अंगणातली तुळस... ते एवढंसं रोपटं असलं, तरी तिच्याभोवती केवढं तरी मोठं विश्व विणलेलं असतं... आठवणींचं... तिचे अनेक उपयोग तर आहेतच, शिवाय श्रीकृष्ण, विष्णुलाही ती आवडते. आपल्या महाराष्ट्राचं आवडतं दैवत श्री विठ्ठल... त्यांची तर पूजा पूर्णच होत नाही तिच्याशिवाय. डोक्यावर तुळशीवृंदावनं घेऊन, मुखानं हरिनामाचा गजर करत हजारो वारकरी दर वर्षीप्रमाणे यंदाही वारीला निघाले आहेत. आज (नऊ जुलै) योगिनी एकादशीही आहे. त्या निमित्ताने तुळशीबद्दलचा एक ललित लेख..........
मध्यंतरी मी छोटंसं चांदीचं वृंदावन आणि त्यात तुळशीची छोटीशी फांदी पाहिली. ती मला खूप आवडली. माझ्या मुलीनं तर ती विकतच घेतली. रोज तिची पूजाही होऊ लागली. त्या चिमुकल्या तुळशीनं आणि वृंदावनानं माझ्या देवघराला शोभा आणली.
हे सार घडलं आणि माझ्या डोळ्यासमोर माझी वृद्ध आजी उभी राहिली. जात्यावर दळण दळण्याचा तो काळ होता. सुटीत आजीकडे गेले, की आजी पहाटे दळायला बसायची. दळताना छान ओव्या तिच्या मुखातून ऐकायला मिळायच्या. त्यात काही ओव्या नातवंडांसाठी असत, तर काही तिच्या लेकीसाठी असत. तुळशीच्या दोन-तीन ओव्या तर मला आजही आठवतात. आजी त्या तुळशीबरोबर जणू बोलत असे. ती म्हणायची -
तुळशी गं बाई नको हिंडू रानीवनी । वाड्याला माझ्या पैस जागा देते ग अंगणी ।।
अशी छान ओवी म्हणून ती जात्यात पुढचा घास टाकून जाते ओढायची. दुपारी ज्वारीच्या ताज्या पिठाची पांढरी भाकरी अधिकच गोड लागायची. त्यात आजीची माया आणि तिचे तुळशीवरील प्रेमही जणू समरस झालेले असायचे. तिची आणखी एक ओवी मला आठवली.
ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी । सावळे श्रीकृष्ण घरी आणावे जावई ।।
तुळशीला मुलगी मानण्याची ही कल्पना मला तेव्हाही आवडायची आणि आताही तेवढीच प्रिय आहे. अंगणात वाढलेली, खूप फांद्या फुटलेली नि मंजिऱ्यांनी फुललेली तुळस आजही नजरेसमोर दिसते. नंतर आईने लावलेली तुळसही आठवते. सकाळी आंघोळीनंतर आई व दादा दोघेही तुळशीची पूजा करीत. तिन्हीसांजेला आई तुळशीजवळ दिवा लावी. उदबत्ती लावून ठेवी. सारे वातावरण उदबत्तीच्या सुगंधाने भरून जाई. प्रसन्न होई.
आजी आणि आईच्या कोषातून बाहेर पडल्यावर तुळशीचे गुणधर्मही समजले. आपले पूर्वज दूरदृष्टीने तुळशीची पूजा करत होते. त्यात अंधश्रद्धा नव्हती, याची प्रचीती आली. काही आजारांमध्ये तुळशीची पाने, तुळशीचा रस, तुळशीचे तेल उपयोगी पडते. तुळशीचे बी थंड असते. ज्यांना उन्हाचा किवा उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांना तुळशीच्या बियांची खीर खायला सांगतात. अशी बहुपयोगी तुळस.

तुळशीला मुलगी मानलं, की पुढे तिचं मुलीसारखं सगळं कौतुक आलंच. तिची रोजची पूजा तर होतेच; पण तिचा रीतसर विवाहही आलाच. तिचं लग्नही काही साधसुधं नसायचं. गोरज मुहूर्तावर तिचं लग्न लागायचं. लाडू, करंज्या, शंकरपाळी, चकली असे फराळाचे तमाम पदार्थ आई करायची. पुरणपोळीचं जेवण असायचं. आम्ही मुलं अंगणात फटाके उडवत असू. तुळशीबाईचा थाट विचारूच नका. हिरव्या बांगड्या, केशरी किवा लाल रंगाची साडी, वेणी, कापसाचं वस्त्र... सगळं सज्ज असे. श्रीकृष्णपंतांसाठी छोटा शेला असे. वधूच्या मागे उभ राहण्यासाठी मोठ्ठा ऊसमामा आणला जात असे.
