Next
उपनिषदांचे अंतरंग
BOI
Sunday, May 06, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...
............
वेदवाङ्‌मय ही जगातील सर्वांत प्राचीन ज्ञानसंपदा आहे. चार वेद आणि सहा शास्त्रांचा अभ्यास पाठशाळांमधून हजारो वर्षे चालत आलेला आहे. तो पूर्ण करणारी व्यक्ती ‘दशग्रंथी विद्वान’ म्हणून मान्यता पावते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या प्रत्येक वेदाचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे चार भाग आहेत. या लेखात आपण उपनिषदांचा विचार करणार आहोत. वेदांचा तो अंतिम भाग असल्यामुळे त्याला वेदान्त असेही म्हणतात.

प्रत्येक वेदाच्या अंतर्गत काही उपनिषदे येतात. मुख्यत: आत्मा आणि ब्रह्मविद्या हाच त्यांचा प्रतिपाद्य विषय असतो. तो अर्थातच अवघड असल्यामुळे गुरूजवळ (गुरुगृही) बसून आत्मसात करावा लागतो. अशी उपनिषदे १००हून अधिकआहेत. परंतु त्यातील ११ प्रमुख मानली जातात. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषितकि ब्राह्मण, श्वेताश्वतर, जाबाल आणि नारायण (येथे तीन अधिक घेतलेली आहेत) ही उपनिषदे खूपच महत्त्वाची आहेत. उपनिषदांना श्रुती म्हणतात. गीता आणि ब्रह्मसूत्रांचे मूळसुद्धा उपनिषदेच आहेत. वैदिक धर्माचे ते आधार आहेत. ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘तत्त्वमसि’, ‘प्रज्ञानं ब्रह्म’ आणि ‘ॐ तत्सत् ब्रह्म’ ही भारतीय तत्त्वज्ञानातील महावाक्ये उपनिषदांमध्येच प्रतिपादित केलेली आहेत.

कोणतेही उपनिषद वाचताना किंवा अभ्यास करताना सुरुवातीला शांतिमंत्र म्हणण्याची पद्धत आहे. उदा. :

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांति: शांति: शांति:॥

आता आपण प्रमुख उपनिषदांचा परामर्श घेऊ.

ईशावास्योपनिषद
हे १८ श्लोकांचे लहान उपनिषद यजुर्वेदाचा भाग आहे. ब्रह्मविद्या हाच यातील मुख्य विषय आहे. स्वर्गादि लोकांची अभिलाषा सोडून, कर्मत्याग करून आत्मनिष्ठ व्हावे, हे मुमुक्षु लोकांसाठी आवश्यक कर्तव्य आहे. आत्मतत्त्वाच्या ज्ञानाने विद्वान मुक्त होतात. त्यानंतर मोह व शोक होत नाही. सर्व वेदांचे प्रतिपाद्य अर्थ निवृत्तीमार्ग व प्रवृत्तीमार्ग (ज्ञाननिष्ठा व कर्मनिष्ठा) हेच आहेत. जीवन्मुक्ताचे अन्नग्रहण करणे, स्नान, विद्यादान इत्यादी गोष्टी कर्मांमध्ये मोडत नाहीत. त्यांना कर्माभास म्हणतात. प्रारब्धानुसार शरीर क्रिया करत असते. ज्ञानी पुरुषांचे प्राण शरीरातच ब्रह्माला मिळतात, असे श्रुतीचे सांगणे आहे.

केनोपनिषद 
हे सामवेदाचे उपनिषद चार खंड आणि एकूण ३४ श्लो कांचे आहे. यातही ब्रह्मविद्या आणि निवृत्तीमार्ग वर्णिलेला आहे. शरीराच्या श्रोत्रादि इंद्रियांमध्ये शब्दादि विषय ग्रहण करण्याचे जे सामर्थ्य आहे, ते चैतन्यमय आत्म्यात नित्य स्थित असून, तेच सर्वांचे प्रेरक असते. म्हणून अहंभाव सोडून पुरुषाने (स्त्रीनेही) विवेकाच्या आधारे मुक्ती मिळवावी. तर्क, विद्वत्ता, यज्ञ, दान, तप इत्यादीच्या योगाने ते ज्ञान मिळत नाही. शास्त्र प्रत्यय, आचार्य प्रत्यय आणि आत्मप्रत्यय (बोध) यांच्या योगानेच ते जाणले पाहिजे. सुसंस्कृत मनाने ब्रह्म स्वसंवेद्य आहे. आम्हाला ‘ते’ समजले, असे जे म्हणतात ते ‘परोक्ष (अप्रत्यक्ष)’ ज्ञानीच असतात. बुद्धिप्रत्ययाच्या द्वारे ब्रह्माला जाणणे आणि ‘स्व’स्थ राहणे, हीच अपरोक्षानुभूती. देवादिकांनाही ती प्राप्त होईलच अशी शाश्व’ती नाही.

