Next
नदीकाठचा ‘वेगळा’ देखावा...
BOI
Thursday, February 22 | 06:45 AM
15 0 0
Share this story

रिव्हरस्केप
विवान सुंदरम् या सुविख्यात कलावंताने १९९५च्या हिवाळ्याच्या सुमारास मुंबईत एका प्रदर्शनात ‘नदीकाठचा देखावा’ सादर केला होता. त्यामध्ये आकाशातून पक्ष्याला दिसतो त्याप्रमाणे नदीचा प्रवाह व वस्ती दाखवली होती. त्याने देखाव्यात दाखवलेले सारे काही नेहमीच्या ‘रिव्हर स्केच’पेक्षा खचितच निराळे होते... थोडे धक्कादायक... थोडे आकर्षक... थोडे अचंबित करणारे. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या विवान सुंदरम् यांच्या त्या कलाकृतींबद्दल...
................
विवान सुंदरम् या सुविख्यात कलावंताने १९९५च्या हिवाळ्याच्या सुमारास मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीमध्ये ‘रिव्हरस्केप’ नावाने त्याच्या तेव्हाच्या नव्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘मांडले’ होते. ‘मांडले होते’ ही कृती येथे मुद्दाम लक्षात घेण्याजोगी आहे. त्याचे कारण म्हणजे त्यामध्ये चित्रांपेक्षा कलावस्तूच जास्त होत्या आणि त्या बाजूला, कोपऱ्यात, छताला अशा सर्वत्र मांडल्या होत्या. भारतीय कलेच्या विश्वात त्याचे हे बहुधा दुसरेच मांडणी (Installation) प्रदर्शन असावे. त्यापूर्वी हुसेन यांनी मांडलेले ‘श्वेतांबरा’ हे पहिले मांडणी प्रदर्शन मानायला हवे. 

...तर विवानने या प्रदर्शनात ‘नदीकाठचा देखावा’ सादर केला होता, असे म्हणता येईल, अर्थात तो विवानच्या पद्धतीचा. त्यामध्ये आकाशातून पक्ष्याला दिसतो त्याप्रमाणे नदीचा प्रवाह व वस्ती दाखवली होती. वस्ती सोडून प्रवाह पुढे आला, की इतर काही घटक दिसतात. प्रवाहाच्या तीरावर या प्रवाहाच्या पुढे दोऱ्यांनी होडीला बांधून ठेवलेले होते. त्यात एक लहान होडके पालथे पडलेले होते. हे सारे ‘नदीकाठचा देखावा’ किंवा सरावाच्या ‘रिव्हर स्केच’पेक्षा खचितच निराळे होते... थोडे धक्कादायक... थोडे आकर्षक... थोडे अचंबित करणारे. कलाशिक्षण नुकतेच संपवलेल्या माझ्यासारख्या कला क्षेत्रातील नवोदिताला हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वपूर्ण घटना आणि आकर्षक किंवा न अनुभवलेल्या सौंदर्यदृष्टीला सामोरे जाण्याप्रमाणे होते. माध्यमे तशी नवी होती. या कलावस्तूमध्ये तेव्हा विवानने नाना माध्यमांचा वापर केला होता. त्यात कोळसा, इंजिन ऑइल, कलमखुश हस्तकागद आणि दोरखंड यांचा वापर माध्यम म्हणून करण्यात आला होता. 

‘युनायटेड किंग्डम’मधील एका संस्थेने जगभरातून चार कलावंतांना एका कलात्मक प्रकल्पासाठी एकत्रित बोलावले होते. १९९२-९३ साली ‘तीस’ नावाच्या नदीच्या संदर्भात ही एक ‘रेसिडेन्सी’ होती. ‘आर्ट रेसिडेन्सी’ म्हणजे कलावंत तेथे राहतो, त्यांना स्थानिक अनुभवांना सामोरे जाता येते, त्यातून तो तेथील प्रश्न वगैरे आपल्या कलेतून मांडतो आणि प्रदर्शित करतो. चर्चा, विचारांचे आदान-प्रदान अशा रेसिडेन्सीजमधून होत असते. हे फिरते प्रदर्शन होते. लंडन, कोलकाता आणि मुंबईत ते आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ‘आर्ट रेसिडेन्सी’ हा प्रकार आजच्या इतका सहज उपलब्ध नसावा. ही ‘यूके’तील रेसिडेन्सी सहा महिने कालावधीची होती आणि विवानच्या या कलावस्तू त्या दरम्यानच्या होत्या.

