Next
वैचारिक प्रगतीची रुजवात
BOI
Friday, May 26, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना आचार्य गुरु गोविंददेव गिरी आणि मान्यवर

समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आज लिहिते-वाचते लोक मोठ्या संख्येने आहेत; मात्र त्यांना स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. विचारांचे आदान-प्रदान केल्याशिवाय वस्तुनिष्ठ समाजाचे चित्र समोर येत नाही. समाजात मोठ्या प्रमाणात सर्जनशील व्यक्ती असतात. अशा सर्व व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, वैचारिक क्षेत्रातील अस्पृश्यता घालवणे आणि विचारकलहाला आमंत्रण देणे, या तिहेरी हेतूने पुण्यात नुकतेच विचार भारती साहित्य संमेलन पार पडले. त्याबद्दल...
.....................................................

आपली अभिव्यक्ती अधिक ठाशीव करण्याचा आत्मविश्वास नव्या, उगवत्या लेखक-कवींमध्ये यावा, यादृष्टीने भारतीय विचार साधना आणि विश्व  संवाद केंद्राच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दृष्टीने पाहिल्यास या आयोजनाचा हेतू यशस्वी झाला, असे म्हणावे लागेल. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात हा एक दिवसाचा कार्यक्रम पार पडला. या संमेलनाचे अध्यक्ष होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि स्ट्रॅटेजिक ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर. वासलेकर यांच्या लेखनाबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. या निमित्ताने त्यांना ऐकण्याची संधी पुणेकरांना पहिल्यांदाच मिळाली.

भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशीतल, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचारप्रमुख दिलीपराव क्षीरसागर असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आचार्य गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम तत्त्वज्ञ आचार्य गोंविददेव गिरी यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेची अनेक उदाहरणे दिली. ‘जगात विचारप्रधान देश असेल तर भारतच आहे. वैचारिक अस्पृश्यता हा भारतीय परंपरेचा कधीही भाग नव्हता. सर्व दिशांनी विचार माझ्याकडे यावेत, हीच वैदिक ऋषी-मुनींची भूमिका होती. त्यामुळे मनुष्याच्या उन्नयनासाठी विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे,’ असे ते म्हणाले.

बीजभाषणात संबोधित करताना आचार्य गुरू गोविंददेव गिरी
आपल्या बीजभाषणात आचार्यांनी साहित्याची व्याख्या स्पष्ट केली. ‘जे लिहिले जाते, जे खपते ते सगळे साहित्य असते का याचा विचार कोणीतरी करायला हवा. ज्या साहित्याच्या वाचनाने, परिशीलनाने मनुष्याच्या पापवृत्तींचे उपशमन होते ते उत्तम साहित्य. जे जीवनाला सद्गुणांनी सजवते ते उत्तम साहित्य. मात्र जे वाचायला हवे ते कसे शोधावे हा प्रश्न निर्माण होतो,’ असे त्यांनी सांगितले.

साहित्याचा पुनर्विचार व्हायला हवा, हा विचार बऱ्याच दिवसांपासून मनात घोळत असल्याचे सांगून या संमेलनाच्या निमित्ताने त्याला मूर्त रूप आल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मनुष्याचे आंतरिक उन्नयन हवे असेल, तर विचार आवश्यक आहेत. मनुष्याचा विकास बुद्धीमुळे झाला आहे आणि विचार हे बुद्धीचे कार्य आहे. मानवी मनाचे खरे उन्नयन होते व त्याला अंतिम स्थिती प्राप्त होते, ते विचारांमुळे. भारताची परंपराच मुळात विचारांची परंपरा आहे. समाजात सगळेच विकारांवर जगणारे नाहीत. तसेच स्वातंत्र्य विचारांचे हवे, विकारांचे नाही. केवळ तर्काने आपल्याला या विश्वाचे गूढ उकलणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाचे प्रमुख वक्ते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक संदीप वासलेकर
सर्वांना उत्सुकता होती ती वासलेकर हे काय बोलतात ते ऐकण्याची. त्यांनीही विचारांची चर्चा करताना आपण सैद्धांतिक चर्चेवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज अधोरेखित केली. उद्घाटनाच्या भाषणात ते म्हणाले, ‘आज, काल आणि उद्या या विचारांचा संगम व्हायला हवा. साहित्याला संशोधनाची जोड देण्याची गरज असून, पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपण संशोधनात कमी पडतो. संशोधन हा आपल्या संशोधनाचा स्तंभ व्हायला पाहिजे. विज्ञान आणि वाङ्मय हे एकमेकांशी जोडलेले असते. तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान हे एकमेकांत पूर्ण मिसळलेले आहेत.’ पाश्चात्य विचार हा विश्लेषणावर आधारित आहे. भारतीय विचार हा संश्लेषणावर आधारित आहे, असा मूलभूत फरक मांडून त्यांनी त्याचे उदाहरणही दिले. 