काठकोपनिषद 
कृष्णयजुर्वेदात यमराजाने नचिकेताला सांगितलेली ही ब्रह्मविद्या आहे. दोन अध्याय आणि एकूण सहा वल्लींमध्ये (प्रकरणे) ती विशद केलेली आहे. पित्याच्या आज्ञेने नचिकेत यमलोकात गेला. त्याला यमराज उपदेश करतो. पुत्र-संसारादि विषयांचे प्रेम हे ‘प्रेय’ असून, आत्मप्राप्ती हेच ‘श्रेयस्कर’ आहे. गुरू दोन प्रकारचे असतात. एकाला फक्त शाब्दिक ज्ञान असते, तर दुसरा आत्मतत्त्वाचा अनुभव घेतलेला असतो. तो (दुसरा) साक्षात ब्रह्मच असतो. त्याच्याच उपदेशाने ब्रह्मबोध होतो. चित्ताला विषयांपासून दूर करून, आत्म्यामध्ये स्थिर झाले पाहिजे. बाह्य  इंद्रियांना आत्मा दिसत नाही. अभ्यासाने अंतर्मुख केलेली बुद्धी तमाचा नाश करून स्वप्रकाश देवाला जाणून हर्ष आणि शोक यांचा नाश करते. प्रणव अर्थात ओंकार हा आत्मावाचक शब्द आहे आणि उपासनेसाठी तोच प्रतीक (योग्य) आहे. त्यानेच ब्रह्मलोक प्राप्ती होते.

इंद्रियांची बहिर्मुखता हा ज्ञानप्राप्तीमधील अडसर आहे. त्यावर यम- नियमांनी मात करावी लागते. जीव आणि ईश्वर यात भेददृष्टी ठेवणारे अनेक योनींमध्ये उत्पन्न होतात. ब्रह्म जाणणाऱ्याला पुन्हा जन्म नाही. तो मुक्त होतो. ब्रह्म हे संसार मायावृक्षाचे मूळ आहे. नचिकेत यमाने सांगितलेली विद्या आणि समग्र योग जाणून ब्रह्मरूप झाला.

प्रश्नोपनिषद 
अथर्ववेदातील या उपनिषदात एकूण सहा प्रश्नरूपी प्रकरणे आहेत. श्लोकसंख्या ६० आहे. पिप्पलाद मुनींनी सगुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या कात्यायनादि सहा मुनींना निर्गुण ब्रह्मज्ञान दिले. स्थूल देहाच्या जन्माचा क्रम सुरुवातीला दिला आहे. कर्म व उपासना सांगणारी ती अपरा विद्या आहे. सृष्टीचा संपूर्ण क्रम त्यात येतो. ब्रह्मचिंतक उत्तरायण मार्गाने ब्रह्मलोकी जातात. (१)

भार्गवांनी सूक्ष्मदेहाबद्दल विचारणा केली. स्थूल देह पांचभौतिक आहे. हात-पायांच्या द्वारे तो फक्त क्रिया करतो. मनचक्षु आदि ज्ञानवर्ग त्याला प्रकाशित करतात. प्राण त्या सर्वांचे धारण करतो. देह हा फुकट असून संसाराचे कारण प्राणच आहे. (२)

प्राणाच्या उपासनेचे (ध्यानाचे) फल क्रममुक्ती हे आहे. त्या संदर्भात आश्वणलायन कौसल्याने काही प्रश्न विचारले. पिप्पलाद मुनींनी सांगितले, की, ‘परमात्म्यापासून प्राण उत्पन्न झाला. प्रतिबिंब जसे मिथ्या, तसा प्राणसुद्धा आत्म्यामध्ये कल्पिलेला आहे. पूर्वजन्मांमध्ये मनाने जे कर्म केलेले असते, तेच प्राणाला स्थूल शरीरात येण्याचे कारण आहे. शरीरातील उष्णत्व शांत झाले, की व्यक्ती एका देहातून दुसऱ्या देहात जाते. प्राणाचे ध्यान केल्याने मुमुक्षु योग्य वेळ आल्यावर मुक्त होतो. (३)

