Next
चांदण्यात फिरताना...
BOI
Tuesday, October 03, 2017 | 10:18 AM
15 1 0
Share this article:

रस, रंग, रूप ल्यालेली आश्विनातली हवा प्रत्येक वेळी नवी भासते. कोजागरीच्या चंद्रासारखी, चांदण्यांच्या बरसातीसारखी, शुभ्र, स्वच्छ, लख्ख चंदेरी प्रकाशासारखी... सुरेश भट यांच्यासारखा एखादाच कवी चांदण्याची श्रीमंती अनुभवू शकतो आणि ती श्रीमंती काव्यरसिकांना भरभरून देतो. पाच ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज आस्वाद घेऊ या ‘चांदण्यात फिरताना’ या कवितेचा...
...........
आश्विनातली हवा वेगळीच असते. तिला एक प्रकारचा गंध असतो... या गंधातून अनेक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींचे कवडसे देखणे असतात... चांदण्याची झिळमिळ झालर त्यांना असते. रस, रंग, रूप ल्यालेली आश्विनातली हवा प्रत्येक वेळी नवी भासते. कोजागरीच्या चंद्रासारखी, चांदण्यांच्या बरसातीसारखी, शुभ्र, स्वच्छ, लख्ख चंदेरी प्रकाशासारखी... हे वाचताना तुम्हाला थोडंसं हसूही येईल. कारण हवा कुठे दिसते का ? रंग, रस, गंध, रूपानं सजलेली आश्विनातली हवा... खरं सांगू सगळ्यांना नक्कीच जाणवते... पण तिचं वर्णन करण्यासाठी कवित्व सगळ्यांना थोडीच मिळालेलं असतं? सुरेश भट यांच्यासारखा एखादाच कवी चांदण्याची श्रीमंती अनुभवू शकतो आणि ती श्रीमंती काव्यरसिकांना अक्षरश: भरभरून देतो. आपण मात्र निमित्त शोधायचं कोजागरी पौर्णिमेचं... 
कोजागरी साजरी करू या असं म्हटल्याबरोबर केशरी दुधानं भरलेले प्याले आठवण्याऐवजी आशाताईंच्या स्वरांचं चांदणं आपल्याला आकंठ प्राशन करावं असं वाटतं, सुंदर सुंदर कविता आठवतात... आपल्या मनाच्या आभाळात कोजागरीचा देखणा पूर्ण चंद्र केव्हा उगवतो हे कळतही नाही. कवीच्या शब्दाचं चांदणं, ती चांदण्याची वेलबुट्टी पाहता आपण हरवून जातो. ‘बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग...’ कशी सुचली असेल ही ओळ? हा विचार करता करता मनातला पुनवपूर आवरता येत नाही. कानामनात आशाताईंचा जादुई आवाज घुमू लागतो... 

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात!

बघा किती सुंदर चांदरात... कविमनाला साद घालणारी... मग कवी शब्दांमध्ये ती गुंफतो... त्या सुंदर शब्दांची भुरळ संगीतकाराला पडते... तो स्वरांच्या पालखीतून त्या शब्दांना मिरवत मिरवत आशाताईंच्या गोड गळ्यातून रसिकांच्या थेट हृदयापाशी घेऊन जातो... मग कोजागरीचं चांदणं न्याहाळताना रसिक स्वत: हरवून जातो. चांदण्यांनी सजलेली वाट त्याला घेऊन जाते स्वरानंदाच्या सर्वोच्च बिंदूपाशी... तिथं अनुभवायला येतं फक्त स्वरांचं चांदणं आशाताईंच्या गळ्यातून अवतरलेलं... हृदयनाथ मंगेशकरांनी सप्तसुरांमध्ये गुंफलेलं...