दी अदर साइड ऑफ ट्री
विवानच्या एकूणच चित्रकारीवर तेव्हा तरी दादावादी आणि विशेषत: दुशॉ यांच्या कलाकृतींचा परिणाम होता. १९७१च्या ‘आर्ट फोरम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात एक उल्लेख दुशॉच्या विचारसरणीची बाजू स्पष्ट करणारा आहे. ‘कलेमध्ये अर्थाचा किंवा अन्वयार्थाचा परमोच्च पाया हा भाषीय आहे, आकारीय नाही. ज्या आकाराच्या स्वरूपात दुशॉची कला दिसते, ते म्हणजे अर्थ नसून कलाकृतीची प्रक्रिया असते,’ असे या लेखात लिहिले आहे. दुशॉच्या कलाकृतींमध्ये एक प्रकारे द्व्यर्थी अन्वयार्थ असतो. उदाहरण म्हणून त्याची ‘कारंजे’ ही कलाकृती पाहू. ते कारंजे आहेही आणि नाहीही, अशा स्वरूपात आहे. ते एक शौचकूप आहे, कलावस्तू नाही आणि शौचकूप पण नाही अशा काही विचित्र अवस्थेत दुशॉ आपल्या कलाकृती नेतो. नकारात्मकता ही कलाकृती होते का? दुशॉप्रमाणेच, विवानच्या बऱ्याच कलावस्तूंमधून काही स्पष्ट अर्थ पुढे येतोच असे नाही. जशी कलाकृती आहे तशी ती पाहणे आपल्या हाती उरते... तो अनुभव कोणत्या शब्दांमध्ये बसवणे अवघड होते आणि दृष्टिकोन (भाषीय व आकारप्रधान) कलाकृतीबाबत ठेवला, तरी पाहणे महत्त्वाचे असतेच. मराठीत ‘वैचारिक’ किंवा संकल्पनात्मक म्हणू शकतो अशी म्हणजेच ‘कन्सेप्चुअल’ अशी एक चळवळ दृश्यकला क्षेत्रात प्रचलित आहे. विवान त्याच्याशी प्रत्यक्ष जरी जोडलेले नसले, तरी काही साधर्म्य लक्षात येते. 

या प्रदर्शनात ‘ए रिव्हर कॅरिज इट्स पास्ट’ म्हणजे ‘नदी तिचा भूतकाळ वाहवत असते’ अशा आशयाची एक कलाकृती होती. कल्पना करा, की साधारणत: एखाद्या प्राण्याच्या चेहऱ्यासारखा आकार... त्याच्या पाठीच्या कण्याचे वाटावेत असे आकार मागे जोडलेले... काही इकडे-तिकडे विखुरलेले... खालील बाजूस आपल्याकडे मिठाईवाले बर्फी ठेवतात तसल्या ट्रेमध्ये काळपट इंजिन ऑइल ठेवलेले होते. कलमखुश हस्तकागदावर जळक्या डागांनी केलेले रेखाटन आणि उमटलेल्या आकृत्या असे काहीसे होते. नदीने वाहवत आणलेला भूतकाळ यापेक्षा काय वेगळा असणार? 

