Next
‘स्वप्न पूर्ण करते ती मुंबई’ : नवाजुद्दिन सिद्दिकी
BOI
Wednesday, January 23, 2019 | 06:57 PM
15 0 0
Share this story

सध्या ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटामुळे एक नाव सर्वांच्या ओठांवर आहे, ते म्हणजे नवाजुद्दिन सिद्दिकी. चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत ‘मुंबई ही सर्वांना सामावून घेणारी आहे. तिच्या छायेखाली राहून सर्वांची स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करते ती मुंबई’, अशा शब्दांत  नवाजुद्दिनने मुंबईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

एक सुंदर चेहरा, गोरा वर्ण यांसारख्या आजपर्यंत सांगण्यात आलेल्या हिरोच्या व्याख्येला छेद देत नवाजुद्दिन आज टॉप हिरोंच्या यादीत जाऊन बसला आहे. एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत आजपर्यंत त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे आणि आता महाराष्ट्राचे एक झंझावाती व्यक्तिमत्त्व साकारण्याची मोठी जबाबदारी नवाजुद्दिनने पेलली आहे. या भूमिकेमुळे त्याच्यातील अभिनय कौशल्याला पुन्हा एक नवी झळाळी मिळाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बाळासाहेबांच्या भूमिकेबाबत विचारणा झाल्यानंतर सुरुवातीला दडपण आले असले तरी नंतर आत्मविश्वास वाढत गेला असल्याचेही तो सांगतो.  

उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला नवाजुद्दिन बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत येतो आणि मग इथलाच होऊन राहतो याबाबत सांगताना नवाजुद्दिन मुंबईबाबत भरभरून बोलतो. ‘मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. इथे प्रत्येकजण आपली स्वप्ने घेऊन येतो आणि ही मुंबई त्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेते. एक वॉचमन ते सुपरस्टार हा १२ वर्षांचा खडतर प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सुरुवातीला दिल्लीत ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. प्रसंगी चहा-बिस्किटवर दिवस काढले. नंतर मुंबईत येऊन हळूहळू कष्टाचे फळ मिळत जावे तसे दिवस बदलत गेले. मुंबईने मला सगळे काही शिकवले आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या गावात असतानाच मी खूप मोठी स्वप्ने पाहिली होती, परंतु इतर कोणत्याच शहराने मला त्यासाठी दाद दिली नाही. तो काळ होता, मी दिवस-रात्र केवळ अभिनेता होण्याचीच स्वप्ने पाहत होतो. हळूहळू भूमिका मिळत गेल्या आणि मी समोर येत गेलो. माझी दखल घेतली जाऊ लागली. आव्हान देतील अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडत आले आहे आणि मी तशाच भूमिका केल्या आहेत. मी करत असलेली प्रत्येक भूमिका माझ्या आयुष्यावर परिणाम करणारी असते. माझ्यात बदल घडवणारी असते’, या सगळ्या गोष्टी सांगत असताना नवाजुद्दिनने आपल्या करिअरबाबत असलेल्या आपल्या मतांनाही उघड करून सांगितले. आपण बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणार आहोत, हे जेव्हा आपल्या आईला कळाले, तेव्हा ती खूप आनंदी झाली, असेही नवाजुद्दिनने सांगितले आहे. 

येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. हा चित्रपट नवाजुद्दिनच्या आयुष्याला आणि त्याच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरले, इतके मात्र नक्की...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link