Next
किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक
BOI
Saturday, July 14, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

अकस्मात येणाऱ्या अडचणीला तोंड देता यावे, यासाठी अनेक जण दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात; मात्र तत्काळ काही रक्कम उभारता यावी यासाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद करणे आवश्यक ठरते. या संदर्भात अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
.... 
अकस्मात येणाऱ्या आर्थिक अडचणीला तोंड देता यावे, म्हणून प्रत्येक जण शक्य होईल तेवढे पैसे बाजूला ठेवत असतो. अगदी घरकाम करणारी महिलाही दरमहा चार पैसे भिशीत गुंतवते किंवा बँकेत बचत खाते काढून त्यात पैसे साठवते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक सुरक्षेला जास्त प्राधान्य देत असल्याने पोस्टात, बँकेत बचत करतात. आयुर्विमा घेतात. बचतीची हीच सवय महाभयंकर आर्थिक संकटात आपल्या देशाचीही संरक्षक ढाल बनते. 

बचतीतून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास संपत्ती निर्माण होऊ शकते, ती वाढू शकते. अकाली मृत्यू, अपघात, गंभीर आजारपण, व्यवसायात अडचण किंवा मंदी वा काही अपरिहार्य कारणाने नोकरी जाणे अशा अनेक अडचणीच्या प्रसंगी ही बचत उपयुक्त ठरते. अडचणीच्या प्रसंगी पुरेसे आर्थिक पाठबळ अत्यंत आवश्यक आहे. याकरिता आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. असे नियोजन नसल्यास प्रसंगी उधार उसनवारी, कर्ज किंवा जवळील सोने, जागा किंवा शेअर्स यांसारख्या गोष्टींची विक्री करून परिस्थितीचा सामना करायची वेळ येते. विशेष म्हणजे अशी विक्री करताना आपल्याला बाजारभावाने विक्री करता येईलच असे नाही. प्रसंगी वेळेचे महत्त्व जाणून कमी किमतीस विक्री करावी लागते. कर्जाचा डोंगर डोक्यावर घ्यावा लागतो. त्याऐवजी गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडल्यास अगदी अल्प रक्कम गुंतवूनही संकटाची तीव्रता कमी करणे शक्य होते. 

आर्थिक समस्येवर मात करता यावी यासाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद करणे हितावह असते व ही रक्कम आपल्याला लगेचच मिळावी, म्हणून अशी रक्कम बँकेच्या बचत (सेव्हिंग्ज) किंवा लिक्विड शॉर्ट टर्म म्युचुअल फंडात गुंतवावी. यातून मिळणारा रिटर्न कमी असला, तरी गरजेच्या वेळी रक्कम लगेचच मिळू शकते. याशिवाय बँकेत ठेव असल्यास ठेव रकमेच्या ७५ ते ८० टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून त्वरित मिळू शकते. यावर व्याजही ठेवीच्या व्याजापेक्षा केवळ एक टक्का इतकेच जास्त द्यावे लागते. आपल्याला काही कालावधीनंतर पैसे मिळण्याची शक्यता असेल, तर सोने विकण्यापेक्षा त्यावर कर्ज घेऊन गरज भागविणे योग्य ठरू शकते. आजकाल बँका, तसेच गोल्ड लोन कंपन्या सहजगत्या सोने तारणावर कर्ज देऊ करतात. पोस्टाची एनएससी, शेअर्स, म्युचुअल फंड यांच्या तारणावरसुद्धा सहज कर्ज मिळू शकते; मात्र कमीतकमी कर्ज घेऊन ते वेळीच परत केल्यास व्याजापोटी कमी रक्कम भरावी लागते. गरजेनुसार कर्ज शक्यतो बँकेकडूनच घ्यावे. खासगी कंपन्या अथवा सावकाराकडून कर्ज घेण्याचे टाळावे. रोजच्या खर्चासाठी तरतूद करण्यासाठी सहज आणि तत्काळ पैसे उपलब्ध होतील अशा बचत योजनांची निवड करणे महत्त्वाचे ठरते. किमान रक्कम बँकेत बचत खात्यात ठेवणे यासाठी योग्य ठरते. 

दीर्घकालीन सुरक्षेसाठी आयुर्विमा, मेडिक्लेम यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुर्विमा घेताना टर्म इन्शुरन्सच्या पर्यायाचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मेडिक्लेम घेताना त्यात गंभीर आजारांचा समावेश आहे का, याची खातरजमा करून तशी योजना निवडणे उपयुक्त ठरते. अर्थात, प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर गुंतवणुकीचे हे पर्याय अवलंबून आहेत; मात्र आपत्ती टाळता आली नाही तरी योग्य नियोजन केल्यास एखाद्या आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक समस्येवर योग्य नियोजन केल्यास मात करता येऊ शकते, यात शंका नाही. 

 सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search