अंगण साफसूफ केलं जाई. सडा घालून सुंदर, रंगीबेरंगी रांगोळ्या घातल्या जात. रंगवलेल्या छान पाटावर सुशोभित तुळशीवृंदावन ठेवलं जाई. समोरच्या पाटावर बाळकृष्ण ठेवला जाई. दोघांमध्ये धरण्यासाठी झकास आंतरपाट असे. गुरुजींना त्या दिवशी खूप मागणी असे. कार्तिक शुद्ध द्वादशीला हा विवाह सोहळा पार पडत असे. या विवाहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुळशी विवाहानंतर लग्नमुहूर्त असतात नि नंतरच आपल्या मुला–मुलींचे दोनाचे चार हात होतात.
एकदा आमच्याकडे काही कारणांमुळे लग्नसमारंभ झाला नाही. सर्वांनाच चुकल्या-चुकल्यासारखं झालं. दोन दिवसांनी एका परिचितांनी विचारलं, ‘काय रे, तुमच्याकडे यंदा तुळशीचं लग्न झालं नाही का?’ माझा भाऊ हजरजबाबीपणे म्हणाला, ‘अहो आमची तुळस लहान आहे अजून. इतक्यात नाही उजवणार तिला आम्ही.’ सगळेच खूप हसले नि विषयही संपला.
तुळशीवृंदावनावरून आठवले ते महाराष्ट्राचे वाल्मिकी कै. ग. दि. माडगूळकर! त्यांचं गीतरामायण अविस्मरणीय आहे. त्यातील एकेका गाण्याच्या काही खास आठवणीही आहेत. ‘राम जन्मला गं’ या गीताविषयीची अशीच एक आठवण. रात्री जेवण आटोपल्यावर ‘गदिमा’ अंगणातल्या तुळशीवृंदावनाजवळ जाऊन बसले. रामजन्माचं गाणं त्यांना लिहायचं होतं. बराच वेळ गेला, तरी गाणं काही सुचेना. मध्यंतरी त्यांच्या पत्नी बाहेर डोकावून म्हणाल्या, ‘काय हो, झालं की नाही लिहून?’ त्यावर ते म्हणाले, ‘छे गं, काही सुचत नाहीये. आणि अगं, राम जन्मायचाय, तो काय माडगूळकर थोडाच आहे?’ परत काही वेळानं पत्नी बाहेर डोकावल्या नि त्यांनी विचारले, ‘अहो अजून तरी काही प्रसवलं की नाही? ‘गदिमां’नी तेवढंच ऐकलं नि त्यांचं गीत कागदावर उतरलं...
चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी । गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती।।
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला । राम जन्मला गं सखी राम जन्मला ।।
या अजरामर गीताचा जन्म झाला. गेली ५०-५५ वर्षं आपण या गीताचा आस्वाद घेत आहोत.
अशी ही तुळस! तिची नावंही किती सुंदर! वृंदा, विष्णुप्रिया, हरिप्रिया वगैरे वगैरे. ती विष्णूला प्रिय आहे, श्रीकृष्णालाही ती आवडते आणि आपल्या महाराष्ट्राचं आवडतं दैवत श्री विठ्ठल, त्यांची तर पूजा पूर्णच होत नाही तिच्याशिवाय. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगात विठ्ठलाचं वर्णन करतात -
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया ।
तुळसीहार गळा कासे पीताम्बर आवडे निरंतर हेचि ध्यान ।।
ही तुळस दारात असते, तेव्हा भरपूर प्राणवायू देते. वातावरण प्रसन्न ठेवते. यासाठी दारी तुळस असावी. ती पवित्र आहे, बहुगुणी आहे, बहुपयोगी आहे. देवाच्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवतो, तीर्थातही तुळशीचं पान असतंच.

आपल्या बोलण्यातही तुळशीचा उल्लेख असतोच. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं’ किंवा ‘सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून मी काय करू,’ असाही वापर आपण करतो. परस्पर उपद्व्याप करणाऱ्या माणसाला आपण ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला याचं काय जातंय,’ असंही म्हणतो.
...तर अशी ही तुळस अंगणातच वस्तीला असते. दिवेलागणीला तिला दिवा लावला नि नमस्कार केला की मन प्रसन्न होतं, घर आनंदानं, प्रसन्नतेनं भरून जातं. तिला हात जोडावेत नि म्हणावं -
तुळसी श्रीसखी शुभे पापहरिणी पुण्यदे ।
नमस्ते नारदमुने नारायणी मनःप्रिये ।।
- प्रा. अरुणा महाळंक, पुणे
मोबाइल : ९३२५६ ६८९७८