Next
पाऊसमय भेट
BOI
Sunday, June 10, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


पावसाने जोर धरला. तुफान कोसळायला लागला. क्षणात तू ओलाचिंब झालास, अन् तुझी नजर सांगत होती की मीही..! हात फैलावून चेहऱ्यावर पाऊस झेलू लागलास. या पावसाची मी कित्ती वाट पाहत होतो, तुला कल्पना नाही, पाऊस मला खूप आवडतो आणि पावसात...', पुढे बोललाच नाहीस. पाऊस झेलत राहिलास, झेलत राहिलास, झेलतच राहिलास.. वाचा ‘हॅशटॅग (##) कोलाज’मध्ये...
...................
परवा तुला भेटण्याची खूप इच्छा झाली होती. भेटायचं नेमकं कारण माझ्याकडेही नव्हतं, पण भेटायचं नक्कीच होतं. तसं तर मनात सांगण्यासारखं खूप काही होतं, पण त्यातलं काहीच ओठांवर आणायचं नाही, हे मी आधीच ठरवलं होतं. तुला फोन केला भेटशील का विचारलं आणि कधी नव्हे ते तू पहिल्याच झटक्यात ‘हो’ म्हणालास. मग भेटण्याची वेळ ठरवली आणि ठिकाणही. अर्थात नेहमीप्रमाणे या दोन्ही गोष्टी तूच ठरवल्यास. मी फक्त पोहचायचं काम करणार होते, तेही वेळेवर. मला जरादेखील उशीर झाला, की तू आपला फुरंगटून बसतोस. तुला वाट पाहायला आवडत नाही. मग मी कितीदाही ‘सॉरी’ म्हणून विनवलं, तरी तुझी संवादाची गाडी काही केल्या पुढे जात नाही. खरं तर वाट पाहायला मलाही आवडत नाही. मला आजही लख्ख आठवतंय, आपण अगदी पहिल्यांदा भेटणार होतो. त्याच वेळेस तुला बजावलं होतं, ‘वेळेवरच ये.’ यावर मला म्हणाला होतास, ‘बाईसाहेब इंतजार का भी अपना एक मजा होता है!’

तुझ्या या वाक्यावरून तू उशीर करणार हे ओळखून मी दहा मिनिटे उशिरा पोहोचले होते तेव्हा. तरी पठ्ठ्या, तू तेव्हाही पोहोचलाच नव्हतास. मला विनाकारण उशीर करायची सवय नसल्याने जेव्हा कधी आपण भेटायचं ठरवलं, बहुतेकदा तुझ्या आधीच मी पोहोचले. मध्यंतरी एकदा कधी नव्हे ते, तू वेळेवर पोहोचलास. खरं तर वेळेवर नव्हे, माझ्या आधी पोहोचलास. ती सगळी भेट शांततामाईच्या अधीन होती. कारणही जाणून घ्यायचा प्रयत्न केला नव्हतास. तू मात्र प्रत्येक वेळेस वाट पाहायला लावलीस आणि मी निमूटपणे पाहिलीसुद्धा. वाट पाहायला अजिबात आवडत नसतानाही... का? हे मात्र कळत नाही...!!

त्या दिवशीसुद्धा अशीच घाई झाली. रविवारचा दिवस आणि घरी काका-काकू, बच्चेकंपनी आलेली. त्यातच पुरणपोळीचा बेत आखलेला. तुला जेवणात नेमकं काय आवडतं ठाऊक नव्हतं. तरीही तुझ्यासाठी पुरणपोळी घ्यायची ठरवलं. सकाळची लगबग लक्षात घेऊन वेळेवर पोहोचता यावं यासाठी मनातल्या मनात ताळेबंद करून, दुसऱ्या दिवशी लवकर घराबाहेर पडणार असल्याचं आईला रात्रीच सांगून टाकलं. त्यामुळे तिने आणि काकूनेही सकाळपासूनच पुरणपोळीची तयारी सुरू केली होती. मग फटाफट तुझा आणि माझा डबा भरला. पुरणपोळीचा डबा असल्याने ऑफिसमध्ये मोजूनच कसं नेणार म्हणून मी दोन डबे घेत असावे, असा अंदाज आईने लावला असणार. म्हणूनच मग तिने मला काहीच विचारलं नाही. मीसुद्धा काहीच बोलले नाही. अर्थात हा डबा तुला म्हणजे नेमका कोणाला देणार हे मी तरी कुठे सांगू शकणार होते. आवाराआवर केली, स्कूटी काढली.

