Next
अटलबिहारी वाजपेयींचे जवानांनी केले स्मरण
प्रेस रिलीज
Wednesday, December 26, 2018 | 01:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘कारगिल युद्ध हे सर्वांत अवघड आणि खूपच थरारक युद्ध होते. या युद्धात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आजच्या दिवशी प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीत येऊन जवांनांशी संवाद साधला होता. त्यांनी केवळ संवादच साधला नाही, तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीचे इंट्रोगेशनही (चौकशीही) केले होते. त्या आठवणी आजही अंगावर रोमांच उभे करतात,’ अशा शब्दांत खडकीच्या अपंग पुर्नवसन केंद्रातील जवानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती जागवल्या.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगरचे आमदार विजय काळे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर, ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळ, शिक्षण समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर आणि स्थानिक नगरसेविका कविता यांनी युद्धभूमीवर लढताना कायमचे जायबंदी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना फळवाटपही केले. या वेळी या केंद्राचे वैद्यकिय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी आणि त्यांचे अन्य अधिकारी तसेच ‘भाजप’चे शिवाजीनगर मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले सेना मेडल विजेते मिलिटरी इंटेलिजन्सचे नाईक रमेश पुरी म्हणाले, ‘कारगिल सेक्टरमध्ये युद्धाचे ढग जमायला तेव्हा आपण पुण्यात कुटुंबासमावेत होतो. एक दिवस अचानक मला कारगिलला निघण्याचा संदेश आला आणि मी तातडीने कारगिलकडे गेलो. मला द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आले. हे युद्ध इतके विचित्र आणि विषम परिस्थितीतील होते की भारतीय सैन्य जमिनीवर आणि शत्रूचे सैनिक पहाडांवर. तेथून ते आपल्या सैन्याच्या हलचाली सहजपणे बघत होते आणि डावपेच आखत होते. तशातही आम्ही शत्रूच्या बातम्या काढायला सुरूवात केली.’

‘युद्ध सुरू असताना एक दिवस अचानक पंतप्रधान वाजपेयी यांनी स्वत: युद्धभूमीवर येऊन सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह वाढला. युद्धभूमीवर गोळीबार सुरू असल्याने पंतप्रधान वाजपेयी यांना आलमागेच आमच्या तळावर थांबवण्यात आले होते. तिथे आपल्या सैन्याने पकडलेले काही शत्रूचे सैनिक होते आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते. पंतप्रधान वाजपेयी तेथे चौकशीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वत: शत्रूच्या सैनिकांची चौकशी केली. त्यांच्याकडून लष्करी अधिकाऱ्यांच्यासारखी महिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले. अर्थात युद्धभूमीवर पंतप्रधानांना फार काळ थांबून देणे योग्य नसल्याने त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले,’ असे पुरी यांनी सांगितले.

अशाप्रकारे जेव्हा देशाचा प्रमुख युद्ध भूमीवर येऊन आपल्या सैनिकांबरोबर उभा रहातो त्यावेळी आम्हा सैनिकांना काय वाटते ते शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. हे अनुभवच आम्हा जायबंदी झालेल्या जवानांना जगण्याचे सामर्थ्य देत असल्याचे नमूद करत पुरी पुढे म्हणाले, ‘वाजपेयी यांनी कारगिल युद्धात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस केली. या शिवाय देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह सन्मानाने त्यांचा घरी पाठवण्याची परंपरा सुरू करून त्या शहीद जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती देशाच्या सद्भावना पोचवण्यास सुरुवात केली ही जवानांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी फारच मोलाची गोष्ट आहे.’

या प्रसंगी काही जवानांनी प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कथन करून सर्वांना स्तिमित केले, तर काही जवानांनी अणुस्फोटासारखी जगाला हादरवणारी कृती पंतप्रधान वाजपेयी यांनी करून देशाची मान जगात उंचावली आणि सैन्याचे, देशवासीयांचे मनोबल वाढवल्याचे सांगितले.

संस्थेचे वैद्यकीय संचालक कर्नल मुखर्जी यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात रस्ते, पाणी, दिवे अशा सुविधा चांगल्याप्रकारे मिळू लागल्याचे सांगितले; तसेच कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने विकास निधी देण्याचा घेतलेल्या निर्णय आमच्या कुटुंबियांसाठी फारच मोलाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे यांनी जवानांना सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link