Next
‘मसाप’च्या संदर्भ ग्रंथालयाचे आधुनिकीकरण
BOI
Thursday, May 25, 2017 | 12:48 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमदार जयदेव गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून चार लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ‘मसाप’चे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात ५० हजारांहून अधिक जुने व नवे ग्रंथ आहेत. या ग्रंथालयात दुर्मीळ नियतकालिके, सर्व प्रकारचे शब्दकोश, संदर्भग्रंथ असल्यामुळे ते नेहमीच संशोधक आणि अभ्यासकांनी गजबजलेले असते. परिषदेचे आजीव सभासद, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, यांचा या ग्रंथालयात नेहमीच राबता असतो.

प्रा. जोशी म्हणाले, ‘‘मसाप’च्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यासक, संशोधकांचा आणि वाचकांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक लेखक आणि प्रकाशकाला आपले नवे पुस्तक या ग्रंथालयात असावे असे वाटते. त्यामुळे परिषदेच्या ग्रंथालयासाठी आवर्जून पुस्तके पाठवली जातात. पुरस्कारासाठी आलेली आणि ‘मसाप’ पत्रिकेकडे अभिप्रायासाठी आलेली पुस्तकेही नंतर ग्रंथालयात जमा केली जातात. अगोदरच मौल्यवान अशा जुन्या संदर्भ ग्रंथांनी ग्रंथालयाचा बराचसा भाग व्यापलेला आहे. त्यामुळे नव्या पुस्तकांसाठी पुरेशी जागा नाही. म्हणून ही पुस्तके कपाटात ठेवण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. यामुळे वाचकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी आणि वाचकाना ग्रंथ सहज चाळता यावेत, यासाठी नव्या पद्धतीने फर्निचरची मांडणी करण्यात येणार आहे. तसेच वाचकांना तिथेच बसून ग्रंथ वाचता येतील अशीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी आमदार जयदेव गायकवाड यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.’

ग्रंथालयाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीच्या निमित्ताने ‘मसाप’ने आयोजित केलेल्या बाबासाहेबांवरील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आमदार जयदेव गायकवाड परिषदेत आले होते. त्या वेळी त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली. त्या दरम्यान कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे,  कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी ग्रंथालयाच्या अद्ययावतीकरणासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. ग्रंथांची नीट व्यवस्था करण्यासाठी ग्रंथालयाच्या इमारतीत बदल करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी तातडीने हा निधी उपलब्ध करून दिला.’
 
कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास

परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाची ‘वा. गो. आपटे इस्टेट ट्रस्ट’ सदाशिव पेठेत होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधून १९४९ साली १० हजार रुपयांची देणगी मिळवली. ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. १९५१च्या मे महिन्यात वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची स्थापना झाली. या ग्रंथालयातून दुर्मीळ आणि संदर्भात्मक ग्रंथ वगळता कोणतेही पुस्तक सभासदांना घरी वाचण्यासाठी दिले जाते. ‘मसाप’ ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरणही लवकरच करण्यात येणार आहे. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यासाठी परिषदेने सुरू केलेल्या ग्रंथ दत्तक योजनेला साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मिलिंद जोशी यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search