Next
पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’
प्रेस रिलीज
Friday, February 02, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गाजलेल्या नाटकांच्या, पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातील नाट्यसत्ताक रजनी यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मोठ्या उत्साहात पार पडली. नाट्यरसिकांना एकाच छताखाली अनेक उत्तमोत्तम नाटकांचा अनुभव देणाऱ्या या महोत्सवातील शेवटचे पर्व असलेल्या रजनीच्या माध्यमातून पुणेकरांना खऱ्या अर्थाने एक वेगळी नाट्यानुभूती यानिमित्ताने मिळाली.

बालगंधर्व रंगमंदिरात सचिन खेडेकर व चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मौनरागने रजनीची सुरुवात झाली. ‘पुढे देता का करंडक’, ‘२०२ एलिना’ हा माईम प्ले, त्यानंतर ‘सिक्रेट मराठी स्टँडअप’ व अखेरीस ‘सुखन’ या उर्दू मुशायऱ्याने रसिकांची पहाट शायरीमय करून टाकली. जवळपास ५५० लोकांनी संपूर्ण रात्रभर या सादरीकरणांचा अनुभव घेतला. केवळ नाट्यगृहच नाही, तर ‘बालगंधर्व’च्या बाहेरच्या बाजूसही रोषणाईमुळे प्रांगणात उत्सवी स्वरूप होते.

लोकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. विषेशतः तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. ‘इथे आलेला तरुण वर्ग हा केवळ रसिक नाही, तर जाणकार रसिक आहे,’ असे मत सचिन खेडेकर व चंद्रकांत कुलकर्णी यांनी सादरीकरणानंतर मांडले. रात्रभर एकापाठोपाठ अनेक सादरीकरणे होऊनही प्रेक्षकांनी प्रत्येक कार्यक्रमास तितक्याच मनापासून दाद दिली. पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेल्या ‘सुखन’च्या कार्यक्रमावेळेस गर्दीत आणखी वाढ पाहायला मिळाली.
 
मौनरागच्या सादरीकरणानंतर सचिन खेडेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवत असताना अशी रात्रभर नाटकाची मैफल आयोजित करणे खरंच कौतुकास्पद आहे. प्रेक्षकांमुळेच असे कार्यक्रम टिकून राहतात.’

त्यानंतर मिलिंद शिंत्रे लिखित पुरुषोत्तम करंडक विजेते नाटक ‘देता का करंडक’ सादर करण्यात आले. देवेंद्र गायकवाड व परेश देवळणकर यांनी विनोदाच्या जबरदस्त टायमिंगद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसविले. या वेळी नाटकाचे दिग्दर्शक शिंत्रे म्हणाले की, ‘बालगंधर्वांच्या काळात पाच-सात अंकी नाटके होत, तेव्हापासूनची ही रात्रभराच्या नाटकांची परंपरा आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने ती पुन्हा प्रत्यक्षात आली आहे.’
 
रात्री दोन वाजता सुरू झालेल्या थिएट्रॉनच्या ‘२०२ एलिना’ मधील शिवराज वायचळ, विराजस कुलकर्णी, कौमुदी वालोकर या कलाकारांनी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला. साधारण झोपेच्या वेळेत हे नाटक सुरू होऊनही हा संघ प्रेक्षकांची दाद मिळविण्यात कुठेही कमी पडला नाही. त्यानंतर मराठी वेब चॅनेल भाडिपाच्या ‘सिक्रेट मराठी स्टँडअप’ने रसिकांना पुन्हा पोट धरून हसायला लावले. सारंग साठ्ये, ओंकार रेगे व चेतन मुळे यांनी रंगमंदिरात विनोदाची पखरण केली.
 
रजनीचा शोस्टॉपर असलेल्या ‘सुखन’ला सुरुवात होण्याआधीच रंगमंदिराबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. पहाटे चारची वेळ असूनही अनेकजण केवळ या मुशायऱ्यासाठी आल्याचे दिसून आले. सकाळी पावणेआठच्या सुमारास ‘सुखन’च्या दर्दी आठवणी घेऊन रसिक पुन्हा घरी परतले.
 
संगीतकार राहुल रानडे व अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांसह मराठीतील अनेक अभिनेते व रंगकर्मींनी देखील संपूर्ण रात्रभर महोत्सवास उपस्थित राहात शोभा वाढविली. नाट्यसत्ताक रजनीच्या सुरुवातीला आविष्कार या मुंबईतील नाटकाच्या ग्रुपचे अरूण काकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा ग्रुप गेल्या ६५ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे कार्यरत आहे. या वेळी त्यांच्या हस्ते नटराजाचे पूजन देखील करण्यात आले.

सूत्रसंचालन भैरवी खोत यांनी केले. या कार्यक्रमास बुलढाणा अर्बनचे शिरीष देशपांडे, जाई काजळचे राजेश गाडगीळ, माधुरी सहस्त्रबुद्धे व वाईड विंग्ज मीडियाच्या पौर्णिमा मनोहर हे उपस्थित होते. रजनी यशस्वी करण्यात कैलास जीवन, ढेपे वाडा, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, दरबार, बँक ऑफ महाराष्ट्र व सारस्वत बँक यांचेही सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search