Next
‘सुप्त मनाची शक्ती ओळखा’
मानसी मगरे
Wednesday, October 10, 2018 | 02:18 PM
15 0 0
Share this article:

दीप्ती पन्हाळकरसकारात्मकतेमुळेच मानसिक आरोग्य सुदृढ राहू शकतं. १० ऑक्टोबर हा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘बदलत्या जगात तरुण आणि मानसिक आरोग्य’ अशी या दिवसाची यंदाची संकल्पना आहे. ‘तरुणांचं मानसिक आरोग्य’ या विषयावर पुण्यातील मानसशास्त्रज्ञ दीप्ती पन्हाळकर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यशाळा घेतात. मानसिक आरोग्य अबाधित राखणाऱ्या अन्य अनेक संकल्पनांवरही त्या कार्य करत आहेत. आज नवरात्रौत्सवाची सुरुवातही होत आहे. या दोन्हींचं औचित्य साधून, समाजाची मनःशक्ती वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या या स्त्री-शक्तीशी साधलेला हा संवाद...
................
तुमच्या मते सकारात्मकता म्हणजे नेमकं काय?
- सकारात्मकता किंवा नकारात्मकता असं अगदी थेट वर्गीकरण आम्ही करत नाही. कारण मुळात नकारात्मकता ही आपल्या स्वभावात काही ना काही प्रमाणात असतेच. ती आपण समूळ नष्ट करू शकत नाही. त्याची तीव्रता फक्त कमी करता येऊ शकते आणि ही नकारात्मकतेची तीव्रता कमी करणं म्हणजेच सकारात्मकता असं मला वाटतं. त्यातही सकारात्मक असणं, म्हणजे तुम्ही अगदी सदा सर्वकाळ आनंदीच असलं पाहिजे किंवा बागडत असलं पाहिजे, असंही नाही. कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करण्यासाठी एक विशिष्ट ऊर्जा लागते, एक दृष्टिकोन लागतो, मनाची शक्ती लागते. या सगळ्यासाठी ऊर्जा देणारी शक्ती म्हणजे सकारात्मकता. 

‘माइंड जिम’ ही एक नवीन संकल्पना घेऊन तुम्ही काम करत आहात. ती संकल्पना नेमकी काय आहे आणि तिचं महत्त्व काय?
- ‘माइंड जिम’ ही एक अद्भुत संकल्पना आहे. सायकॉलॉजी हा विषय घेऊन एमए झाल्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्ष माझ्या कामाला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला मला मुलांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मी सेमिनार्स घेतले. तिथे एक गोष्ट लक्षात आली, की या मुलांची प्रत्येकाची आत्मविश्वासाची वेगळी पातळी आहे, पद्धत आहे. म्हणून त्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. सुप्त मन (सबकॉन्शस माइंड) प्रत्येकात असतं. या मनाचा उपयोग करून आपली उद्दिष्टं साध्य कशी करावीत, या अभ्यासातून मला ‘माइंड जिम’ ही संकल्पना मिळाली.  

‘रिप्रोग्राम युवर सबकॉन्शस माइंड’ ही तुम्ही सांगत असलेली संकल्पना नेमकी काय आहे?
- आपल्याला दोन मने असतात. जागृत मन (कॉन्शस माइंड) आणि सुप्त मन (सबकॉन्शस माइंड). बऱ्याचदा आपल्या कृतींवर आपल्या जागृत मनाचा पगडा असतो, पण ती कृती करण्यासाठीची प्रेरणा ही सुप्त मनाकडून मिळालेली असते. खरं तर सुप्त मन हे जागृत मनापेक्षा कितीतरी पटींनी अधिक शक्तीशाली असतं. परंतु त्याची ती ऊर्जा आपण वापरली पाहिजे, याची जाणीवच आपल्याला नसते. हा इतका मोठा ऊर्जास्रोत असलेलं सुप्त मन, त्याची शक्ती वापरली गेली पाहिजे याची जाणीव करून देणारी माध्यमं विकसित करणं हे काम ‘रिप्रोग्रामिंग ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ या संकल्पनेमध्ये केलं जातं.

तुमची संकल्पना जागतिक दर्जाचे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस आणि त्यांनी मांडलेल्या ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ या संकल्पनेशी निगडित आहे किंवा त्याच्या जवळ जाणारी आहे, असं वाटतं का ?
- सर्वांत आधी सांगायचं झालं, तर अल्बर्ट एलिस हे या सगळ्या संकल्पनांचे गॉडफादर आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी खूप छान प्रकारे या संकल्पनांवर काम केलं आहे. इथे आम्ही एकाच नाही, तर अनेक पायऱ्यांवर याचा अभ्यास करतो. अल्बर्ट एलिस यांची थिअरी तुमच्या आतल्या आवाजाला म्हणजे तुमच्या सुप्त मनाला थेट आव्हान देण्याचं काम करते. काही प्रमाणात त्यांच्या या थेरपीचा काही भाग आम्ही वापरतो. उदा. तुम्ही एखादं छान काम करताय आणि त्याचं कौतुक झालं पाहिजे, ही तुमची एक नैसर्गिक अपेक्षा असते. परंतु ते तसं जेव्हा होत नाही, तेव्हा तिथे आपल्याला वाटणाऱ्या भावना नियंत्रित करण्याचं काम एलिस यांच्या थेरपीतून केलं जातं. 

(दीप्ती पन्हाळकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search