उद्घाटनाच्या सत्रात स्वागताध्यक्ष प्रदीप रावत यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘इतर कुठल्याही संमेलनाशी या संमेलनाची स्पर्धा नाही. वैचारिक अस्पृश्यता संपवणे, हा या संमेलनाचा उद्देश आहे. हे विचारकलहाला निमंत्रण आहे. विचार खऱ्या अर्थाने मुक्तपणे मांडता येतील अशी यामागची संकल्पना आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरत नाही. चांगल्या, सकस साहित्याची निर्मिती ही सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असते. कुठल्याही कलेच्या विकासासाठी व्यक्तिस्वातंत्र्य आवश्यक असते. पारंपरिक कल्पनांचे जोखड फेकून देऊ तेव्हाच सकस साहित्याची निर्मिती होते.’

‘हे संमेलन विज्ञान व अध्यात्माचा संगम करण्यासाठी आहे. हे संमेलन जीवनवादी साहित्याची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी आहे . कोणत्याही विचारधारेचा प्रसार करण्यासाठी किंवा कोणत्याही विचारधारेला विरोध करण्यासाठी नाही. हे संमेलन नैतिकतेच्या पायावर जीवनवादी साहित्य उभे राहावे यासाठी आहे,’ असे संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार म्हणाले.

‘साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज’

संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘व्यक्ती, समाज आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. ज्येष्ठ निवेदक व लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे  या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रभाकर पुजारी, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. सुप्रिया अत्रे आणि विनय पत्राळे या परिसंवादातील वक्ते होते. या वेळी बोलताना डॉ. मेहेंदळे म्हणाले, की आज दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या रूपाने अत्यंत चुकीचे चित्र उभे करण्यात येत असून, समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी साहित्यिक व लेखकांची आहे. त्यामुळे साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे.

दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘मातृभाषेतून मनःशांती’ हा कार्यक्रमही झाला. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात व धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवायची असेल, तर मातृभाषेची साधना केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी खुमासदार शैलीत पटवून दिले. या वेळी अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘लोकहो, मराठी विकिपीडियावर सक्रिय व्हा’

प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांनी तिसऱ्या सत्रात विकिपीडियावर मराठीतून योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. शासकीय विश्वकोश हा बहुतांशी दुर्बोध झाल्यामुळे, तसेच नवीन माहितीची सातत्याने भर पडत असल्यामुळे आंतरजालावरील विकिपीडिया या ज्ञानकोशासाठी प्रत्येकाने योगदान करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. 

पर्यावरण आणि जैवविविधता यावर कार्य करणारे तज्ज्ञ म्हणून प्रा. गाडगीळ यांची ओळख आहे; मात्र तेच माधव गाडगीळ मराठी भाषेत ज्ञान-विज्ञान वाढावे आणि या माहिती युगात मराठी मागे पडू नये, यासाठी हिरीरीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी कळकळीने मराठीजनांना घातलेली ‘मराठी विकिपीडियावर सक्रिय व्हा’ ही साद वेगळा अनुभव ठरली. 

अनेक साहित्य संमेलनांत मराठी भाषा जिवंत ठेवण्याविषयीचे ठराव केले जातात. परंतु मराठी भाषा जिवंत ठेवायची म्हणजे नेमके काय करायचे, याबद्दल कोणी ठोस कार्यक्रम देत नाही. हा विचार या संमेलनात मराठी विकिपीडिया सत्राच्या माध्यमातून देण्यात आला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी भाषा ही केवळ साहित्याचीच नव्हे, तर जोपर्यंत ती ज्ञानभाषा होत नाही, तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने समृध्द होणार नाही. आणि ती टिकवण्यासाठी मराठी साहित्यातील ज्ञानभांडार विकिपीडियाच्या माध्यमातून  समाजासमोर आले पाहिजे, हा विचार या सत्रात देण्यात आला.

चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. या कविसंमेलनात बंडा जोशी, आश्लेषा महाजन यांच्यासह नामवंत कवींनी सहभाग नोंदवला. माजी आमदार विश्वास गांगुर्डे या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते, तर अमृता खाकुर्डीकर आणि दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बंडा जोशी यांचा विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह रवींद्र घाटपांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जीवन आनंदी करण्यासाठी सकारात्मक व्हा

समारोपाच्या सत्रात वासलेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ गो. बं. देगलूरकर या वेळी प्रमुख पाहुणे होते. ‘माणूस सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही विचार करू शकतो; मात्र आपण सकारात्मक विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजातील उणिवांचा सामना करताना सकारात्मक वृत्ती बाळगा आणि मानवी जीवन आनंदी करा,’ असे आवाहन त्यांनी केले.

या सत्रात पुण्यातील श्री ज्ञानेश्वर गुरुकुल संस्थेच्या वतीने सोलापूरचे प्रभाकर पुजारी यांचा ज्ञानेश्वर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रोख ३१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वासलेकर म्हणाले, ‘आपल्याला दहशतवादाविरुद्ध तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करायला हवी. मात्र त्यासाठी आपण नकारात्मक बनून चालणार नाही. हे विचार तरुणांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याची गरज आहे.’ मानवजातीच्या आजवरच्या वाटचालीची गोळाबेरीज केल्यास ती जमेचीच ठरते, असे निरीक्षण नोंदवत ते म्हणाले, ‘समाजातील कमतरतांवर कृती करा. परंतु मानवी जीवन अधिकाधिक सकारात्मक, अधिकाधिक आनंदी कसे होईल, याचा प्रयत्न करा.’

या वेळी बोलताना देगलूरकर म्हणाले, ‘ऋग्वेदकाळापासून आपले पूर्वज विचार करत आले आहेत; मात्र विचार नुसता करून चालणार नाही, तर चांगला विचार करणे आवश्यक आहे. साहित्य हे जीवनाला उपयोगी पडणारे असावे. माझ्या दृष्टीने मंदिरे ही सामाजिक संस्था होती. सर्व कलांचा उगम मंदिरांतूनच झाला.’ 

संमेलनाचे कार्यवाह प्रदीप नाईक यांनी आभार मानले. या एक दिवसाच्या संमेलनाला तिन्ही सत्रांत लेखक व कवींची चांगलीच उपस्थिती होती. या संमेलनाचे वैशिष्ट्य काय होते? तर ते केवळ मोजक्या सुशिक्षितांचे एकत्रीकरण नव्हते. सांघिक कार्याचा एक आदर्श या संमेलनाने घालून दिला. उदाहरणार्थ, ‘संस्कार भारती’च्या नयना कासखेडीकर,  अजिंक्य कुलकर्णी, आशय खाकुर्डीकर,  डांगे, उमेश खंडेलवाल यांनी व्यासपीठ व्यवस्था सांभाळली. नरेंद्र उंब्रजकर, स्वामिनी मोरे, मकरंद कुलकर्णी यांनी स्वागत व्यवस्था पाहिली, तर श्रीपाद देशपांडे,  गौतम यांनी वाहतूक व्यवस्था सांभाळली. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, रघुनाथ गौडा, राजेंद्र शिळीमकर, राहुल माने, राजेंद्र शेडगे व त्यांचे कार्यकर्ते या संमेलनाच्या यशासाठी अहोरात्र झटत होते. खुल्या वातावरणात बौद्धिक आदानप्रदान कसे घडावे याचा वस्तुपाठ या संमेलनाने घालून दिला.

एकुणात मराठीच्या सांस्कृतिक वातावरणात या संमेलनाच्या निमित्ताने एक पुढचे पाऊल पडले आहे.   ‘सुधारक’कार गो. ग. आगरकर म्हणत त्याप्रमाणे ‘यासाठी वाद, विवाद व संवाद होऊन त्यातूनच प्रगती शक्य आहे.’ या प्रगतीची रुजवात या निमित्ताने झाली आहे.
                                                                                               
- देविदास देशपांडे                                                                
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार असून, विश्व संवाद केंद्राचे कार्यकारिणी सदस्य आहेत)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search