Next
‘योग्य सावधगिरीमुळे उन्हाळ्यात नेत्र रोगांपासून बचाव शक्य’
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कडक ऊन आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान यांचा डोळ्यांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते. असे असले तरी सर्वांनी सावधगिरी बाळगल्यास उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करणे सहज शक्य असल्याची माहिती एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया व कॅटरॅक्ट कन्सल्टंट डॉ. सीमा जगदाळे यांनी दिली.

सध्या वाढत जाणारे तापमान लक्षात घेऊन त्यांनी ही माहित दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘उन्हाळा हा डोळ्यांच्या आजारांचा काळ असतो. डोळे येणे हा जरी सर्वसाधारण आजार असला, तरी डोळे कोरडे पडणे, स्टाय (डोळ्याच्या पापण्यांवर लालसर सूज येणे), अ‍ॅलर्जी, पिंगेकुला (कर्करोग नसलेली पेशींची अतिरिक्त वाढ), टेरीगिअम (डोळ्यात निर्माण झालेली पेशींची गुलाबी व त्रिकोणी आकारातील वाढ) यांसारख्या रोगांनादेखील सामोरे जावे लागते; परंतु स्वच्छता राखणे, जोरात डोळे न चोळणे, आपले घर आणि कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवणे, एसीमधून थेट येणार्‍या हवेपासून दूर राहणे, इतरांची सौंदर्य प्रसाधने, तसेच रुमाल, उशी, टॉवेल आदी गोष्टी न वापरणे आणि प्रत्येक वेळी डिस्पोजेबल टिशू पेपरचा वापर करणे, साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे, युव्ही किरणांपासून बचाव होईल असा गॉगल वापरणे त्याच बरोबर स्विमिंग पूल मध्ये पोहायला जाताना युव्ही प्रोटेक्टेड गॉगल वापरणे अशी साधी परंतु अत्यावश्यक काळजी सर्वांनी घेतली, तर आपण हे रोग टाळू शकतो.’

‘डोळे येणे, अ‍ॅलर्जी, टेरेगिअम याचे प्रमाण हल्ली वाढलेले आहे. वाढते तापमान, अस्वच्छ कामाची जागा आणि संगणक आणि मोबाइल फोनचा वाढलेला वापर यांमुळे डोळा कोरडा पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे आणि म्हणूनच डोळ्यांचे विकार होण्यामागची मुख्य कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धूळ, परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने, धूर, परागकण, झाडे आणि बुरशी या घटकांमुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जी  होऊ शकते. उष्माघात, शरीरात पाण्याची कमतरता, ताप आणि डासांमुळे होणारे आजार यांसारख्या उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या आजारामुळे डोळ्यांवर परिणाम होतो ज्यामुळे डोळे कोरडे पडणे, लाल होणे किंवा डोळ्यांना थकवा जाणवणे यांसारख्या समस्या निर्माण होतात,’ डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

डोळ्यांची सर्व प्रकारची काळजी घेण्याबरोबर योग्य आहाराचे सेवन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ओमेगा-थ्री फॅटी अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असलेले पदार्थ खाण्याने डोळे कोरडे पडणे किंवा डोळे सुजणे यांसारख्या व्याधींपासून बचाव करता येतो; तसेच डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन एयुक्त पदार्थ म्हणजेच दूध, बदाम, हिरव्या भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात व दैनंदिन आहारात फळे, हिरव्या भाज्यांसह भरपूर पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

प्रतिबंधात्मक उपाय घेत असताना लोकांनी स्वतःच्या मर्जीने उपचार करणे किंवा औषधे घेणे टाळावे आणि कुठल्याही प्रकारची लक्षणे किंवा गुंतागुंत आढळून आल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search