Next
बखर राष्ट्रगीताची...
BOI
Friday, October 27 | 07:00 PM
15 0 0
Share this story

‘एखादी व्यक्ती राष्ट्रगीतावेळी उभी राहिली नाही, म्हणून तिचे देशप्रेम कमी आहे, असे म्हणता येत नाही,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावायचे की नाही, ते लावले गेले तर उभे राहणे बंधनकारक आहे की नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, आपले राष्ट्रगीत, त्याचा आदर राखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्याशी निगडित इतिहास, अन्य काही देशांतील परिस्थिती या गोष्टींचा घेतलेला हा आढावा. 
.................
राष्ट्रगीत सुरू झाले की एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. आपल्याही तोंडून नकळतपणे ‘जन गण मन’ हे शब्द बाहेर पडू लागतात. राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत हे राष्ट्राभिमानाचे प्रतीक असते. त्याचा आदर राखणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले सर्वांचेच नैतिक कर्तव्य आहे. 
प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत हे त्या देशाचे ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वैभव दर्शविणारे असते. त्यातून देशाभिमान व्यक्त होत असतो. समूहस्वरात राष्ट्रगीत म्हणत असताना आपसूकच देशप्रेमाची एक वेगळी भावना नकळत जागृत होत असते. बहुतांश देशांच्या राष्ट्रगीताची धून म्हणजे स्फूर्तिदायक तालवाद्यांची रचना असते आणि त्यातील शब्द हे त्या देशाचा स्वातंत्र्यसंघर्ष, नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, परंपरा यांच्याविषयीच्या अभिमानाने भारलेले असतात. 

‘जन गण मन’ हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले गीत १६ डिसेंबर १९११ रोजी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम गायले गेले. ते भारताचे राष्ट्रगीत असल्याची अधिकृत घोषणा २४ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. १९६२च्या भारत चीन युद्धानंतर चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याबाबत सरकारी आदेश काढण्यात आला होता; मात्र १९७५नंतर चित्रपटगृह मालकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही पद्धत बंद पडली. 

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना
राष्ट्रगीत कोणत्या प्रसंगी म्हणायचे अथवा वाद्यवृंदावर वाजवायचे, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ पाळावयाची आचारसंहिता याबाबतचे नियम केंद्रीय गृह मंत्रालयाने वेळोवेळी जारी केले आहेत. राष्ट्रीय सलामी, संचलन, औपचारिक सरकारी समारंभात, राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या आगमनावेळी, तसेच निर्गमनानंतर, राष्ट्रपतींच्या आकाशवाणीवरील संदेशापूर्वी आणि नंतर पूर्ण राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन या नियमावलीत आहे. ज्या समारंभात राष्ट्रगीत वाजवावे असा सरकारी आदेश असेल, त्या समारंभांत राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक असते; मात्र ते सर्व समारंभांसाठी बंधनकारक नाही. कोणकोणत्या समारंभांत राष्ट्रगीत म्हणावे, याची परिपूर्ण यादी देणे शक्य नाही. परंतु, राष्ट्रगीताचा योग्य सन्मान राखून त्याबाबतच्या नियमांचे पालन करून राष्ट्रगीत म्हणण्यास काही हरकत नाही, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रगीत गायले जात असताना उपस्थितांनी ताठ उभे राहावे; मात्र चित्रपटात अथवा माहितीपटात राष्ट्रगीत कथेचा भाग म्हणून आल्यास त्या वेळी प्रेक्षकांनी उभे राहणे अपेक्षित नाही. 

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जावे, अशी सूचना २०१६च्या जून महिन्यात गृह मंत्रालयाने जारी केली. त्यावर नोव्हेंबर २०१६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. राष्ट्रगीत सुरू असताना सर्व प्रेक्षकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने याबाबतच्या आदेशात म्हटले होते. २०१७च्या एप्रिल महिन्यात न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशात सुधारणा करून नवीन आदेश जारी केला. या नवीन आदेशानुसार दिव्यांग व्यक्ती, पार्किन्सन आजार असलेल्या व्यक्ती, कुष्ठरोगातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, मल्टिपल स्क्लेरॉसिस असलेल्या व्यक्ती आणि स्नायूंचा विकार असलेल्या व्यक्ती यांना राष्ट्रगीतावेळी उभे राहण्याची सक्ती नाही. 

अन्य देशांतील स्थिती
अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रत्येक सामन्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जावे आणि त्या वेळी मैदानावरील सर्व खेळाडूंनी राष्ट्रध्वजाकडे तोंड करून, हेल्मेट डाव्या हातात धरून ताठ उभे राहावे, असा नियम त्या क्रीडा संघटनेच्या नियमावलीत आहे. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सावधान स्थितीत उभे राहावे, उजवा हात आपल्या हृदयावर ठेवावा, आदी नियम अमेरिकेच्या राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर अन्य देशांच्या राष्ट्रगीताचा सन्मान कसा राखावा हेदेखील घटनेत नमूद करण्यात आले आहे; मात्र राष्ट्रगीतावेळी उभे न राहिल्यास नागरिकांना कोणतीही शिक्षा केली जात नाही.  