वेळेवर पोहोचण्याशी प्रामाणिक राहता यावं यासाठी सुसाट निघाले. ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. तू आलेला नव्हतासच. पाच मिनिटे, १० मिनिटे, १५ मिनिटे. तुझा काहीच पत्ता नाही. फोनही घेत नव्हतास. विसाव्या मिनिटाला मी वैतागलेच, तेवढ्यात तुझा फोन आला, अचानक महत्त्वाचं काम आलं त्यामुळे यायला जमणार नाही... यापुढेही तू काहीतरी बोलत होतास. मला काहीच ऐकू येत नव्हतं आणि माझं काहीही ऐकून घेण्याआधी तू फोन कट करून मोकळा झालेला. तब्बल चार वेळा ‘भेटणं अशक्य’ या तुझ्या उत्तरानंतर ठरवलेला प्लॅनही तू सहज फिसकटवलास. तुझ्या त्या फोननंतर एकदम भोवळंच आल्यासारखी झाली. तू येणार हे ठाऊक असल्यानं रस्त्याच्या कडेला उभं राहण्यात काहीच वावगं वाटलं नव्हतं; पण आता सगळ्या नजरा आपल्यालाच पाहताहेत आणि दात विचकटून हसताहेत की काय असं वाटू लागलं होत. तुझा प्रचंड राग येत होता आणि रागवताही येत नव्हतं. विचित्र हतबलता होती. मनात असंतोष होता. गाडीची दिशा बदलवली. ऑफिसला पोहोचले. सगळा दिवस तू उदासवाणा केला होतास; पण तुला याची कल्पनाही नव्हती आणि मला ती तुला द्यावीशीही वाटली नाही. सगळं आलबेल असल्यासारखंच वागायचा मी ही खोटा प्रयत्न करत होते. तुझ्यासाठी घेतलेला डबा माझ्याकडे हिरमुसून पाहत होता. त्यामुळे माझ्याही डब्याला मला हात लावावासा वाटला नाही. ‘अचानक महत्त्वाचं काम आलं’ या वाक्याभोवती मन घुटमळत राहिलं. माझ्यापेक्षा महत्त्वाची कामं तुझ्या आयुष्यात निश्चितच असू शकतात; पण तू ते ज्या पद्धतीनं सांगत होतास त्यात कुठेच अपराधीभाव नव्हता, की मला झालेल्या त्रासाची जाणीवही नव्हती. संताप, संताप आणि प्रचंड संताप.

तुझ्यामुळे मी ऑफिसमध्येही पूर्णपणे नव्हते. ना धड कोणाशी नीट बोलत होते. तुझा राग कोणावरही निघत होता. अगदी स्वत:वरही. मग सरळ लेडीज रूमच्या बेसीनपाशी गेले. चेहऱ्यावर पाणी मारलं. पाण्याचा मार बसल्याची जाणीव झाली. मग नुसतंच बेसिनच्या नळाखाली हात धरून उभी राहिले. ‘पाणी वाया घालवू नका’ची समोरची पाटी दिसली तसा नळ झटकन बंद केला. दीर्घ श्वास घेतला. जरा रिलॅक्स वाटलं. मनावरचं मळभ बेसिनच्या पाइपमधून बाहेर गेल्यासारखं वाटलं. खूप छान फील होत असल्याची जाणीव स्वत:लाच जाणीवपूर्वक करून दिली. बाहेर आले. पुढचा सगळा वेळ कामात झोकून दिला. काम करण्यात वेळ गेल्याचंही लक्षात आलं नाही. सकाळचा प्रसंग आणि त्या विषयीचा रागही निवळला होता. रात्री साडेनऊ वाजता साइन आउट केलं. वहीत निघतानाची सही केली.
स्कूटीपाशी पोहोचले. डिकी उघडली. दोन्ही डबे पुन्हा त्यात ठेवून दिले. 

