Next
‘मर्मबंधातली ठेव’
BOI
Monday, June 26, 2017 | 03:45 PM
15 1 0
Share this article:

सतीश आळेकरपुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिले दोन-तीन दिवस नाट्यमहोत्सव झाला होता. ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भालबा केळकर यांचे ‘तू वेडा कुंभार’ हे नाटक त्यात सादर झाले होते. आताचे ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते सतीश आळेकर यांनी त्या नाटकात काम केले होते. अशा रीतीने उद्घाटन सोहळ्याशी थेट जोडले जाण्यात एक वेगळीच ‘एक्साइटमेंट’ होती, अशी आळेकर यांची भावना आहे. ‘बालगंधर्व’चं सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आळेकर यांनी जागवलेल्या या सोनेरी आठवणी...
.................
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहाण्याचा योग मला आला. त्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झाली होती आणि तो सोहळाही अविस्मरणीय झाला! माझे घर ‘बालगंधर्व’पासून जवळच, शनिवार पेठेत असल्यामुळे मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो. तेव्हाचा तो काळच खूप वेगळा होता. विशेष म्हणजे ही पन्नास वर्षांपूर्वीची घटना असली तरी त्यातल्या काही गोष्टी मला आजही स्पष्ट आठवतात. सर्वांत आधी आठवते ते सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी एकत्र सादर केलेले भजन. तिघांचेही वैशिष्ट्यपूर्ण आवाज त्या वेळी छान लागले होते!

आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिर स्मरणिकेची. अभिनेते बालगंधर्व आणि बालगंधर्व रंगमंदिरावर अनेकांचे लेख त्यात छापण्यात आले होते. रंगीत छायाचित्रे आणि उत्तम छपाई यामुळे ही स्मरणिका सर्वांगसुंदर झाली होती. बालगंधर्वांच्या निधनाला नुकतेच काही महिने झाले असल्यामुळे ही स्मरणिका अनेकांच्या दृष्टीने ‘मर्मबंधातली ठेव’ बनली होती! पाच दशकांनंतर आज तिचे मोल मोठे आहे यात शंका नाही. वसंत शांताराम देसाई आणि अनेक मान्यवरांचे त्यातील लेख असलेला तो एक भरगच्च दस्तऐवजच आहे. या स्मरणिकेचे संपादन ज्येष्ठ पत्रकार, संपादक व माझे सासरे प्रसन्नकुमार अभ्यंकर यांनी केले होते. ते त्या वेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुण्यातील कार्यालयाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम पाहत होते. पुण्यातील अनेक ग्रंथालयांमध्ये हा दुर्मीळ अंक आज नक्कीच पाहायला मिळेल.

विशेष म्हणजे बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवातील एका नाटकातही मला काम करता आले. त्यामुळे मी एक प्रकारे या सोहळ्याशी जोडला गेलो! तेव्हा मी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ऊर्फ ‘पीडीए’तर्फे सादर झालेल्या ‘तू वेडा कुंभार’ या नाटकातील गावकऱ्यांपैकी एकाचे काम केले होते. माझ्याबरोबर आमचा रंगकर्मी मित्र समर नखाते हाही होता. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘जाणार कुठे’ या साहित्यावर आधारित ही नाट्यकृती भालबांनी बसवली होती. अरुण जोगळेकर यांनी तिची रंगावृत्ती तयार केली होती. त्यातील प्रमुख भूमिका डॉ. जब्बार पटेल यांनी केली होती. ‘पीडीए’चे त्या काळात गाजलेले हे एक महत्त्वाचे नाटक, राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेले! ‘बालगंधर्व’च्या उद्घाटन सोहळ्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी या रंगमंदिराच्या मंचावर सादर झालेले नाटक असल्यामुळे त्यात एक वेगळीच एक्साइटमेंट होती. 

अत्यंत प्रशस्त रंगमंच व तितक्याच प्रशस्त विंग्ज असणारे तेव्हाचे हे बहुधा पहिलेच नाट्यगृह. शिवाय संपूर्ण पडदा वर जाण्याची यंत्रणा असण्यामुळे त्या रंगमंचालाही एक भव्यता आली होती. रंगमंचाच्या मध्याला लागून खाली एक मोठे तळघर बांधण्यात आले होते. त्यामध्ये नाटकाचे सेट व वस्तू असत. तो गाळा वर उचलला जाऊन थेट मंचावर येई. त्यामुळे नाटकांना त्यांचे सेट लावणे अत्यंत सुलभ होई. याशिवाय कडेच्या विंग्जना लागून मोठे शटर असल्यामुळे बाहेरगावच्या नाटकांचे ट्रकने आलेले सामान तिथून उतरवून घेण्याची सोय होती. ते शटर नुसते उघडले, तरी सामान वाहून आणलेल्या ट्रकची मागची बाजू त्याला टेकत असे. 

मंचाची ही सुविधा ज्येष्ठ साहित्यिक व नाटकककार पु. ल. देशपांडे, तसेच त्यांच्या पत्नी सुनीताबाईंच्या कल्पकतेतून साकार झाली होती. ‘बालगंधर्व’मधील शिस्त, तसेच स्वच्छता कायम राहावी यासाठी या दोघांनी एक लेखी नियमावलीच तयार केली होती! त्या वेळी या रंगमंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी मुकुंद सबनीस नावाचे व्यवस्थापकही पुणे महापालिकेतर्फे नेमण्यात आले होते. मूळ ओव्हरसीयर असणारे सबनीस हे स्वत: नाट्यरसिक व संगीतप्रेमी असल्यामुळे त्यांनी रंगमंदिराची व्यवस्थाही उत्तम ठेवली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांनी नंतर कर्णिक नावाच्या दुसऱ्या संगीतप्रेमी व्यवस्थापकांची नेमणूक केली होती! या काळात शिस्त, स्वच्छता व त्यासाठी ‘पुलं’ आणि सुनीताबाईंनी तयार केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केले जात असे. नंतरच्या काळात मात्र हे सारं थांबलं.

या काळानंतर काही वर्षांनी मी आणि ‘पीडीए’मधील काही रंगकर्मी यांनी थिएटर अॅकेडमी ऊर्फ ‘टीए’ नावाची नवीन नाट्यसंस्था स्थापन केली. आधी पीडीए व नंतर ‘टीए’तर्फे गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या पहिल्या नाटकाचे अनेक प्रयोग ‘बालगंधर्व’च्या मंचावरच झाले व गाजलेही! घाशीराम नंतर ‘टीए’ची पुढची सर्वच नाटके याच रंगमंदिरात झाली. अशा माझ्या अनेक आठवणी बालगंधर्व रंगमंदिराशी निगडित आहेत आणि त्या यापुढेही राहतील! 

(शब्दांकन : विवेक सबनीस)

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anuya Palav About
Apratim athavaninchi shrunkhala.
0
0

Select Language
Share Link
 
Search