Next
लक्ष्य साध्य होण्याकडे लक्ष द्या
BOI
Sunday, February 25 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात कालमानानुसार हेलकावे येतच असतात. त्यामुळे रोज किंवा दर आठवड्याला विक्री, खरेदी करण्याचे बेत न आखता, आपले लक्ष्य साध्य होण्याकडे लक्ष द्यावे. याविषयी अधिक माहिती पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदराच्या आजच्या लेखात....
...............
शेअर घेताना आपण त्याचे विक्रीसाठीचे लक्ष्यही मनात ठरवीत असतो. त्यामुळे खरेदीपेक्षा २५ टक्के वाढ मिळेपर्यंत वा ठरवलेले लक्ष्य, यापैकी प्रथम असेल ते येईपर्यंत विक्रीची घाई करू नये. क्रिकेटमध्ये फलंदाजाला प्रत्येक चेंडू बघावा लागतो; पण त्या चेंडूवर इच्छित फटका बसणार नसेल, तर तो वांझ (Dot Ball) म्हणून सोडावा लागतो. त्याप्रमाणे, गुंतवणूकदाराला खरेदीची वेळ हातात असते. योग्य वेळ बघून निर्णय घ्यावा लागतो.

सध्या भारतीय शेअर बाजाराला अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजधोरणाची प्रतीक्षा आहे. तिथे व्याज पाव टक्क्याने वाढले, तरी भारताकडे येणाऱ्या पैशाचा ओघ कमी होईल. भारताचा डॉलरबरोबरचा विनिमय दरही आता किंचित घसरला आहे. शिवाय पडत्या बाजारात गुंतवणूक करणे इष्ट असले, तरी विदेशी गुंतवणूक कंपन्या भाव वाढत असतानाच गुंतवणूक करण्याचे पसंत करतात. या सर्व पार्श्वभूमीवर, सध्या टाटा स्टीलच्या शेअरचा विचार करता येईल; तसेच रेप्को होम्स फायनान्स, दिवाण हाऊसिंग, ओएनजीसी, एशियन ग्रॅनिटो, अहलुवालिया काँट्रॅक्ट्स, रेग इंडिया हेही शेअर्स गुंतवणूकयोग्य आहेत.

‘टाटा स्टील’ने नुकतेच भागधारकांना ५१० रुपये भावाने २५ शेअर्समागे चार शेअर्स हक्कभाग दिले होते. तसेच भूषण स्टील या डबघाईला आलेल्या कंपनीचे आग्रहण करण्यासाठी तिने बोली लावली आहे. इंग्लंडमधल्या कोरस कंपनीनंतर, मोठ्या आग्रहणाची ही दुसरी वेळ आहे. कोरसचा व्यवहार झाल्यानंतर जर भूषण स्टील टाटांनी घेतली, तर तिच्या कर्जाचा दोरही कंपनीच्या गळ्याभोवती असणार आहे. भूषण स्टील व भूषण स्टील अँड पॉवर अशा दोन कंपन्यासाठी टाटांना ५५ हजार कोटी रुपये गुंतवावे लागतील. शिवाय खेळत्या भांडवलासाठी वेगळी सोय करावी लागेल; पण भूषण समूहाचे आग्रहण झाल्यानंतर कंपनीच्या पोलाद उत्पादन क्षमतेची पातळी २.५ कोटी टन (वर्षाला) इतकी होईल. सध्याच्या ७६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा १.३ लक्ष कोटी रुपये इतका होईल. भूषणच्या दोन कंपन्यांसाठी टाटा स्टीलने २४,५०० कोटी रुपये व ३५,००० कोटी रुपयाचा देकार दिला आहे. हक्कभाग काढून तिने १२,५०० कोटी रुपयांची सोय केली आहे. भूषणला बँकांनी दिलेली कर्जे फेडण्याची हमी देऊन ती रोलओव्हर केली जातील, असे विश्लेषकांना वाटत आहे.या कंपन्यांच्या आग्रहणाशिवाय, ओडिशातील कलिंगनगर इथल्या कारखान्याची उत्पादनक्षमता ५० लक्ष टनांनी वाढवण्याचा तिचा विचार आहे. हक्कभागाची सर्व रक्कम इथेच खर्च होणार आहे.

आत्ता गुंतवणूकयोग्य शेअर्स - रेप्को होम्स फायनान्स, दिवाण हाउसिंग, ओएनजीसी, एशियन ग्रॅनिटो, अहलुवालिया काँट्रॅक्टस, रेग इंडिया 

  
- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link