि मर्यादा यांचं भान हवं. नेपथ्य हे नाटकाच्या आशयाला पूरक हवं, ते मारक ठरता कामा नये. लेखकानं संहितेत जे अव्यक्त ठेवलं आहे, ते नेपथ्यातून व्यक्त व्हायला पाहिजे. 

तुम्ही इंजिनीअर/इंटेरिअर डिझायनर यांचा उल्लेख केला. त्या क्षेत्रातले ते तज्ज्ञ असले, तरी नाट्यमाध्यमाची जाण ही नेपथ्य करण्याची प्राथमिक गरज आहे. आपल्याकडे थेट रंगीत कापड वापरायला मी सुरुवात केली. त्यामुळे माझी रंगसंगती इतरांपेक्षा वेगळी असते आणि प्रभावी असते. नाही तर आपल्याकडे मांजरपाटाला एक बेसिक पांढरा रंग द्यायचा आणि मग त्यात हव्या त्या रंगाचा स्टेनर टाकून त्याला रंगवायचा अशी प्रथा आहे. हा मिश्ररंग कधीच मूळ रंगाइतका परिणामकारक होत नाही. 

मी नाटकातलं फर्निचर स्वत: डिझाइन करतो. तुम्हाला कधीही माझ्या नेपथ्यातले सोफे, खुर्च्यांची बिजागरं दिसतायत, असं होणार नाही. अजित दांडेकर, मी, श्याम अडारकर यांसारखे काही जण दाराची जाडी दाखवतो. त्यामुळे त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश वेगळा दिसतो. गरज असेल तर काळ्या रंगाच्या विंगा व्यावसायिक नाटकातही वापरल्या आहेत. माझ्या सुदैवानं अगदी सुरुवातीपासून मला कोणी ‘नवशिका’ समजलं नाही. त्यामुळे मी डेअरिंग करतो, रिस्क घेतो आणि म्हणून माझं नेपथ्य वेगळं दिसतं. 

- मघाशी तुम्ही ‘जावई माझा भला’ किंवा ‘प्रपोजल’च्या वेळी कॅमेरा फॉलोअप करतो तसा परिणाम देण्याचा प्रयत्न मी करतो, असं म्हणालात. मग टीव्ही, सिनेमा या माध्यमांनी तुम्हाला कितपत खेचून घेतलं? 
- ‘दुर्गा झाली गौरी’चं व्हिडिओ चित्रिकरण झालं, तेव्हापासून मी हे काम करतोय. हिंदीमधील ‘लाइफ-लाइन’, मराठीतील ‘स्त्री-जातक’ या मालिकांचं कलादिग्दर्शन आणि वेशभूषा मी केलेली आहे. गो. नी. दांडेकरांच्या ‘शितू’ या कादंबरीवर आधारित कोकणी भाषेतील दूरदर्शनपटाचं कलादिग्दर्शन आणि दिग्दर्शन (ही जबाबदारी नंतर माझ्याच गळ्यात अल्यामुळे) मी केलं आहे; पण मला याच्यापेक्षा रंगभूमीच्या २७ फुटी मर्यादेत जी मजा करता येते, जे थ्रिल मिळतं, ते जास्त आवडतं म्हणून मी या माध्यमात अगदी मोजकंच काम केलं आहे. अलीकडे मी आणि भावानं मिळून स्वामी चिन्मयानंद मिशनचंही भव्य काम केलं. त्याची मजा, त्यातली आव्हानं वेगळीच. 

