Next
दावणगिरीमध्ये फेरफटका...
BOI
Wednesday, July 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

दुर्गांबिका मंदिर
तुम्ही दावणगिरी बेणे डोसा नक्की खाल्ला असेल किंवा असे डोसे मिळणाऱ्या हातगाड्या तरी नक्कीच पाहिल्या असतील. ...तर या डोश्यांमुळे ज्याचे नाव सर्वतोमुखी झाले तो दावणगिरी ऊर्फ दावणगेरे या कर्नाटकातील जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. ‘करू या देशाटन’मध्ये आज फेरफटका दावणगिरीमध्ये...
...........
दावणगिरी बेणे डोसाडोसे, इडली, उत्तप्पे ही दावणगिरीची खासियत. दावणगिरी बेणे डोसा तुम्ही खाल्ला असेल किंवा त्याचे नाव तरी नक्की ऐकले/वाचले असेल. बेणे म्हणजे लोणी. डोश्यावर लोण्याचा गोळा असतो, म्हणून तो बेणे डोसा. या डोश्यांमुळे दावणगिरीचे नाव सर्वतोमुखी व्हायला मदत झाली. ते दावणगेरे या नावानेही ओळखले जाते.

दावणगेरेला एक समृद्ध इतिहास आहे. तो चालुक्य काळातील नोलंबावाडी प्रांताचा भाग होता. चालुक्यांपासून पंड्या, होयसळ आणि विजयनगर राजे, बहामनी सुलतान यांच्याकडे या भागाची सत्ता येत गेली. दावणगेरे काही काळ पलियानगर नायकांच्या नियंत्रणाखाली होते. नंतर हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी व नंतर म्हैसूर महाराजांनी ते हाती घेतले. हैदरअलीने हा भाग ताब्यात आल्यावर आपोजीराम नावाच्या एका मराठा सरदाराला जहागिरी म्हणून दिला. आपोजीरामने येथील व्यापारास चालना दिली.

कुंदवाडा केरेहा भाग पूर्वी चित्रदुर्ग जिल्ह्यात होता. आता स्वतंत्र दावणगिरी जिल्हा अस्तित्वात आला आहे. दावणगिरी हे कर्नाटकातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. दावणगिरीला पूर्वी कर्नाटकचे मँचेस्टर म्हटले जायचे. कारण तेथे कापडविषयक उद्योग बरेच होते. आता तेथे शेतीविषयक व्यापार चालतो. कुंदवाडा केरे हे दावणगिरीमधील एक सहलीचे ठिकाण आहे. तेथे अत्यंत सुंदर असा तलाव आहे. तसेच येथील रोमन कॅथलिक चर्चही बघण्यासारखे आहे. चन्नगिरी रंगप्पा क्लॉक टॉवर हेही येथील आकर्षण. जुन्या गावातील शिवाजीनगर भागात दोनशे वर्षांपूर्वीचे दुर्गांबिका मंदिर आहे.

हरिहराचे मंदिरहरिहर : हे औद्योगिक व धार्मिक, तसेच पर्यटन केंद्र आहे. प्राचीन काळी हा भाग गुहारण्य या नावाने ओळखला जात असे. पौराणिक कथेनुसार गुहासुर नावाचा दैत्य तुंगभद्रेच्या काठावर राहत होता. भगवान ब्रह्माकडून त्याला असे वरदान होते, की तो ब्रह्मा, विष्णू किंवा शिव यांच्यासह अन्य कोणत्याही देवदेवतांच्या हातून मरणार नाही. हे वरदान वापरून या राक्षसाने लोकांना आणि अगदी देवदेवतांनाही त्रास देणे सुरु केले. त्याच्या कृत्याचा आणि त्याच्या शक्तीचा सामना करण्यास सर्व जण असमर्थ ठरले. त्रस्त देवता मदतीसाठी विष्णू (हरी) आणि शिव (हरला) यांच्याकडे गेले. अखेर विष्णू आणि शिव (हरी व हर) एकत्र येऊन ते हरिहरेश्वर झाले. त्यांनी भयंकर लढाई करून राक्षसाचा वध केला.

