Next
नियतीचे प्रतिबिंब
प्रसन्न पेठे
Friday, January 05 | 04:26 PM
15 0 0
Share this story

हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास आणि जोडीला अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा वापर करून अचूक रिझल्ट्स कसे मिळवले हे इंटरेस्टिंग गोष्टीरूप पद्धतीने सांगणारे पुस्तक म्हणजे ‘नियतीचे प्रतिबिंब.’ त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............................
हस्तरेषाशास्त्र हे एक दैवी विज्ञान आहे आणि त्याचा वापर केवळ ‘मला किती आयुष्य, किती पैसा मिळेल, काय प्रकारचं सुख मिळेल, परदेशगमनाचे योग आहेत का आणि कधी,’ - असल्याच बाबतीत उत्तरं मिळण्यासाठी नसून, ‘लग्न जुळणे, इंजिनीअरिंगला जावं की कम्प्युटर सायन्स घ्यावं, चोरीला गेलेली आणि पोलिसांना शोध घेऊनही न सापडणारी गाडी कुठच्या उपदिशेला शोधली तर सापडू शकेल, नुसती साधी प्रसिद्धीच नाही तर ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव येण्याची खात्री, मेडिकलच्या सर्व परीक्षा सहज पास करून फायनल एक्झामला घाबरणारा आणि डॉक्टर होऊ शकणार नाही वाटणाऱ्याला डॉक्टर होणारच ही खात्री मिळणे, काही रत्ने किंवा खडे वापरून कठीण, बिकट आपत्तीमधून बाहेर निघू शकणे, तीन मुलींनंतरही मुलगा होण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा दोन वेळा मुली जन्मणार म्हणून गर्भपात करून घेतलेल्या बाईला सहाव्यांदा दिवस गेल्यावर आणि गर्भलिंग चाचणीमध्ये मुलगी आहे हे कळूनही ती चाचणी चुकीची असून मुलगाच होणार हे हस्तरेषांवरून ठामपणे सांगून तसे घडणे, करिअरविषयी विचारायला आलेल्या मुलाला हस्तरेषांवरून आध्यात्मिक प्रगती असणार हे सांगितल्यावर पुढे त्याने उच्च आध्यात्मिक प्रगती करून कुंडलिनी जागृती होणे, हरवलेला मुलगा पुढच्या चार दिवसांत घरी परत येण्याविषयी हस्तरेषांवरून भाकीत सांगणे – असे प्रथमदर्शनी अशक्यप्राय किंवा खोटे वाटणारे, पण खरेखुरे घडलेले प्रसंग प्रख्यात हस्तरेषातज्ज्ञ कल्पना जानी यांनी त्यांच्या ‘नियतीचे प्रतिबिंब’ या स्वानुभवाच्या पुस्तकात सांगितले आहेत. ते वाचताना आपली मती गुंग होऊन जाते. 

२२० पृष्ठांच्या या पुस्तकात आपल्याला जानी यांच्या अगाध ज्ञानाची प्रचीती येते. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीची मनःस्थिती समजून घेऊन त्याला ‘कम्फर्टेबल’ करणे, आश्वस्त करणे, धीर देणे आणि त्याचा आत्मविश्वास जागृत करून ‘परिस्थितीवर मात करता येईल, नव्हे तसे होईलच’ अशी त्याच्या मनाची खात्री पटवून देऊन नवी उमेद, नवी उभारी देऊन पाठवणे हे त्या किती सहजपणे करतात ते या पुस्तकात वर्णन केलेल्या सर्वच ३६ केसेस वाचून आणि शेवटच्या प्रकरणात दिलेल्या २९ लोकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आणि अभिप्रायांवरून लक्षात येते.  

तत्त्वज्ञानात एमए (डिस्टिंक्शन) असणाऱ्या कल्पना जानी यांचे वडील घनःश्याम जोशी हे जगप्रसिद्ध हस्तरेषातज्ज्ञ होते आणि त्यांच्याकडून अगदी लहान वयापासूनच कल्पना यांनी हस्तरेषाशास्त्राचे धडे गिरवले होते. हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून त्यांनी प्रत्येक केस कशी हाताळली आणि अचूक रिझल्ट्स कसे मिळवले, हे त्यांनी फार इंटरेस्टिंग गोष्टीरूप पद्धतीने सांगितले आहे.

एकीकडे हस्तरेषांचा अभ्यास आणि जोडीला अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र (विविध ग्रहांचे खडे आणि रत्नांचा वापर) यांच्या एकत्रित उपायाने त्या आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना सल्ले देत असतात. आणि त्यांची भाकितं अचूक ठरून येणारी व्यक्ती संतुष्ट होऊनच परत जातो आणि सुखी आयुष्य जगतो हे कल्पना जानी याचं मोठं यश म्हणता येईल.

हस्तरेषाशास्त्राविषयी उत्सुकता असणाऱ्यांना आणि अडचणीत असणाऱ्यांना हे पुस्तक वाचून समाधान मिळेल.

पुस्तक : नियतीचे प्रतिबिंब 
प्रकाशक : कल्पना जानी 
पृष्ठे : २२०
मूल्य : २५० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’ वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link