Next
मुके मुखे येती बोल अमृताचे...
BOI
Monday, October 30, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this article:महाराष्ट्र समाज सेवा संघ या संस्थेने आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाघेरा (जि. नाशिक) येथे आश्रमशाळा सुरू केली आहे. तसेच कर्णबधिर मुलांसाठी श्रवण विकास विद्यालयाचीही स्थापना केली आहे. या संस्थेच्या कामाची दखल कुसुमाग्रजांपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक मातब्बर मंडळींनी घेतली आहे. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज त्या संस्थेच्या कार्याबद्दल...

.................
कोणतेही अपंगत्व दुर्दैवीच; पण त्यातल्या त्यात श्रवण विकलांगता म्हणजे बहिरेपणाच्या बाबतीत घडणारी गोष्ट म्हणजे हे अपंगत्व शारीरिक हालचालींमधून दिसून येत नाही. म्हणूनच इतरांकडून ते तितक्या गांभीर्याने घेतले जात नाही. किंबहुना माहीत झाल्यावरही त्यांची कुचेष्टाच केली जाते. ही बाब बहिऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठी समस्या बनून उभी राहते. त्यामुळे वेळीच याचे निदान होऊन त्यावर इलाज करणे गरजेचे ठरते.

नाशिक जिल्ह्यातील वाघेरा येथील महाराष्ट्र समाज सेवा संघातर्फे आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालवली जाते. तसेच कर्णबधिर मुलांसाठी श्रवण विकास विद्यालयही चालवले जाते. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदीप चौधरी यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘मुके मुखे स्रववू बोल अमृताचे’ हे ध्येय उराशी बाळगून नाशिकमधील प्रसिद्ध नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. द. ना. लेले आणि त्यांच्या पत्नी वैजयंती लेले यांच्या पुढाकाराने श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाची श्रीरंगनगरमध्ये १९७५मध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात आली. १९७७मध्ये राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने या शाळेला मान्यता दिली. त्या काळात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कर्णबधिरांसाठी शाळेची सोय नव्हती. त्याचप्रमाणे वैजयंती लेले या अशी शाळा सुरू करायची या उद्देशाने कर्णबधिरांसाठीचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकमेव शिक्षिका होत्या. सुरुवातीला केवळ सात मुलांपासून सुरू केलेल्या या शाळेत आज जवळपास १५० मुले शिक्षण घेत आहेत; तसेच शिशू शिक्षण केंद्रात पाच वर्षांपर्यंतची २७ मुले शिक्षण घेत आहेत. 

मूल कर्णबधिर असले, तरी ते बोलू शकते (कानाने बहिरा मुका परि नाही) यावर विश्वास ठेऊन काम करणारी ही विशेष शाळा आहे. कर्णबधिरत्वाचे लवकरात लवकर म्हणजेच वयाच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत निदान होऊन, लगेचच बालकाला योग्य श्रवणयंत्र देऊन त्याच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी, यासाठी शाळेत अनेकदा शिबिरांचे आयोजन केले जाते. मुलाने शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला बोलत करण्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा घेते. कानांची तपासणी करून योग्य श्रवणयंत्र लावून त्याच्या शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. सर्वसामान्य मुलांइतकीच भाषा शिकवून शाळेत आल्यावर पहिल्या तीन वर्षांतच, ऐकू येणाऱ्या मुलांबरोबर त्यांना शिक्षणासाठी तयार केले जाते. जी कर्णबधिर मुले या पायरीवर मागे पडतात, त्यांना पूर्व प्राथमिक विभागाच्या पायऱ्यांमध्ये व्याकरणशुद्ध बोलीभाषा व लेखी भाषा शिकवण्याची गरज भासते. त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतचा अभ्यास मुले या शाळेत करतात. आठवीपासून हे विद्यार्थी संस्था संचलित रचना एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतात. कला, क्रीडा, संगणक प्रशिक्षण यांच्या माध्यमातून व्यवसाय शिक्षणाचा पाया रोवला जातो. या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. जोपर्यंत त्यांना स्वयंरोजगार प्राप्त होत नाही, तोपर्यंत संस्था त्यांचा पाठपुरावा करते आणि त्यांना मदतही करते.

मुलांच्या श्रवणशक्तीचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये एफएम सिस्टीम बसवण्यात आली आहे. शाळेच्या धडपडीची दखल घेऊन ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, व्यासंगी पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी कमलाकर सोनटक्के व अरुण काकडे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन कौतुकाची थाप दिली आहे.

श्रवण विकास विद्यालयात १४ प्रशिक्षित शिक्षक, सात कलाशिक्षक आणि ११ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. पाच शिक्षिका शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आहेत. संस्थेची स्वतःची सात हजार चौरस मीटर जागा असून, त्यावर शाळेची इमारत बांधलेली आहे.

महाराष्ट्र समाज सेवा संघातर्फे विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळाही चालवली जाते. त्याविषयीही चौधरी यांनी माहिती दिली. परिसरातील गावांत शैक्षणिक सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत निवासी पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा समाजातील दानशूरांच्या मदतीने संस्थेमार्फत पूर्ण केल्या जातात. या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर आहेत. शाळेत गेल्या दोन वर्षांपासून ज्ञानरचनावाद पद्धतीचा अवलंब करून अध्यापन केले जात आहे. त्यामुळे लहान असतानाच विद्यार्थ्यांच्या मूलभूत अध्ययन क्षमतेचा चांगला विकास होत असून, ते पुढे शिष्यवृत्ती, मेरीट, तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही अव्वल येत आहेत.

शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही ही मुले चमकत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो या क्रीडाप्रकारांत राज्यस्तरावर, तर ‘ज्युडो’ या प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. दर वर्षी अनेक विद्यार्थी आश्रमशाळेत प्रवेशासाठी येतात; मात्र एका वर्गात ५० जणांनाच प्रवेश देता येतो.

‘दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावावा,’ असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

संपर्क : महाराष्ट्र समाज सेवा संघ
फोन : (०२५३) २५७९३३५, ९८२२० ८५९४४
वृषाली घारपुरे, मुख्याध्यापिका, श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय : ९४२३९ ६८६२९

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search