Next
मायलेकींची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड
BOI
Wednesday, March 06, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

चेन्नई : आई आणि मुलगी यांची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड होण्याची अनोखी घटना चेन्नईत घडली आहे. तीन मुलींची आई असलेल्या ४७ वर्षीय एन. शांतिलक्ष्मी यांनी त्यांची २८ वर्षीय मुलगी आर. थेनमोझीसह सरकारी नोकरीसाठीची परीक्षा दिली. दोघीही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे आई आणि मुलीची एकाच वेळी सरकारी नोकरीत निवड होण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर कोरला गेला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या मायलेकींचे हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. 

एन. शांतिलक्ष्मी यांनी बीए आणि बीएड या पदव्या घेतल्या होत्या; मात्र तीन मुली आणि पतीसह त्या संसारात रमून गेल्या होत्या आणि गृहिणी म्हणूनच कार्यरत होत्या; मात्र २०१४मध्ये त्यांचे पती ए. रामचंद्रन यांचा मृत्यू झाल्यानंतर घर चालवण्यासाठी नोकरी करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्यांची मुलगी आर. थेनमोझी ही थेनी जिल्ह्यात जी. सेंथिलकुमार चालवत असलेल्या मार्गदर्शन वर्गात जाऊ लागली. तिच्या प्रवेशासाठी आलेल्या शांतिलक्ष्मी यांना सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली परीक्षा त्याही देऊ शकतात, ही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनीही त्या वर्गात उपस्थित राहायला सुरुवात केली. 

तमिळनाडू राज्य सेवा आयोगातर्फे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उच्चशिक्षित उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शांतिलक्ष्मी या परीक्षेसाठी पात्र ठरल्या. 

‘परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात येणाऱ्या मार्गदर्शन वर्गात इतर सर्व उमेदवार शांतिलक्ष्मी यांच्या मुलीच्या वयाचे होते. तरीही त्या कधी वर्गात यायला लाजल्या नाहीत किंवा प्रश्न विचारायला बिचकल्या नाहीत. कधी त्या वर्गात हजार राहू शकल्या नाहीत, तर त्यांची मुलगी त्यांना त्या दिवशी घरी शिकवत असे,’ असे सेंथिलकुमार यांनी सांगितले.


शांतिलक्ष्मी यांची आरोग्य खात्यात नियुक्ती झाली असून, तमिळ साहित्यात बी. ए. केलेल्या त्यांच्या मुलीची हिंदू धार्मिक आणि धर्मादाय खात्यात नियुक्ती झाली आहे. 

‘माझी आरोग्य खात्यात नियुक्ती झाली आहे. थेनी जिल्ह्यात माझे पोस्टिंग होईल, अशी आशा आहे. अर्थात, तिथे पोस्टिंग झाले नाही, तरी मी माझ्या नोकरीचे ठिकाण जिथे असेल तिथे रुजू होणार आहे,’ असे शांतिलक्ष्मी यांनी सांगितले. 

आयुष्यातील बराच काळ गृहिणी म्हणून व्यतीत केल्यानंतर मुलीच्या बरोबरीने अभ्यास करून, परीक्षा उत्तीर्ण होऊन जिथे पोस्टिंग होईल तिथे जाण्याची तयारी दाखविणाऱ्या शांतिलक्ष्मी केवळ त्यांच्याच पिढीतील नव्हे, तर तरुण पिढीतील मुलींसाठीही प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे धैर्य, काळाबरोबर बदलण्याची तयारी नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 224 Days ago
Great struggle and great success indeed!
0
0

Select Language
Share Link
 
Search