Next
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था
माधुरी सरवणकर
Friday, May 25, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘इडार्च’ संस्था
ज्यांना हात नसतात, त्यांचेही भवितव्य चांगले असू शकते... ज्यांना पाय नसतात, तेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात... ज्यांना डोळे नसतात, तेही डोळस व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात... या गोष्टी सत्यात उतरविल्या आहेत पुण्यातील ‘इडार्च’ या संस्थेने. दिव्यांगांना शिकवण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिवधनुष्य या संस्थेने पेलले आहे. या संस्थेबद्दल जाणून घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात...
.....
कारखान्याला लागणारे सुटे भाग मशिन्सवर तयार करण्याचे प्रशिक्षण दिव्यांग-अपंग मुलांना देऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे करणारी इडार्च (एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर हँडिकॅप्ड) ही संस्था पुण्यातील शिवाजीनगरमध्ये कार्यरत आहे. संस्थेतील अंध, मतिमंद, कर्णबधिर अशी दिव्यांग मुले सुटे भाग बनवून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, महाले फिल्टर्स यांसारख्या कंपन्यांना दर महिन्याला पुरवतात. त्याचबरोबर ही मुले पेपर बॅग्ज तयार करतात. पेपर श्रेडिंग करून त्यापासून काही गोष्टी तयार करून विविध ठिकाणी विकण्याचे कामही संस्थेच्या मुलांमार्फत केले जाते.

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत दिलीप देशपांडे. त्यांनी २० वर्षांपूर्वी ही संस्था सुरू केली. कारखान्यातील सुरक्षितता या विषयावर सल्ला देण्याचा देशपांडे यांचा व्यवसाय होता. एकदा एका कारखान्यात अपघात झाला. त्यात दोन कामगारांचे पाय तुटले. त्या कामगारांचे हातावर पोट असल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. ते दोन्ही कामगार देशपांडे यांच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. ती इच्छा पूर्ण करण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ज्या कारखान्यात अपघात झाला, तेथे विविध व्हेंडर माल पुरवत होते; मात्र काही व्हेंडरचा माल उच्च प्रतीचा नसायचा. माल पुरविताना ते लोक काहीतरी गडबड करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मालकांना याची कल्पना दिली. त्यांना हेदेखील सुचविले, की ज्या दोन जणांचा अपघात झाला, त्यांना आपण मालाचा दर्जा तपासण्यासाठी ठेवू शकतो. या कामात ही दोन्ही माणसे तरबेज होती. मालकालाही त्यांची ही योजना पटली आणि त्या दोन्ही जणांना रोजगार मिळाला. त्यांची कामाप्रति असलेली आस्था बघून अंध, अपंग, मूकबधिर अशांसाठी आपण काहीतरी करू शकतो, याबद्दल देशपांडे यांच्या मनात विश्वास निर्माण झाला.

‘अंधांचे स्पर्शज्ञान खूप चांगले असते. मतिमंद व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कणखर असतात. कर्णबधिरांमध्ये एकाग्रता चांगली असते. अपंगांकडे चांगली ताकद असते. ही माणसे सामान्य माणसांप्रमाणे कामे करू शकतात; पण त्यांना कुठल्या प्रकारचे काम दिले जावे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. यावर मी खूप विचार केला. अशा व्यक्तींना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे करणारी एखादी संस्था आपणच का स्थापन करू नये, असे मला वाटले,’ असे देशपांडे म्हणाले. मग निवृत्तीनंतर त्यांनी इडार्च ही संस्था सुरू केली.

संस्था सुरू करण्याआधी देशपांडे यांनी बराच अभ्यास केला. कारण, हे जोखमीचे काम होते आणि वाटते तेवढे सोपे नव्हते. एका छोट्या खोलीतून देशपांडे यांनी ही संस्था सुरू केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे महापालिकेने त्यांना एका शाळेत छोटीशी जागा दिली. तेथेही त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला; पण हार न मानण्याची वृत्ती असल्याने ते जराही डगमगले नाहीत. या मुलांना पायावर उभे करण्याचे ध्येयच त्यांनी ठरविले होते.

मग ज्यांना पाय नाही, त्यांना मशिनमध्ये डाय सरकवण्याचे काम दिले गेले. त्यानंतर स्पिंडल फिरवून डाय क्लॅम्प करण्याचे काम अंध करू लागले. मशिनमध्ये कच्चा माल योग्य प्रमाणात टाकण्याचे काम कर्णबधिरांना मिळाले. अशी अनेक कामे या व्यक्तींना वाटून दिली गेली. अंध, अपंग, कर्णबधिर, मतिमंद अशा अनेक प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून ‘इडार्च’ संस्था कामे करू लागली. या लोकांना त्यांच्या कामाचे योग्य मानधन तर मिळू लागलेच; पण या कामामुळे समाजात योग्य स्थानही मिळू लागले.