तेव्हापासून हरिहर हे नाव रूढ झाले. हरिहर येथील वैशिष्ट्य म्हणजे १२व्या शतकात तुंगभद्रेच्या काठावर बांधलेले हरिहराचे मंदिर. होयसळ घराण्यातील राजा वीर नरसिंह दुसरा याचा सेनापती पोलवा याने हे मंदिर बांधले. मंदिराजवळ अनेक शिलालेख आहेत. १२६८मध्ये राजा नरसिंह तृतीय याचा सेनापती सोम्म याने मंदिरात काही सुधारणा केल्या. शिव व विष्णू यांचे म्हणजे शैव व वैष्णव पंथाचा संगम दर्शविणारे हे मंदिर आहे. हे मंदिर होयसळ पद्धतीने बांधलेले आहे. मंडपाची बाहेरील भिंत पॅराफिटसारखी बांधलेली असून, अर्धे खांब दिसतात व ते छताच्या बाहेरील प्रोजेक्शन असलेल्या बाजूंना आधार देतात. याच्या छताखाली असणारे, तसेच खांबावरील नक्षीकाम खूप सुंदर व नाजूक आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अत्यंत सुबकतेने कोरीव काम केलेले असून, आतील छतावर सुबक नक्षीकाम केले आहे.

सभामंडपसभामंडपाला सुशोभित करण्यासाठी कमळासारखी कलात्मक सजावट केलेली आहे. मंदिराचे खांब कोरीव काम करता येण्यासारख्या ‘सोप स्टोन’मध्ये घडविले आहेत. मंदिरावरील मूळ शिखर नष्ट झाले आहे. ते आता विटांच्या साह्याने तयार करण्यात आले आहे. मंदिर परिसरात जतन केलेले अनेक जुने कन्नड शिलालेख पाहण्यास मिळतात.

येथे तुंगभद्रेच्या काठावर ११ तीर्थे आहेत. ती अशी – ब्रह्मतीर्थ, भार्गवतीर्थ, नृसिंहतीर्थ, वह्नितीर्थ, गालव तीर्थ, चक्रतीर्थ, रुद्रपाद तीर्थ, पापनाशन तीर्थ, पिशाचमोचन, ऋणमोचन आणि वटच्छाया तीर्थ.

हरिहर येथे किर्लोस्करांचा कारखाना होता. तो सन २०००मध्ये बंद पडला. आदित्य बिर्ला यांची ग्रासिम ही कंपनी, तसेच शमनूर साखर व इतर काही उद्योग येथे आहेत. हरिहर येथे खासगी विमानतळ आहे.

संथेबेन्नूरसंथेबेन्नूर : अतिशय सुंदर अशी पुष्करिणी येथे बघायला मिळते. केगाप्पा नायक याचा मुलगा हिरिया हनुमंतअप्पा नायक याने विजापूरच्या सुलतानांविरुद्ध जिंकलेल्या लढाईप्रीत्यर्थ ही पुष्करिणी इसवी सन १६००मध्ये बांधण्यात आली. देवाचा तरंगता उत्सव येथे साजरा केला जात असे. २४० फूट लांब, २५०फूट रुंद आणि ३० फूट खोल असा हा बांधीव तलाव आहे. मोठ्या तलावाच्या (हौद) पायऱ्या ग्रॅनाइट (कणाश्म) खडकामध्ये चिकटविल्या आहेत. आठ दिशांपैकी एकूण सहाच बुरुज शिल्लक राहिले आहेत. सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे येथील अलंकारिक मंडप. त्याचे जोते चौकोनी असून, कमानीतून प्रवेश केल्यावर पहिल्या टप्प्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पहिला टप्पा हा मांडव खुला असून, त्यात सर्व बाजूंनी सडपातळ खांब आहेत. खांबामध्ये कठडा आहे. दुसरा टप्पाही पहिल्याप्रमाणेच आहे. वळचणीच्या नेटक्या आधारावर पडदी आणि मिनार आहेत, असे भासते. मधल्या जागेत एखाद्या खरबुजाच्या आकाराची पर्णाकृती कोरली आहे. १७व्या शतकात विजापूर सुलतानाचा सरदार रणदुल्लाखानाने संथेबेन्नूरवर हल्ला केला, त्या वेळी जवळच त्यांनी मुसाफिरखाना बांधला. जवळच मशीद आणि राम मंदिर जुळ्या भावंडांप्रमाणे नांदत आहेत. ४०० वर्षांपूर्वीची ही पुष्करिणी अद्यापही भक्कम आहे. पुरातत्त्व विभागाने याची उत्तम देखभाल ठेवली आहे. हे ठिकाण पर्यटकांनी चुकवू नये असे आहे.

