Next
मधुबनी चित्रांनी सजणार जपानी रेल्वेगाड्या
जपानने केली मधुबनी चित्रकारांना पाठविण्याची विनंती
BOI
Saturday, March 16, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : लवकरच जपानमधील रेल्वेगाड्या भारतीय मधुबनी (मिथिला) चित्रशैलीतील चित्रांनी सजलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण या मधुबनी चित्रांच्या सौंदर्याची भुरळ जपानलाही पडली आहे. भारतीय रेल्वेप्रमाणे आपल्या रेल्वेगाड्याही मधुबनी चित्रांनी सजवण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. त्यासाठी भारताने मधुबनी चित्रकारांचे एक पथक जपानला पाठवावे, अशी विनंतीही त्यांनी भारतीय रेल्वेमंत्रालयाला केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत अनुकूलता दर्शविली असून, लवकरच एक पथक जपानला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


बिहारमधील पारंपरिक मधुबनी शैली अत्यंत नाजूक आणि नक्षीदार चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. अत्यंत उठावदार रंगाचा वापर यात केला जातो. त्यामुळे या चित्रशैलीतील कलाकृती अत्यंत लक्षवेधक ठरतात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय रेल्वेने बिहार संपर्कक्रांती एक्स्प्रेससह राजधानी एक्स्प्रेस आणि जनसाधारण एक्स्प्रेसच्या डब्यांवर मधुबनी चित्रशैलीतील चित्रे रंगवून घेतली. राजधानी एक्स्प्रेसचे २२ डबे आतून आणि बाहेरूनही मधुबनी चित्रांनी सजवण्यात आले. त्यामुळे या रेल्वेगाड्या अत्यंत आकर्षक दिसत आहेत. बिहारमधील मधुबनी रेल्वेस्थानकातूनच या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. 


भारतीय रेल्वेच्या स्वच्छ आणि सुंदर रेल्वे प्रकल्पांतर्गत मधुबनी रेल्वेस्थानकाने स्थानिक मधुबनी चित्रकारांकडून रेल्वेस्थानक सजवून घेतले. त्यासाठी मधुबनी रेल्वेस्थानकाने उत्तम सजावटीचे पारितोषिकही मिळवले. या चित्रकारांनी मधुबनी चित्रशैलीतील चित्रांनी रेल्वेच्या डब्यांचे रंगरूप पालटून टाकले. मधुबनी रेल्वेस्थानकाचे अनुकरण करत पाटणा, राजेंद्रनगर आणि दानापूर रेल्वेस्थानकांनीही मधुबनी चित्रशैलीतील चित्रांनी रेल्वेस्थानके आणि रेल्वेगाड्यांचे सुशोभीकरण केले. समृद्ध पारंपरिक हस्तकलेच्या वैभवाने नटलेल्या रेल्वेगाड्या बघून प्रवाशांनाही आनंद मिळत असल्याने त्यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. 


अशा या देखण्या कलाविष्काराची भुरळ जपानी लोकांनाही पडली आणि आता भारताची ही समृद्ध चित्रशैली जपानच्या रेल्वेवरही झळकणार आहे. पारंपरिक कलांचे जतन करणाऱ्या कलाकारांना ही त्यांच्या साधनेची मिळालेली मोठी पोचपावती आहे. भारतीय रेल्वेने मधुबनी चित्रशैलीच्या चित्रकारांची एक तुकडी जपानला पाठवण्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच जपानमध्ये मधुबनी चित्रांनी सजलेल्या रेल्वेगाड्या दिसण्याची शक्यता आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link