Next
एसटी महामंडळातील सवलतींच्या स्मार्टकार्डसाठी मुदतवाढ
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावतेंची माहिती
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्टकार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे; पण बऱ्याच सवलतधारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिक, तसेच दिव्यांग आदी सवलतधारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्टकार्ड घेण्यास एक जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी येथे नुकतेच जाहीर केले.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने स्मार्टकार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सवलतधारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्डे देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी आणि इतर सवलतधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे, तर इतर सवलतधारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे. 

राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना या संदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र एक जानेवारी २०२०पासून सवलतीसाठी स्मार्टकार्ड अनिवार्य असेल. सर्व सवलतधारकांनी ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्ट कार्डे काढून घेण्याचे आवाहन रावते यांनी केले आहे.

राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक हे विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. या शिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळातर्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्टकार्ड घेण्यासाठी एक जानेवारी २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्टकार्डे काढली आहेत त्यांना स्मार्टकार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search