Next
व्याजावरील प्राप्तिकर कसा वाचवाल?
BOI
Saturday, August 25, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:

बहुतेक जण आपली गुंतवणूक प्रामुख्याने ज्यातून नियमित व्याज मिळेल व मुद्दल सुरक्षित राहील, अशा प्रकारात करत असल्याचे दिसून येते; मात्र त्यातून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर आकारणी नेमकी कशी होते, याबाबत त्यांना पुरेशी माहिती असतेच, असे नाही. ‘समृद्धीची वाट’ सदरात मिळणाऱ्या व्याजावर नेमकी करआकारणी कशी होते, हे पाहू. 
........

बँकेच्या सेव्हिंग्ज (बचत) खात्यावरील शिल्लक रकमेवर वार्षिक किमान ३.५ टक्के दराने व्याज दिले जाते. (काही बँका यापेक्षा जास्त व्याज देऊ करत आहेत.) यासाठी सेव्हिंग्ज खात्यावर दररोज दिवसअखेर शिल्लक असलेली रक्कम विचारात घेतली जाते. आर्थिक वर्षात मिळणारे असे व्याज दहा हजार रुपयांपर्यंत प्राप्तिकर कलम ‘८० टीटीए’नुसार करमुक्त असते.

मुदत ठेव व रिकरिंग खात्यावर मिळणारे व्याज दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर सर्व व्याज करमुक्त नसून, मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला लागू असणारा दहा, वीस अथवा तीस टक्के प्राप्तिकर लागू होतो. तथापि व्याज देऊ करणारी वित्तसंस्था दहा टक्के दराने टीडीएस कपात करून उर्वरित व्याज ठेवीदारास देते; मात्र यासाठी बँकेकडे आपला पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक असते. तो दिलेला नसेल, तर २० टक्के दराने टीडीएस कपात केली जाते. म्हणजेच उर्वरित दहा किंवा वीस टक्के फरकाचा प्राप्तिकर ठेवीदाराने भरावयाचा असतो. असे असले, तरी या वर्षीच्या अंदाजपत्रकातील प्राप्तिकर आकारणीतील बदलानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकर कलम ‘८० टीटीबी’नुसार ही मर्यादा आता पन्नास हजार रुपये इतकी झाली आहे.

आपले उत्पन्न करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल, तर अशा व्यक्तीस मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जात नाही. यासाठी संबंधितास ‘फॉर्म १५ जी’ वेळीच द्यावा लागतो. ठेवीदाराचे वय ६०पेक्षा जास्त असेल (ज्येष्ठ नागरिक), तर ‘फॉर्म १५ एच’ वेळेत देणे आवश्यक असते. तथापि उत्पन्न करपात्र असताना असा फॉर्म देणे गुन्हा आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

वरील नियम बँकेतील, पोस्टातील, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना, खासगी कंपन्यांमधील केलेल्या गुंतवणुकीस लागू आहेत. विशेष म्हणजे पीपीएफ व सुकन्या समृद्धी ठेव यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर लागू होत नाही. काही गुंतवणूकदार बँक, पोस्ट याऐवजी डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येते. कारण यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजासाठी होणारी प्राप्तिकर आकारणी बँक, पोस्ट किंवा तत्सम गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजापेक्षा वेगळी असून, किफायतशीर असते. कसे ते आता पाहू.

डेट म्युचुअल फंडातील गुंतवणूक शॉर्ट टर्म व लाँग टर्म (अल्प मुदतीचे व दीर्घ मुदतीचे) या दोन प्रकारांत विभागली जाते. यानुसार तीन वर्षांच्या आतील गुंतवणूक शॉर्ट टर्म, तर त्यापुढील गुंतवणूक लाँग टर्म धरली जाते. यातील शॉर्ट टर्म गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजावर गुंतवणूकदारांच्या लागू असणाऱ्या टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर आकारणी केली जाते. उदा. साहिलने एक लाख रुपये दोन वर्षांसाठी डेट (Debt) म्युच्युअल फंडात गुंतविले असून, त्याला या वर्षी त्यातून दहा हजार रुपये इतका रिटर्न मिळाला आहे. त्याची टॅक्स स्लॅब २० टक्के असेल, तर त्याला मिळणाऱ्या दहा हजार रुपयांच्या रिटर्नवर २० टक्के दराने दोन हजार रुपये इतका अधिक प्राप्तिकर भरावा लागेल. 

आता लाँगटर्म डेट म्युचुअल फंडातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्नवर प्राप्तिकर आकारणी कशी होईल हे पाहू. उदा. सिद्धार्थने दहा हजार रुपये तीन वर्षे मुदतीच्या डेट फंडात गुंतविले असून, त्याला ११ हजार रुपये एवढा रिटर्न मिळालेला आहे. त्याची टॅक्स स्लॅब ३० टक्के आहे, तरीसुद्धा त्याला ११ हजारांवर ३० टक्के इतका प्राप्तिकर भरावा लागणार नाही. इंडेक्स सेशनचा लाभ घेऊन, येणाऱ्या रकमेवर २० टक्के अधिक त्यावर तीन टक्के अधिभार असा एकूण २३ टक्के प्राप्तिकर त्याला भरावा लागेल. थोडक्यात ज्याची टॅक्स स्लॅब दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांना डेट फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक प्राप्तिकर दृष्टिकोनातून निश्चितच फायदेशीर ठरते.

व्याजावरील प्राप्तिकर आकारणीबाबतच्या वरील बाबींचा विचार करून ‘डेट’मध्ये गुंतवणूक करावी.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suhas joshi About
Hi s.b...gone through ur artical.its nice.only one clarification required In ur artical it is mentioned it is mentioned if taxable income is abo ur prescribed limit u cant give 15 H However in many articals i read that if gross income ( i.e. before any deductions) then u cant give 15 H Pl clarify.....s.v.j
0
0
A.K.Kulkarni About
Good information
0
0
A.K.Kulkarni About
Good information
0
0

Select Language
Share Link
 
Search