Next
तीन किलोंची घातक वजनवाढ..
BOI
Wednesday, April 04, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


मुळात जेवणात आपण फक्त पोळी भाजी खाणे हे पुरेसे नसतेच.  ते थोड्या वेळाची भूक भागवणे असते. त्यामुळे परत दोन तासांनी काहीतरी खावेसे वाटतेच. जेवणासंदर्भातील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तरुण वयात केलेली शरीराची हेळसांड आपल्याच अंगाशी येणारी आहे... ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या वजनवाढीच्या समस्येबद्दल...
......................................
आज खूप मोठा तरुणवर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहताना दिसतो. सात-आठ तास कॉलेज, तर आठ-दहा तास ऑफिस असा कामाचा भरगच्च आठवडा असतो. हॉस्टेल किंवा फ्लॅट इतर लोकांबरोबर शेअर केलेला असतो. 

अनेक हॉस्टेल्सवर जेवणासाठी मेसची सुविधा बंधनकारक असते. विविध प्रांतातील मुले एकत्र असल्याने मेसमध्ये मसालेदार व तेलकट भाज्यांचा भरणा तर असतोच; पण ज्या वेळेस दुपारचे जेवण व नाश्ता पुरवले जातात, त्या वेळांत मुले कॉलेजमध्ये असतात. त्यामुळे हॉस्टेलवर हमखास जेवणाचे भरलेले पैसे तर वाया जातातच, शिवाय स्वत:च्या पदरचे वेगळे पैसे घालून मुलांना बाहेरचे खावे लागते. पैसे वाचवण्यासाठी मुले दुपारचे जेवण टाळतात व बिर्याणी, पावभाजी, पिझ्झा यांसारखे बाहेरचे स्नॅक्स खातात. नीट जेवण न झाल्याने परत थोड्या वेळाने खूप भूक लागते. अशा वेळी मग मिळेल ते म्हणजे वडापाव, शेवपाव, पाणीपुरी अशा पदार्थांवर ताव मारला जातो. सरतेशेवटी रात्रीचे जेवण भरपेट जेवले जाते. हे फारच विदारक दृश्य असले, तरी ही वस्तुस्थिती आहे. 

असाच काहीसा प्रकार कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांमध्येही पाहायला मिळतो. दुपारच्या जेवणासाठी हे लोक फक्त पोळी-भाजी नेतात. मग संध्याकाळी खाण्यासाठी जी स्नॅक्सची सुविधा असते, त्यात पूर्ण जंक फूडचा मारा असतो. सामोसे, कचोरी, चाटचे प्रकार. तसेच कुरकुरे, वेफर्स असे सगळे पदार्थ यात असतात. ह्या सगळ्यांनी महिन्याला किमान तीन किलो वजन वाढत असल्याचे या संदर्भातील अभ्यासात निदर्शनास आले आहे. 

मुळात जेवणात आपण फक्त पोळी-भाजी खाणे हे पुरेसे नसतेच.  ते थोड्या वेळाची भूक भागवणे असते. त्यामुळे परत दोन तासांनी काहीतरी खावेसे वाटतेच. जेवणाच्या सुट्टीनंतर तीन तासांच्या आत खाण्याची परवानगी नसल्याने ती भूक खूपच वाढत जाते आणि नंतर मग खूप जास्त प्रमाणात नको ते पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे जेवताना सॅलड, दही किंवा ताक जमल्यास वरून पनीर (सॅलडमध्ये) किंवा अंडी असे प्रथिनयुक्त पदार्थ न्यावेत. 

संध्याकाळी वाफवलेली कडधान्ये (आजकाल ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह असतात), भडंग, खाकरा, पौष्टिक लाडू, सोयाबीन, फळे इत्यादी पदार्थ न्यावेत. दूध, ओट्स, ताज्या फळांचे रस यांसारखे पर्यायही उपलब्ध असतात. त्यामुळे असे उपाय शोधणे गरजेचे असते. 

प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे, की जेव्हा आपण शिक्षणासाठी बाहेर जातो, तेव्हा कमीत कमी चार वर्षे व नंतर नोकरी तर कायमचीच आहे. यामुळे या गोष्टी लक्षात घेऊनच सुरुवातीपासूनच तातडीने उपाययोजना कराव्यात. तरुण वयात केलेली शरीराची हेळसांड आपल्याच अंगाशी येणारी आहे.    

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मोहन About 346 Days ago
उपयुक्त माहिती
0
0

Select Language
Share Link