- ‘इंदू काळे-सरला भोळे’, ‘चार मोजायचा नाही’, ‘ड्राय डे’ यांच्या दिग्दर्शनाविषयी आणि नवीन काही प्रकल्प?
- ‘इंदू काळे-सरला भोळे’ ही कादंबरी अतिशय नाट्यमयरीत्या माझ्याकडे आली. ‘बिलट्झ’ या इंग्रजी दैनिकाच्या लायब्ररीतली काही पुस्तकं कमी करायचं ठरवलं गेलं, त्यात ही मराठी कादंबरी होती. माझ्या एका मित्रानं मी मराठी वाचतो म्हणून मला ही कादंबरी आणून दिली. मी ही वाचायला सुरुवात करायचो आणि नंतर कंटाळा आला म्हणून १०-१५ पानं झाली, की सोडून द्यायचो. असं तीन-चार वेळा झाल्यावर माझी आणि या पुस्तकाची लय जुळली. त्या काळात म्हणजे १९९३मध्ये अशी पत्ररूपानं कोणी कादंबरी लिहिली याचंच मला खूप अप्रूप वाटलं. ‘तुम्हारी अमृता’चं कौतुक करत त्याच्या कितीतरी आधी वामन मल्हार जोशींनी हा जो प्रयोग केला त्याची दखल घ्यावी असं मला वाटलं. म्हणून मी ते रंगमंचित करायचं ठरलं. अर्थात ती मराठी भाषा तोंडवळणी पडायला खूप श्रम घ्यावे लागले. सगळ्या कलावंतांनी ते घेतले. मला संहिता खूप आव्हानात्मक वाटली आणि दिग्दर्शित करावीशी वाटली तर मी करतो. या वर्षी तर मी दोन व्यावसायिक नाटकं दिग्दर्शित करणार आहे. नेपथ्यही बहुधा मीच करीन; पण आता नेपथ्याचे काम करणार नाही. 

- पूर्वीही तुम्ही नाटकांपासून ब्रेक घेतला होतात. यंदाही काही करणार नाही असं म्हणता, याचं कारण काय?
- मला खूप गोष्टी करायला आवडतात आणि जेव्हा एखादी गोष्ट रुटीन होते, त्यात तोच-तोचपणा येतो, साचलेपण येतं तेव्हा कंटाळा येतो. आता इतकी वर्षं नेपथ्य करून नवीन देण्यासारखं आपल्याकडे काही नाही असं मला वाटतं. मंगेश, विजय, चंद्रकांत कुलकर्णी यांसारखे दिग्दर्शक नेहमी नवीन देतो असं म्हणत असले, तरी मला माझ्या कामातला सराईतपणा माहीत आहे. इतकी वर्षं या व्यवसायात काढल्यावर माझ्याच गोडाउनमध्ये नाटकाला लागणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मी त्याच गोष्टी किंचित बदल करून वापरतो आणि नवेपणाचा भास होतो; पण ते काही खरं नाही. मला आता काही नवीन केल्याचं समाधान मिळत नाही. पैसा मिळतो; पण मजा येत नाही. म्हणून मी असा ब्रेक घेतो. 

- नाटकाची संहिता हा मूळ दस्तऐवज असतो; पण दिग्दर्शक, अभिनेते यांनी लिहिलेल्या आठवणींतून, स्वत:च्या प्रवासातून अथवा आत्मचरित्रांतून प्रयोगातील या बाजूचे बऱ्यापैकी दस्तऐवजीकरण झालेले आहे. नेपथ्यकार म्हणून आपल्या काही निवडक कामांची विस्तृत माहिती देणारं, त्या अनुभवांचं एखादं पुस्तक करावं, असं तुम्हाला वाटतं का?
- माझ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आता ज्या लेव्हलच्या गप्पा केल्या, त्याचं पुस्तक नाही होऊ शकत. पुस्तकामध्ये मला ‘रंगभाषा’ समजावून द्यायला हवी; पण ते वाचायला उत्सुक असणारे वाचक, ते समजून घेणारा वाचकवर्ग आहे का याबद्दल  मला शंका आहे. मला काही परिभाषा (टर्मिनॉलॉजी) वापरावी लागेल. ती किती कळेल याबद्दल मला शंका आहे. परिशिष्ट म्हणून द्यावी तर वाचकाला ती कितपत रुचेल याचाही मला अंदाज येत नाहीये. 

- नवीन मुलांमध्ये कोण चांगला नेपथ्यकार तुम्हाला दिसतो का?
- तितक्या निष्ठेनं काम करील असं मला आता तरी कोणी आढळत नाही. एकांकिका स्पर्धेमध्ये खूप वेगळं काम केलेलं आढळतं; पण ते एका प्रयोगापुरतं असतं. १०० लाइट्स वापरतात, फ्लॅट्स, विंगा वापरतात. त्यांच्याकडे बॅकस्टेजला हलवायला मुलं असतात. व्यावसायिक रंगभूमीच्या मर्यादा लक्षात घेऊन जी प्रयोगशीलता पाहिजे ती त्यांच्यामध्ये अजून तरी दिसत नाही.


या मुलाखतीचे तिन्ही भाग या लिंकवर उपलब्ध होतील. 

..................
रंगवाचा त्रैमासिक
ही मुलाखत ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
वेबसाइट : http://www.acharekarpratishthan.org/
 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search