निजलेल्या गावातून
आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे
पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

किती सुंदर कल्पना! दूर जळणाऱ्या दिव्यांना ‘कळलावे’ म्हणणं हे भटसाहेबांनाच शोभतं... दिव्यांचा प्रकाश सगळं उघड करतो हो... सगळीकडं सांगत बसतील ते गुपित... तुझ्या माझ्यातलं... बघ त्या कळलाव्या दिव्यांना मागे सोडून, झोपेच्या आधीन असलेल्या गावातून केवळ तुझ्यासाठी मी एकटी निघून आलेय... आता कळलाव्या दिव्यांची पर्वा नाही... चांदण्यात फिरताना तू माझा धरलेला हात... या झाडांच्या सावल्यांनीही पाहिलाय... जाणतात रे त्या सारं... आता फक्त तूच मला सावर... या चांदरातीला आवर... खरं म्हणजे सावरण्यासाठी तुझीच तर मदत होणार आहे... कारण

सांग कशी तुजविनाच
पार करू पुनवपूर?
तुज वारा छळवादी
अन हे तारे फितूर!
श्वास तुझा मालकंस! स्पर्श तुझा पारिजात!
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...

व्वा, क्या बात है! श्वासाला मालकंसाची आणि स्पर्शाला पारिजाताची उपमा! सुरेश भट यांचं कवित्व, त्यांची अफाट कल्पनाशक्ती आणि प्रतिभा जाणून घ्यायची असेल ना, तर त्यांची अशी चांदण्यांनी बहरलेली कविता आवर्जून ऐकावीच... कोजागरीची रात्र, आश्विनातला धुंद मंद गारवा आणि चांदण्यात फिरताना... हे गाणं! डोळे मिटायचे... रस, रूप, गंध, स्पर्शाची दिव्य अनुभूती देणारं आशाताईंच्या स्वरांनी बहरलेलं हे गाणं ऐकतच राहायचं... आणि कोजागरी साजरी करायची... ‘मालकंस’ हा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरातला राग सुरेश भट यांना कसा आठवला असेल! श्वासाची लय मालकंसी वाटते, तर स्पर्श पारिजातकाचा... मऊ, कोमल, नाजूक प्रीतीची भावना पारिजातकासारखीच अप्रतिम... कवी सुरेश भट यांच्या प्रत्येक शब्दातील भाव हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरांनी असा काही टिपलाय आणि आशाताईंनी असा काही गायलाय की चांदणंसुद्धा रोमांचित होत असेल... स्वरांच्या पुनवपुरात चंद्रसुद्धा आकंठ बुडत असेल... प्रत्येक स्वरामधून फक्त चांदणं आणि चांदणंच बरसत राहतं... 

मूळ कवितेतली दोन कडवीच हृदयनाथ मंगेशकरांनी निवडली. स्वरशब्दांचं चांदणं असंच बरसत राहावं असं त्यांना वाटलं असेल. कारण तिसऱ्या कडव्यात ती म्हणते...

जाऊ चल परत गडे
जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे
गेली रे हिरमसून
तुझिया नयनात चंद्र! माझ्या हृदयी प्रभात!

खरंच गाणं संपूच नये... कोजागरीची रात्र संपूच नये... नयनातला चंद्र मावळूच नये. स्वप्नाची समाप्ती करणारी प्रभात होऊच नये... ऐकत राहावी ही आशाताईंच्या स्वरांनी मोहरलेली सुरेश भट यांची कविता... कोजागरीला नक्की अनुभवू या स्वरांचं चांदणं आणि सुरेश भट यांच्या कवित्वाचा पुनवपूर... श्वासातला मालकंस आणि स्पर्शाचा पारिजात. आजपासून पहात राहा ती चंद्रकोर... कोजागरीच्या पूर्णचंद्राकडे घेऊन जाईल ती... फक्त एकच करायचं... मनाचं आभाळ स्वच्छ करायचं आणि अनुभवायचं कोजागरीचं लख्ख चांदणं!!


- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dinesh Dagadkar About
एकच शब्द ...तो म्हणजे अप्रतिम केवळ अप्रतिम ।। धन्यवाद प्रतिमा मैडम या सुंदर विवेचनासाठी । - दिनेश दगड़कर
2
0
प्राजक्ता कुलकर्णी About
धन्य ते सुरेश भट जी आणि हा काव्य रस आणखीनच मधुर करून त्याचं इतकं सुरस विश्लेषण आमच्या पर्यंत पोहचवणार्या डाॅ. प्रतिमा मॅडम तुम्हीही धन्य !!!!! मस्तच !!!
2
1

Select Language
Share Link
 
Search