Next
‘मराठवाडा वॉटर ग्रिड’च्या पाणी प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी
पहिल्या टप्प्यात ग्रिडसाठी १० हजार ५९५ कोटी खर्च होणार : बबनराव लोणीकर
BOI
Tuesday, March 05, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this story


मुंबई : मराठवाड्यात पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी सरकारने ‘मराठवाडा वॉटर ग्रिड’च्या पिण्याच्या पाण्याच्या पहिल्या टप्प्यातील ग्रिडसाठी रुपये १० हजार ५९५ कोटी खर्चाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र ग्रिडच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी स्वतंत्र वॉटर ग्रिड तयार करण्यासंदर्भात औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घोषीत केले होते. त्यानुसार या कामी इस्राईलच्या ‘मेकोरेट’ कंपनीला आराखडा आणि प्राथमिक संकल्पना अहवाल तयार करण्यासाठी नियूक्त केले होते. मेकोरेट कंपनीने जलसंपदा, उद्योग, ऊर्जा, कृषी, पाणीपुरवठा व नगर विकास खात्यामार्फत आकडेवारी घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार केला आहे.

अहवालामध्ये मराठवाड्यातील मागील ३५ वर्षांचे पर्जन्यमान, उपलब्ध पाणी, भूजल साठा, पिण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणी या सर्व माहितीचे विश्लेषण आहे.  उपलब्ध संसाधनांचा सखोल अभ्यास करून सद्यस्थितीचा पाणी साठा आणि भविष्यातील पाणी परिस्थितीची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. पिण्याचे पाणी व औद्योगिक वापरासाठीचे पाणी अशी दोन ग्रिड निर्माण करण्याचा पर्याय सुचवला आहे. ३० वर्षांसाठी म्हणजे २०५०पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. वर्ष २०५०मध्ये एकूण ९६० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये नागरी, ग्रामीण व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा समावेश करण्यात आला आहे. ही ग्रिड लूप पद्धतीचे बनविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील ११ धरणांमधून कोणत्याही ‍धरणात पाणी पाठवता येईल. त्यामुळे काही कारणाने एका स्तोत्रातून पाणी उपलब्ध न झाल्यास इतर पर्याय स्त्रोतांमधून पाणी घेता येणार आहे. तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करावयाचा असल्यास इतर मार्गाने पाणीपुरवठा चालू ठेवता येईल. अशा पद्धतीने ग्रिडमधून पाणी दोन्हीं बाजूने घेता येऊ शकेल. या ग्रिडद्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १३३० किलोमीटर लांबीच्या मुख्य पाईपलाईनवर मराठवाड्यातील सर्व ११ धरणे जोडणे प्रस्तावित आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन ठिकाणापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी एकूण ३२२० किलोमीटर पाईपलाईन टाकणे प्रस्तावित आहे. या पाईपलाईनपासून कोणत्याही गावाचे अंतर २० ते २५ किलोमीटर राहील व त्यामधून सर्व गावांना गरजेच्या वेळी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन आहे. अशुद्ध पाणी मुख्य जलवाहिनीसाठी एकूण  ३८८५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती लोणीकर यांनी दिली.

‘मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या वॉटर ग्रिडच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. मी गेल्या चार वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळाले आहे. लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यात येईल’, असे लोणीकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link