टू ओल्ड बोट्स अँड ए प्लान फॉर अॅन ऑइल रिग
दुसऱ्या कोपऱ्यामध्ये छताला एक कप्पी लावली होती... त्यावरून सोडलेल्या केशरी दोरीला एक कागदी नाव टांगलेली... त्या खाली काही अंतरावर दुसरी नाव, कलमखुश हस्तकागदावर तेल, डांबर, रंग वगैरेंच्या साह्याने काळपट केलेली ही नाव. त्याखाली तेलाच्या उपशाच्या प्रकल्पावरील टॉवरचा रंगीत फोटो. भिंतीवर तेलाच्या कारखान्याच्या परिसराचा आकाशातून पाहिलेला नकाशा होता. आणखी एका शिल्पात झाडे पाडणे, त्यातून प्रदूषणाचा प्रश्न याबाबतची त्याची ‘दी अदर साइड ऑफ दी ट्री’ ही कलाकृती महत्त्वाची ठरते. या प्रदर्शनात कागदावर चारकोल व पेस्टलने चितारलेला एक टॉवर होता. आजकाल आपल्याकडे सर्वत्र टॉवरच टॉवर दिसतात. परंतु तेव्हा हे चित्र खूप खोल परिणाम करणारे होते. ‘बॉम्बे हाय’ला आपल्याकडे जसे काम चालते, तसे यातील ऑइनरीजला सुरू असते. 

मॉन्युमेंट फॉर कोल, स्टील अँड ऑइल‘कोळसा, लोखंड आणि तेल यांची स्मारके’ अशा आशयाचे एक मांडणीशिल्प होते. मोठ्या आकाराच्या हस्तकागदाची नळी केलेली. पहिल्यात खाली कोळशाची पूड ट्रेमध्ये, त्यावर कोळशाने रंगवलेली कागदी नळी. शेजारी लोखंडी नळीवर लावलेले काही कागदी आकार... एकूण नळीच होती ती एका ट्रेमध्ये उभारलेली.. त्या शेजारी बर्फीच्या ट्रेमध्ये तेल व त्यात अशी नळी... या नळीवर पुन्हा नदीचे प्रवाही चित्र.... एकूणच देखावा नदीकाठच्या प्रदूषणाची जाणीव करून देणारा.. विवानच्या कलाकृती स्वीकारणारा, त्यावर टीका करणारा प्रेक्षकवर्ग आहेच. काही आरोपही कलावंत वैचारिक बैठकीतून त्याच्यावर करतात.

विवान सुंदरम्विवान हा सुप्रसिद्ध चित्रकर्ती अमृता शेरगिल यांचा भाचा. विवानचा जन्म १९४३चा, सिमल्याचा. ‘फाइन आर्ट’मध्ये बडोदा विद्यापीठातून पदवी घेऊन कॉमनवेल्थ स्कॉलरशिपवर पुढे लंडनच्या स्लेड स्कूलमध्ये कलाशिक्षण घेतले. अनेक प्रदर्शने, कलावंत म्हणून देश-विदेशात प्रवास, कलाविषयक काही उपक्रम त्याने केले आहेत. त्याच्या व त्याच्या मित्रांवरील अरुण खोपकर यांची ‘फिगर्स ऑफ थॉट’ ही फिल्म पुन:पुन्हा पाहण्यात आजही नावीन्य वाटते. 

सूट स्टफ इन चिमणीया प्रदर्शनात भिंतीवर एक कागदी चित्र होते आणि त्यावर नदी आणि आजूबाजूच्या गोष्टी वरून पाहिल्याप्रमाणे रेखाटल्या होत्या. त्या कागदाला जोडून भिंतीला नव्वद अंशात एक कागदी गुंडाळी लावली होती. काळवंडलेली ही भेंडोळी लक्ष वेधून घेत होती. कलाकृतीचे नाव होते ‘सूट स्टफ इन चिमणी’ म्हणजेच काळवंडलेली, काजळी साचलेली चिमणी... एखाद्या पक्ष्याच्या नजरेतून पाहिलेले हे औद्योगिक चिमणीचे तोंड आणि त्याखालचा ‘नदीकाठचा देखावा’... मी गॅलरीत पुन्हा पुन्हा जाऊन पाहिला होता.. माझ्या त्यापूर्वीच्या ‘नदीकाठचा देखावा’ याबद्दलच्या पुणेरी पूर्वकल्पनांना या नदीच्या प्रवाहाने आपल्या भूतकाळात गिळून टाकले होते.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil Hambir About 299 Days ago
एका पक्ष्याच्या नजरेतून... विवान सुंदरम यांना बहुधा नदीकाठावरचं भविष्यातील प्रदुषणाचा संकेत असावा,असे वाटते....
1
0

Select Language
Share Link