Next
शाहिरीने दुमदुमली साहित्यपंढरी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
BOI
Monday, July 22, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिकांची शाहिरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाहीरांनी नामवंत कवींचे पोवाडे सादर केले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट या कवींनी लिहिलेल्या शाहिरी काव्याच्या सादरीकरणाने साहित्य पंढरी दुमदुमली. निमित्त होते, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांचे सहकारी प्रा. संगीता मावळे, महादेव जाधव, होनराजराजे मावळे, मुकुंद कोंडे, राजकुमार गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, अरुणकुमार बाभुळगांवकर, सविता वाडेकर, प्रज्ञा काळे आणि पूजा माळी यांच्या समवेत नामवंत कवींचे पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. 

याप्रसंगी बोलताना ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मराठी साहित्यातील काव्यगंगा संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य या तीन पात्रांतून वाहते. संतकाव्याने समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दाखवला. पंतकाव्याने अभिजनांसाठी साहित्यनिर्मिती केली, तर तंतकाव्याने एकीकडे शाहिरीच्या माध्यमातून शौर्याचे गुणगान केले आणि दुसरीकडे लावणीच्या माध्यमातून सौंदर्याचे गुणगान केले. शाहिरी काव्याने मराठी काव्याला दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून प्रस्थापित साहित्याला धक्का दिला. त्यांनी शोषितांचे जग आपल्या लेखनातून समोर आणले. उपेक्षित आणि वंचित लोकांच्या व्यथा, वेदना मांडल्या. त्यांनी विद्रोहाचे रूपांतर विद्वेषात होऊ दिले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले.’ 

या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search