अपराविद्येचे म्हणजे कर्म व उपासना यांचे फल, ब्रह्मलोकापर्यंतचा सर्व संसार हे आहे. गार्ग्य मुनींनी संसारात मोक्षफल देणाऱ्या परा विद्येसाठी प्रश्न विचारले. गुरु सांगतात, ‘झोपण्याच्या वेळी बाह्य दशेंद्रिये आंतर बुद्धीसह निजतात. त्यामुळे इंद्रियांच्या श्रवणादि क्रिया त्या वेळी चालत नाहीत; पण झोपेतही प्राण श्वाइस-उच्छ्‌वास क्रियेने जागा असतो. जगताच्या आधारानेच परमात्म्याला ओळखायचे असते. त्या अक्षरब्रह्माला जो जाणतो (परा विद्या) तो सर्वज्ञ आणि सर्वात्मा होतो.’ (४)

सत्यकामाने प्रणवाच्या (ओंकार) साधनफलाबद्दल विचारले. गुरूंनी सांगितले, की, ‘ओंकार हे अपर आणि पर (प्रत्यक्ष) ब्रह्माचे प्रतीक आहे. अपर ब्रह्मचिंतनानेच मुक्ती मिळते. परब्रह्म हे शांत, जरा- मरणरहित आणि निर्भय असते. (५)

भरद्वाज मुनींनी मुक्तीमुळे प्राप्त होणाऱ्या परब्रह्माविषयी प्रश्न केले. गुरुजी म्हणाले, ‘परब्रह्म पुरुष आपल्या हृदयात सर्वकाल असतो. त्याच्यामध्ये प्राण, श्रद्धा, आकाशादि पंचमहाभूते, इंद्रिये, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म, लोक व नाम अशा सोळा कलांचे अस्तित्व मानलेले आहे. त्याचे ज्ञान आपल्या शरीरातच होणे उचित आहे. ते ज्ञान करून देण्यासाठीच सर्व वेदान्त (उपनिषदे) निर्माण झाला आहे.’ (६)

मुंडकोपनिषद   
अथर्ववेदातील या उपनिषदात तीन अध्याय, प्रत्येकात दोन खंड आणि एकूण ६४ श्लोक आहेत. ज्या बुद्धीने सहा शास्त्रांसहित सर्व वेदांचे ज्ञान होते, तिला अपराविद्या म्हणतात. ब्रह्मज्ञान ही परा विद्या आहे. ती ज्ञानी गुरूच्या उपदेशाने प्राप्त होते. ब्रह्म जाणल्याने सर्वच ज्ञान होते. कर्माच्या अनुष्ठानाने ज्ञानाधिकार प्राप्त होतो. त्या योगे आत्मजिज्ञासा निर्माण होते आणि विचारांचे पर्यवसान ज्ञानात होते. ब्रह्म हा ज्ञानेंद्रियांचा विषयच नाही. कर्मेंद्रिये त्याचे ग्रहण करू शकत नाहीत. ते अक्षरब्रह्म नित्य आहे. तेच मायाशक्तीने ‘विविध’ होते. आणि सर्वात्मक आहे म्हणून विभु (नित्य-शाश्वंत) आहे. त्याला देशकालाचे बंधन नाही. त्याच्यापासून वेदादि सर्व जगत झाले; पण ब्रह्म जगदाकार नाही. 

कामना ठेवून कर्म केल्यास त्याचे फल स्वर्ग आहे. नित्यकर्माचे फल चित्तशुद्धी आहे. भोग आणि मोक्ष या दोन्हींसाठी कर्मे आवश्यक आहेत. ब्रह्म-आत्मतत्त्व अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून योग्य ब्रह्मनिष्ठ गुरूवाचून त्याचे ज्ञान होत नाही. श्रवण, मनन, निदिध्यासाच्या योगाने अज्ञान, संशय व विपरीत भावना यांचा नाश होतो. सूक्ष्म-स्थूल देहरूप गुहेत जे साक्षी असे चैतन्य आहे, तेच सर्वात्मक ब्रह्म होय. ते अखंड, एकरस ब्रह्म समाधीतच अनुभवास येते. त्यासाठी ईश्वराचा अनुग्रह लागतो. जो कोणी ब्रह्माला जाणतो, तो स्वत: ब्रह्म होतो - परमपदाला प्राप्त होतो.
(उत्तरार्ध पुढील भागात)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search