मेक्सिकोमध्ये सर्व शाळा आणि विद्यापीठांमध्ये दर सोमवारी सकाळी, तसेच शालेय सत्र सुरू होताना आणि संपताना राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक आहे. इटलीमध्ये क्रीडा स्पर्धा, सरकारी समारंभ व राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीतील सार्वजनिक सभा या कार्यक्रमांवेळी राष्ट्रगीत वाजवण्याची पद्धत आहे. राष्ट्रगीत सुरू असताना नागरिकांनी उभे राहून राष्ट्रगीताप्रति आदर दाखवणे आवश्यक असल्याचा नियम तिथे आहे.थायलंडमधे दररोज सकाळी आठ आणि सायंकाळी सहा वाजता दूरचित्रवाणीवर राष्ट्रगीत लावले जाते. सर्व विद्यार्थी सकाळी आठ वाजता एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हणतात. सरकारी कार्यालयांमध्ये, तसेच चित्रपटगृहांतही दररोज राष्ट्रगीत वाजवले जाते; मात्र या सर्वांसाठी कोणताही सरकारी नियम अस्तित्वात नाही. नागरिक स्वयंप्रेरणेने या गोष्टी करतात.

जगातल्या बहुतेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी व सणाच्या वेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या देशाचे राष्ट्रगीत संबंधित खेळाडू पोडियमवर असताना वाजवले जाते. काही देशांत दररोज शाळा सुरू होताना राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या देशात भिन्न संस्कृती, भाषा बोलणारे नागरिक आहेत, त्या देशांच्या राष्ट्रगीतात भिन्न भाषांचा समावेश आहे. 

राष्ट्रगीताचा आदर
प्रातिनिधिक फोटो२०११मध्ये एका क्रीडा स्पर्धेदरम्यान राष्ट्रगीतातील शब्द विसरल्याबद्दल एका अमेरिकन नागरिकाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. शाळेत राष्ट्रगीतावेळी उभे न राहणारे व राष्ट्रगीत न म्हणणारे शिक्षक आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असा अध्यादेश २००३ मध्ये टोकियो प्रशासनाने काढला होता. अशा सुमारे पाचशे शिक्षकांना प्रशासनाने शिक्षा सुनावली होती. मेक्सिकोमध्ये राष्ट्रगीतातील शब्दांच्या चुकीच्या उच्चारणासाठी सरकारने एका महिलेला दंड केला होता. २००३मध्ये ऑस्ट्रेलियात डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत एका सामन्याच्या सुरुवातीला स्पेनचे चुकीचे राष्ट्रगीत वाजवल्याबद्दल आयोजकांनी माफी मागावी, अशी मागणी स्पेनने केली होती.

अथेन्समध्ये ग्रीस व चीनच्या संघांदरम्यान फुटबॉलचा सामना होणार होता. सामना सुरू होण्याआधी एक धून सुरू झाली. ते चीनचे राष्ट्रगीत असल्याचे समजून प्रेक्षक शांततेत उभे राहिले आणि ती धून हे ग्रीसचे राष्ट्रगीत असल्याचे समजून चीनचे खेळाडू उभे राहिले. ती धून संपल्यानंतर समजले, की ती एका टूथपेस्टची जाहिरात होती. यातील गमतीचा भाग सोडला, तरी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रगीतालाही सन्मान देण्याची वृत्ती महत्त्वाची असल्याचे यावरून लक्षात येते. 

असाच आणखी एक किस्सा मध्यंतरी वाचनात आला होता. त्याची सत्यासत्यता किंवा नेमके संदर्भ माहिती नाहीत; पण राष्ट्रगीताचा आदर कसा असावा, याचा आदर्श त्यातून नक्कीच घेण्यासारखा आहे. एका देशातील रेस्टॉरंटमध्ये दोन ग्राहकांत कुठल्यातरी कारणातून वादाची ठिणगी उडते आणि त्याचे मोठ्या भांडणात रूपांतर होते. मारामारीपर्यंत मजल जाते. उपस्थित सर्व जण त्यात मध्यस्थी करायचा प्रयत्न करत असतात; मात्र ते फोल ठरतात. शेवटी त्या हॉटेलचा मॅनेजर म्युझिक सिस्टीमवर त्या देशाचे राष्ट्रगीत लावतो. ते ऐकताच या दोघांसह सर्वच जण स्तब्ध उभे राहतात. राष्ट्रगीत संपल्या संपल्या सगळे जण त्या दोघांना पकडून वेगळे करतात आणि मारामारी थांबते. राष्ट्रगीताचा आदर करण्याची अशी वृत्ती प्रत्येक माणसाच्या अंगी बाणणे गरजेचे आहे. तसे झाले तर सक्तीसंदर्भात सध्या सुरू असलेल्या चर्चांचे कारणच नष्ट होईल.

(संकलन : सुरेखा जोशी)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link