आकाशाचा काळा रंग अधिकच गहिरा झाला होता. नभ दाटून आले होते. थेंब-थेंब पडायला सुरुवात झाली होती. गार वारा वाहत होता. डोक्याला ओढणी बांधावी म्हणून गळ्यातली ओढणी काढणार, इतक्यात ती एका बाजूने ओढल्यासारखी वाटली. मी मागे वळून पाहिलं, तर तूच एकदम समोर उभा राहिलास. म्हणालास, ‘निघालीस?’ आता हा प्रश्न होता की ‘थांब ना’ अशी सूचना. प्रश्नातील लडिवाळ सूचना तुला फार छान जमते. मलाही काहीच सुचलं नाही तेव्हा. माझ्या ओढणीचं एक टोक अजूनही तुझ्या हातात होतं. ‘चल, ब्रिजवर जाऊ या. कायम म्हणत असतेस ना, ब्रिजवर बसून गप्पा मारायच्यात. चल जाऊ या आत्ता..’ शब्दच फुटत नव्हते मला. तसं तू हातातलं ओढणीचं टोक ओढलंस. म्हणालास, ‘पार्किंगमध्येच असू दे तुझी गाडी आणि रेनकोट वगैरेसुद्धा. हां फक्त मघाशी दोन डबे डिकीत जाताना बघितलेत मी. तेवढे घे आणि माझ्या गाडीवर बस. घरीदेखील आज मीच सोडणार.’ सूचना आणि धमकी एकाच वेळेला तुलाच देता येते. 

मी भारावल्यासारखं, तू सांगितलंस ते करत गेले. ब्रिजवर पोहचलो. गाडी तिरकी करून लावलीस. गाडीला रेलून फुटपाथवर बसलो. डबे उघडले. थेंब-थेंब पावसात ओल्या ओल्या पुरणपोळीची लज्जतच निराळी झाली होती. इतक्यात पावसाने जोर धरला. तुफान कोसळायला लागला. क्षणात तू ओलाचिंब झालास, अन् तुझी नजर सांगत होती की मीही...!!! हात फैलावून चेहऱ्यावर पाऊस झेलू लागलास. ‘या पावसाची मी कित्ती वाट पाहत होतो, तुला कल्पना नाही, पाऊस मला खूप आवडतो आणि पावसात...,’ पुढे बोललाच नाहीस.

पाऊस झेलत राहिलास, झेलत राहिलास, झेलतच राहिलास.. चिंब झाला होतास तरी भिजायचं होतं तुला. तुझ्या खडूस वाटणाऱ्या इमेजला तूच तडा देत चालला होतास. निराळाच तू, आज नव्याने दिसत होतास. तुझ्याकडे पाहण्यात मी इतकी दंग झाले होते, की तू माझा हात धरून आपल्यातलं अंतर कधी कमी केलंस कळलंच नाही. हे लक्षात आल्यावर मी मागे सरकायच्या आत तू माझा हात खेचून आपल्यातलं अंतर आणखी कमी केलंस अन् म्हणालास, ‘तुझा आवडता ब्रिज आणि माझा आवडता पाऊस या दोन्हींचं कॉम्बिनेशन खूपच झक्कास आहे. दर वर्षीच्या पावसात तुझ्या या ब्रिजवरच्या आनंदात मला वाटेकरी करशील...?’ ओठांवर नकळतपणे उमटलेली स्मितरेषा.. इतकंच उत्तर होतं माझ्याकडे. पुढे काही बोलायची आता गरजच उरली नव्हती. तुझ्या हातात माझा हात तसाच होता. प्रेमाची पहिली कबुली अन् पहिला पाऊस हे ही कॉम्बिनेशन झक्कासच तर होतं. माझ्यासाठी सगळं स्वप्नवत होतं. खूप वेळ आपण मनसोक्त भिजलो. तुझा आवडता पाऊस मलाही आवडायला लागला होता. 

ठरल्याप्रमाणे तू घरी सोडवायला आलास. गाडीवरून उतरल्यावर तू पुन्हा हात खेचून थांबवलंस मला. तूही गाडीवरून उतरलास. माझ्या कपाळावर ओठ टेकवलेस आणि तसाच कानाशी सरकलास. एका दमात श्वासही न घेता म्हणालास, 'तुझं आत्ताचं पाऊसमय होणं, एकदम भन्नाट आहे; पण त्याहीपेक्षा सकाळी माझी वाट पाहताना अगतिक झालेल्या तुझ्या चेहऱ्यावरची लाली, तुला जास्त सूट करते डिअर.. जीवाला अगदी वेड लावते..! मी एकदम आश्चर्याने तुझ्याकडे पाहू लागले. तशी तू झटदिशी बाइकला किक मारलीस आणि पुढे जाऊन मोठ्याने ‘सॉऽऽऽऽऽऽरी, उद्या घ्यायला येतो गं’ म्हणत पुढच्या गल्लीत दिसेनासा झालास..!

- हिनाकौसर खान-पिंजार 
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

(दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग (##) कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link