Next
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास
BOI
Friday, June 14, 2019 | 12:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे. त्यामुळे या कामगारांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे वेगळेच तेज झळकते आहे.

अमनोरा परिसरात एस. जे. काँट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बांधकाम साइटवरील २६ महिला कामगारांना ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ची वूमन्स विंग आणि ‘कुशल-क्रेडाई’तर्फे गवंडीकामाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. गवंडीकामाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांची ही दुसरी तुकडी आहे. १० जून रोजी झालेल्या कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या २६ महिलांना प्रमाणपत्रे व ‘टूल किट’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.


‘आजवर आम्ही बांधकाम साइटवर ओझी वाहण्याचे काम करत होतो; मात्र आता आम्ही गवंडीकामातील बारकावे शिकलो आहोत. बांधकाम आणि प्लास्टर करण्याचे कौशल्य आम्हाला जमू लागले आहे आणि त्याबरोबरच बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षितता कशी राखायची तेही आम्ही शिकलो आहोत. मेहनत करायला आम्ही तयारच असतो. आता चार पैसे जास्त मिळवून घराला आणखी हातभार लावू शकू याचे समाधान वाटते,’ अशी भावना व्यक्त करताना राजश्रीबाई आणि चाँदबाई यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची एक वेगळीच झळाळी होती.

या कार्यक्रमाला ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट, ‘क्रेडाई कुशल’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, अमनोरा-सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, एस. जे. काँट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेडचे सुहास व भार्गव जंगले, आनंद कुमार सिंग, ‘क्रेडाई महाराष्ट्र वूमन्स विंग’च्या निमंत्रक अर्चना बडेरा, ‘क्रेडाई पुणे मेट्रो वूमन्स विंग’च्या सपना राठी, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे कामगार कल्याण समिती सदस्य समीर बेलवलकर, पराग पाटील, मिलिंद तलाठी, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर उपस्थित होते.
 
या वेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘बांधकाम क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची मिळकत नक्कीच वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांचा खास विचार करून अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ त्यांनी निश्चित करून घ्यायला हवा. अभियंते आणि वास्तुविशारद हे कामगारांच्याच भरवशावर मोठमोठ्या इमारती उभारत असतात. त्यामुळे या व्यक्तींशिवाय देशाची इमारत उभी राहू शकत नाही. कामगारांना लिहिता-वाचता यावे आणि कुणावरही स्वाक्षरी करण्याऐवजी अंगठा उमटवण्याची वेळ येऊ नये, यासाठीही संस्थेने पुढाकार घ्यावा.’

सुहास मर्चंट कामगारांशी बोलताना म्हणाले, ‘तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमात जे शिकलात ते इतरांनाही शिकवा. साइटवर असताना स्वतःबरोबरच सोबत काम करणाऱ्यांच्याही सुरक्षिततेसंबंधी काळजी घ्या. आपण जे काम करत आहोत ते असेच का करत आहोत, त्यामागचे कारण काय, याचा विचार करावा आणि प्रश्न विचारावे. म्हणजे तुमची प्रगती होईल. प्रश्न विचारले तरच ज्ञान वाढेल.’

अर्चना बडेरा म्हणाल्या, ‘बांधकाम क्षेत्राला कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. महिला कामगारांनाही या क्षेत्रातील संधींचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या जगण्याची गुणवत्ता वाढावी यासाठी ‘क्रेडाई’च्या वूमन्स विंगतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.’  

‘कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामुळे आमच्याकडील महिला कामगार नवनवीन कामांचे प्रशिक्षण घेऊन सतत प्रगती करत आहेत आणि नवीन काम शिकायलाही त्या कायम उत्सुक असतात,’ असा अनुभव अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितला.

समीर बेलवलकर म्हणाले, ‘यापूर्वी कुशल-क्रेडाईच्या कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण घेतलेले पुरुष कामगार पुढे प्रशिक्षक आणि काँट्रॅक्टरदेखील झाले आहेत. आता महिला कामगारही त्या वाटेवर मार्गक्रमण करू शकतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search