अर्थात, केवळ मशिनचे सुटे भाग बनवून संस्थेचा गाडा चालण्यासारखा नव्हता. या जोडीला संस्थेने पेपर श्रेडिंग करण्याचे कामही घेतले. इंडस्ट्रियल पॅकिंग आणि फळांच्या पॅकिंगसाठी पेपर बॅग्ज किंवा रद्दीच्या कागदापासून बनवलेल्या काही गोष्टी वापरल्या जातात. या कामासाठी देशपांडे यांना महिन्याला दहा टन रद्दी लागते. रद्दी जमवायची कशी, हा प्रश्न सुरुवातीला त्यांच्यासमोर होता. मग त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. लोकांना, कंपन्यांना संस्थेच्या कामाची माहिती देऊन, घरोघरी फिरून रद्दी गोळा केली जाते. सोशल मीडियातून प्रसार झाल्यामुळे काही लोक स्वतःहूनही त्यांच्याशी संपर्क साधतात. मिळालेल्या रद्दीवर प्रक्रिया करून त्यापासून पिशव्यांसह विविध गोष्टी बनविल्या जातात. यातून मिळणारा नफा संस्थेतील १६ मुलांमध्ये विभागला जातो.

आपले काहीच होऊ शकत नाही, असा विचार जी मुले करत होती, ती आता मिळालेल्या कामामुळे स्वावलंबी झाली आहेत. या मुलांना जगण्याची एक दिशा मिळाली आहे. या संदर्भात देशपांडे यांनी एक प्रेरणादायी प्रसंगही सांगितला. ते म्हणाले, ‘आमच्या संस्थेत एक गतिमंद मुलगा आला. तो दिवसभर घरात बसून राहायचा. संस्थेत आल्यावरही त्याने हेच केले. दिवसभर खिडकीबाहेर बघत बसायचा. काही न करता एका जागी बसून बाहेर बघण्याचा त्याचा दिनक्रम जवळपास तीन वर्षे सुरू होता. आम्ही कधीच त्याला याबाबत बोललो नाही. तो नियमितपणे एका अंध मुलाला काम करताना बघायचा. ही घटना हळूहळू त्याच्या मनावर परिणाम करू लागली आणि एक दिवस आपसूकच तोही कामाला लागला. या घटनेवरून ही मुले एकमेकांसाठी कशी प्रेरक ठरतात, हे कळते. एकत्र काम केल्याने त्यांच्यात असलेल्या न्यूनगंडावर त्यांना मात करता आली. टीमवर्क काय असते, हे या मुलांना कळले. त्यांनी एकटेपणावर, भीतीवर मात केली. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. त्यांच्या आरोग्यावरही हळूहळू याचा चांगला परिणाम होऊ लागला. कौतुकाची थाप या मुलांच्या पाठीवर मिळू लागली.’

या कार्यासाठी इडार्च संस्थेला पंतप्रधानांनी १९९८मध्ये गौरविले आहे. सोनिया गांधी यांच्या हस्ते देशपांडे यांना हेलन केलर यांच्या नावाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. ‘या मुलांना मिळणारा नफा फार नाही, हे मला माहिती आहे; पण स्वतः कुठलाही नफा न कमावता, या मुलांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळवून देता येतील, एवढाच विचार मी करत असतो. ४०० अपंग मुलांसाठी मला पुनर्वसन केंद्र उभारायचे आहे. त्यांच्यासाठी ६० ते ७० इंडस्ट्रियल शेड्स उभ्या करून त्या ठिकाणी त्यांच्या जेवण्याच्या-राहण्याच्या सोयीसोबतच वैद्यकीय सुविधा मोफत द्यायची आहे. जी व्यक्ती त्यासाठी जागा देईल, त्यांच्या नावाने संस्था उभी करू,’ असा मानस देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!!!

संपर्क :
दिलीप देशपांडे (अध्यक्ष) : ९८२३० ८२६७१
उदय कुलकर्णी : ९८८११ ९७१२८
संजय लगाडे : ९९२१० ९७१२८
वेबसाइट : http://edarch.org/

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(‘इडार्च’ संस्थेबद्दलचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Makrand Kale About 271 Days ago
आपण अतिशय सुंदर उपक्रम सुरु केला आहे. मी यांतील निवडक बातम्या आवर्जुन माझ्या व्हाॅट्स ॲप ग्रुप मधे पाठवतो
0
0
प्रसाद मोरे , रोपळे बुद्रूक ता . पंढरपूर About 272 Days ago
बातमी छान आहे . या संस्थेने दिव्यांगांना प्रोत्साहन दिल्याचे व त्याना सक्षम केल्याचा आनंद वाटला .
0
0

Select Language
Share Link