Next
... आणि बगळ्याला मिळाले जीवदान
प्रशांत सिनकर
Thursday, August 09, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण घड्याळाच्या काट्यावर चालतात. त्यामुळे दुसऱ्याला मदत करायला वेळ कोणाकडेच नसतो. प्राणी-पक्ष्यांना मदत करणे ही तर खूप दूरची गोष्ट. असे असले तरी काही चांगली उदाहरणेही समाजात अधूनमधून पाहायला मिळतात. तसेच एक उदाहरण नुकतेच ठाण्यातही पाहायला मिळाले. येथील एका युवकाने पाँड हेरॉन जातीच्या बगळ्याच्या पिल्लाला जीवदान दिले आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा मोहित ढेंगळे हा युवक रस्त्याने जात होता. बारा बंगला परिसरात एका झाडावरून खाली पडून जखमी झालेले पक्ष्याचे पिल्लू त्याला बस स्टॉपजवळ दिसले. या पक्ष्यावर प्राथमिक उपचार करून या तरुणाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावरून अनेक पादचारी जात होते; मात्र या पक्ष्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. सुरुवातीला मोहितनेही त्याची फारशी दखल घेतली नाही; मात्र या पिल्लाला जखमी अवस्थेत बघून त्याला राहवले नाही. तसेच पिल्लाला कावळ्यांनी चोचा मारून जखमी केले होते. त्याच्या पंखाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे मोहितने त्याला घरी आणून त्याच्यावर प्रथमोपचार केले. बगळ्यांना प्रिय असलेले मासे त्याला खाऊ घातले. त्यानंतर त्याला ठाण्यातील ‘एमसीपीए’मध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले असल्याचे मोहित याने सांगितले.

‘पाँड हेरॉन’विषयी...
पाँड हेरॉन पक्षी हा बगळ्याच्या जातीतील असून, खाडीकिनारी अथवा तलाव आणि पाणथळ प्रदेशांत आढळतो. लहान मासे, झाडाझुडपांतील कीटक हे त्याचे खाद्य असून स्थानिक पक्ष्यांत त्याची गणना होते. राखाडी रंगाच्या या पक्ष्याची उंची सुमारे दीड फुटांपर्यंत असते. बारा बंगला परिसर कोपरी खाडीच्या जवळ असल्याने येथील उंच झाडांवर या पक्ष्यांचे घरटे आढळते. जिथे जिथे मासळी बाजार आहे, अशा ठिकाणी तो हमखास आढळत असल्याची माहिती डॉ. सुहास राणे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search