Next
‘प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार’
फडणवीस; सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमिपूजन
प्रेस रिलीज
Friday, July 12, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देणार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिका बांधकामाचे भूमिपूजन, तसेच कोनशीलेचे अनावरण व वृक्षारोपण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार सिद्धराम म्हेत्रे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर श्रमिक पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत माने, सरचिटणीस समाधान वाघमोडे, सचिव एजाजहुसेन मुजावर, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थ‍ित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून, राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगतानाच अकराशे आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार आहेत.’ 

‘सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला गौरवपूर्ण इतिहास आहे. पत्रकार संघाने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सोलापूर पत्रकार संघाच्या रूपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली. त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील. सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांत पत्रकारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी योजना करणार आहे,,’ असे त्यांनी सांगितले.

‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळाली आहेत. २०२२पर्यंत प्रत्येक गरिबाला घर मिळवून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न राज्यात लवकरच साकार होईल. प्रत्येकाला घर मिळवून देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणे आवश्यक आहे; तसेच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमती कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. 

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे, ही आनंदाची बाब आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून पत्रकारांचे हक्कांच्या घराचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.’

ज्येष्ठ पत्रकार जोशी म्हणाले, ‘सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाच्या रूपाने २३८ पत्रकारांसाठी मोठी वसाहत उभी राहत आहे. सोलापूर पत्रकार संघाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. पत्रकार सन्मान योजनेसाठीही निधीची तरतूद केल्याने ही योजनादेखील मार्गी लागली आहे.’ 

स्वागत एजाजहुसेन मुजावर यांनी केले. विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्ता थोरे यांनी केले.  प्रशांत माने यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, सोलापूर शहर आणि परिसरातील पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थ‍ित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search