Next
संदीप खरे, तारा वनारसे, डॉ. भालचंद्र फडके, गोपाळ पवार, डॅफ्ने डू मोरिए
BOI
Sunday, May 13, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आजच्या तरुणाईचा लाडका कवी संदीप खरे; कथाकार, नाटककार आणि कवयित्री तारा वनारसे; दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र फडके; समीक्षक गोपाळ पवार आणि ‘रीबेक्का’ आणि ‘बर्डस्’मुळे अफाट लोकप्रियता लाभलेली डॅफ्ने डू मोरिए यांचा १३ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय.....
.......
संदीप खरे 

१३ मे १९७३ रोजी पुण्यात जन्मलेला संदीप खरे हा सध्याच्या पिढीचा, कवितांच्या उत्तम सादरीकरणासाठी प्रसिद्ध असणारा सर्वांत लोकप्रिय कवी आणि गीतकार! संगीतकार सलील कुलकर्णीबरोबर अफलातून ट्युनिंग जमून त्यांच्या जोडीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला कार्यक्रम म्हणजे हजारोंनी प्रयोग झालेला ‘आयुष्यावर बोलू काही.’

इलेक्ट्रिकल इंजिनीअर असणारा संदीप, अगदी आबालवृद्धांना भावेल असं काव्य अतिशय सहज लिहून जातो. सहजसोपं, तरल, अर्थपूर्ण आणि मनाला भिडून चटकन तोंडातून ‘वा’ अशी दाद द्यायला लावणारं काव्य हे त्याचं वैशिष्ट्य. आजच्या तरुणांच्या मनीचे बोल अचूक एकटाकी लिहून जाणारा संदीप आजच्या तरुणाईचा लाडका कवी आहे.

उदाहरणार्थ - 

... ‘तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावस्येला चंद्र पाहिला होता
... डोळ्यांत अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता
तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता
चढणारच होते जहर तुला हे माझे
मी कवितेमधुनी दंश ठेवला होता....

मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, सृजन@broad, तुझ्यावरच्या कविता, आग्गोबाई ऽ ऽ ढग्गोबाई ऽ ऽ - असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.

(संदीप खरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

तारा वनारसे 

१२ मे १९३० रोजी पुण्यात जन्मलेल्या तारा वनारसे या कथाकार, कवयित्री, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखल्या जातात. डॉ. बेनडिक्ट रिचर्डस् यांच्याशी लग्न करून त्या इंग्लंडला स्थायिक झाल्या आणि तिथल्याही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं होतं.

रामायणाच्या पार्श्वभूमीवरची आणि शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची ‘श्यामिनी’ ही कादंबरी लक्षवेधी ठरली होती. 

त्यांच्या ‘बारा वाऱ्यांवरचे घर’ काव्यसंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. 

कक्षा, केवळ कांचन, गुप्त वरदान, तिळा तिळा दार उघड, नर्सेस क्वार्टर्स, पश्चिमकडा, सूर, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१२ मे २०१० रोजी त्यांचं हंपस्टीडमध्ये निधन झालं. 

(तारा वनारसे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

डॉ. भालचंद्र दिनकर फडके

१३ मे १९३० रोजी जन्मलेले डॉ. भालचंद्र दिनकर फडके हे दलित साहित्याचे समीक्षक म्हणून ओळखले जातात. 

मराठी कथेची वाटचाल या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. 

वेदना आणि विद्रोह, दलित साहित्याची प्रकाशयात्रा, सहा कथाकार, समुद्राकाठची रात्र, कथाकार खानोलकर अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१७ सप्टेंबर २००४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
........

गोपाळ मारुतीराव पवार

१३ मे १९३२ रोजी जन्मलेले गोपाळ मारुतीराव पवार हे समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘विनोदाचा औपपत्तिक विचार’ या विषयात डॉक्टरेट मिळवली होती. 

विवेकनिष्ठ जीवनपद्धती, मराठी साहित्य - प्रेरणा आणि स्वरूप, विठ्ठल रामजी शिंदे - जीवन चरित्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विनोद तत्त्व व स्वरूप, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना राज्य शासन पुरस्कार, दमाणी पुरस्कार, तसंच साहित्य अकादमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
.......

डॅफ्ने डू मोरिए

१३ मे १९०७ रोजी लंडनमध्ये जन्मलेली डॅफ्ने डू मोरिए ही लेखिका आणि नाटककार म्हणून गाजलेली गेल्या शतकाच्या उत्तरार्धातली महत्त्वाची लेखिका. तिच्या बऱ्याच कथानकांत गूढ, रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर घडणारा रोमान्स वाचायला मिळतो. तिच्या अनेक कथांवर सिनेमे बनवले गेले - विशेषतः हिचकॉककडून!

पदार्पणातच तीन लाखांवर खप झालेली ‘रिबेक्का’ ही तिची कादंबरी तुफान गाजली होती. मॅन्डर्ले इस्टेटच्या जॉर्ज मॅक्झिम डी विंटरशी लग्न करून आलेल्या नूतन पत्नीला आपल्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजेच रिबेक्काच्या अपघाती मृत्यूबद्दल कळतं. तिची नोकराणी नवीन मालकिणीची तुलना सतत आपल्या मृत मालकिणीशी करत असते, जणू तिचं अस्तित्व ती मेल्यावरही त्या मॅन्डर्ले इस्टेटमध्ये कायम आहे. पुढे रिबेक्काचा कुजलेला मृतदेह असलेली बोट मिळते. कुणी केलेला असतो तिचा खून? कशासाठी? काय रहस्य दडलेली असतात तिच्या मृत्यूमागे? मॅक्झिम डी विंटरचं प्रेम रिबेक्कावर असतं की नव्या पत्नीवर? अशा अनेक उत्कंठापूर्ण घटनांनी भरलेली ही कादंबरी तुफान गाजली. 

हिचकॉकने लॉरेन्स ऑलीव्हिये आणि जोन फोन्टेनला घेऊन ‘रिबेक्का’ याच नावाने अफलातून सिनेमा बनवला. त्यावरच आधारित पुढे हिंदीमध्ये ‘कोहरा’ नावाचा सिनेमा बनला. मोरिएच्या ‘बर्डस’ या लघुकादंबरीवरही हिचकॉकने टिप्पी हेड्रेनला घेऊन खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा बनवला होता. तिच्या ‘जमेका इन्न’ या कादंबरीवर हिचकॉकने चार्ल्स लॉटनला घेऊन रोमांचक सिनेमा बनवला होता.
 
दी लव्हिंग स्पिरीट, आय विल नेव्हर बी यंग अगेन, रिबेक्का, जमेका इन, हंग्री हिल, फ्रेंचमन्स क्रीक, दी किंग्स जनरल, सप्टेंबर टाइड, दी पॅरासाइट्स, माय कझिन रॅशेल, दी अॅपल ट्री, दी स्केपगोट, अशी तिची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

ब्रिटीश गव्हर्नमेंटतर्फे तिला ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायरचा (‘डेम’) किताब देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

१९ एप्रिल १९८९ रोजी तिचा कॉर्नवॉलमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link