Next
‘स्वच्छता ही चळवळ व्हावी’
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा ठाण्यात आरंभ
मिलिंद जाधव
Wednesday, September 19, 2018 | 12:48 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
‘स्वच्छता हे केवळ अभियान न राहता ती लोकचळवळ व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने व्यापक स्वरूपात स्वच्छतेची मोहीम हाती घ्यायला हवी,’ असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव यांनी केले. ‘स्वच्छता ही सेवा’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा जिल्हास्तरीय आरंभ १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

पुढील पंधरा दिवस अभियान कशा प्रकारे राबवले जाणार आहे, याची कार्यशाळाही या वेळी पार पडली. सुभाष पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्ह्यातील हागणदारीमुक्त गावांचा आढावा घेऊन ‘हागणदारीमुक्ततेचे उद्दिष्ट साध्य केले असून, आता सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन केले जात आहे,’ असे सांगितले. उपस्थित असणारे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, कैलास जाधव, अरुण भोईर आदींनी जिल्हा स्वच्छ, सुंदर होण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत मत व्यक्त केले. शिवाय या मोहिमेत सातत्य राहावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.  

उपस्थितांनी घेतली स्वच्छतेची शपथ
या अभियानाच्या उद्घाटनावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या शपथेतून व्यक्तिगत, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी रिड्यूस, रिसायकल आणि रियुज या सिद्धांताचा स्वतः अंगीकार करून इतरांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशीही शपथ घेण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी शपथवाचन केले.

१५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबवण्यात येणार असून, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा आयोजित करून विद्यार्थांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती केली जाणार आहे. तसेच बचत गट मेळावे आयोजित करणे, गृहभेटी देणे, एकत्रित श्रमदान करणे आदी उपक्रमांतून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहचवण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य गावांना भेटी देणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे पन्नास नोडल अधिकारी नेमण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search