Next
‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30, 2018 | 06:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आपण जसे क्षमतेपलीकडे काम करू शकत नाही, तसेच निसर्गाचेही आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता पुढ्च्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. निरोगी व स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करायला हवे,’ असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. समीर शास्त्री यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्यावेळी डॉ. शास्त्री यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर विद्यार्थ्याशी संवाद साधला. या वेळी परिषदेचे सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, विज्ञानशोधिकेच्या सहसंचालिका भारती बक्षी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शास्त्री म्हणाले, ‘पुण्यातील नद्यांची परिस्थिती, उरुळी देवाची याठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग हे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, अनेक प्राणघातक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच निसर्गाला समजायला, वाचायला शिकले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागतिक आणि स्थानिक पातळीवर विचार करून वैयक्तिक उपाय शोधायला हवेत. ‘मी माझं घर कचरामुक्त करणार’ असा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. पुण्यात कचरा व्यवस्थापन केंद्र आणि त्यासंदर्भातील प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन नीट व्हायला हवे.’

‘कचरा व्यवस्थापनासाठी अनेक प्रकल्प येत आहेत; परंतु ते दीर्घकाळ टिकत नाही. बायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर ते वर्षानुवर्षे सुरळीतपणे चालतात. यासाठी आपण घनकचरा व्यवस्थापनाची शाश्वत प्रणाली समजून घ्यायला हवी,’ असेही त्यांनी नमूद केले.

संजय मालती कमलाकर यांनी प्रास्ताविक केले. मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या भारती बक्षी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सागर यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. समीर शास्त्री
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search