कल्लेश्वर मंदिर

बगली : हे ठिकाण हरपनहळ्ळी गावाजवळ असून, श्री शंकराच्या कल्लेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या देवळाचे काम राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवटींत पूर्ण झाले. चालुक्य राजा तैलाप्पा (इ. स. ९८७) याने हे बांधकाम सुरू केले. राष्ट्रकूट राजवटीमध्ये याचे शिखर व इतर कामे झाली. मंदिराचा सभामंडप आकर्षक आहे. त्यात भरपूर नक्षिकाम बघण्यास मिळते. चालुक्य काळातील शिव, उमा-महेश्वर, श्री गणेश, कार्तिकेय, सूर्य, अनंतशयन (विष्णू), सरस्वती, महिषासुर मर्दिनी यांची शिल्पे देवळात आहेत. देवळाभोवती आठ छोटी मंदिरे आहेत. 

कडालबालकडालबाल : हे ठिकाण दावणगिरीजवळच असून, ते कडलाबाला म्हणूनही ओळखले जाते. हे नाव दोन शब्दांमधून आले आहे. कन्नड भाषेत कडलू म्हणजे समुद्र आणि बाला म्हणजे मूल. या नावाचा संपूर्ण अर्थ ‘समुद्राचा मुलगा’ असा होतो. विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत चित्रगळच्या पलायगरा नायकांनी या शहरावर राज्य केले. येथे अंजनेय देवस्थान आहे. असे मानले जाते, की हनुमान, भीमा आणि माधव यांनी येथे तीन अवतार घेतले आहेत. चित्रदुर्गमधील तिमण्णा नायक यांनी हे पवित्र, ऐतिहासिक मंदिर बांधले आहे. या सुंदर मंदिरासह येथे एक तलाव आहे. तो भक्तांना शांत आणि प्रसन्न वातावरण देतो.

येथे माधवाचार्यांचा जन्मदिवस म्हणजेच माधवनवमी हा सर्वांत लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम आहे. त्या वेळी लाखो लोक मेळ्यामध्ये सामील होतात. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हनुमान रथोत्सव आहे. विविध ऐतिहासिक नाटकांमधील गाणी, नृत्य, नाटके व कठपुतळ्यांचे कार्यक्रम या वेळी सादर केले जातात.

उचंगीदुर्ग : हरपनहळ्ळी तालुक्यात वसलेले  उचंगीदुर्ग हे दावणगिरीपासून तीस किलोमीटरवर आहे आणि ते ऐतिहासिक दृष्टीने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पल्लव, कदंब यांच्यापासून विजयनगर साम्राज्यापर्यंत अनेक राजवटींची सुरुवात झाली आहे. असे म्हटले जाते, की पल्लव व कदंब यांच्यातील लढायांदरम्यान चौथ्या शतकात एका भयानक लढाई झाली. त्याचा उल्लेख अनाजीजवळील शिलालेखात आढळतो. आता, उचंगीदुर्ग हे पावसाच्या पाण्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात मानवी अतिक्रमण झाल्यामुळे बाधित झाले आहे.

अनेकोंदाअनेकोंदा : दावणगिरी-जगलूर महामार्गावर दावणगिरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले हे आणखी एक ऐतिहासिक ठिकाण आहे. असे सांगितले जाते, की येथे बेलूरच्या सैन्यातील हत्ती ठेवले जात. या भागावर चालुक्य, पंड्या आणि होयसळ राजांनी राज्य केले आहे. येथे त्यांच्या राज्याचे पुरावे सिद्ध करणारे या राजवंशांचे शिलालेख आहेत.

या लेखासाठी काही तांत्रिक, पारिभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी साताऱ्याचे आर्किटेक्ट शौनक कदम यांचे साह्य लाभले.
कसे जाल?

दावणगिरी, हरिहर ही दोन्ही ठिकाणे मिरज-बेंगळुरू मार्गावर आहेत. रेल्वेनेही जोडलेली आहेत. हुबळी ते दावणगिरी हे अंतर १५२ किलोमीटर आहे, तर बेंगळुरू ते दावणगिरी हे अंतर २६२ किलोमीटर आहे. दावणगिरी आणि हरिहर येथे राहण्याची उत्तम सोय आहे. जाण्यासाठी चांगला कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. जवळचा विमानतळ हुबळी. हावेरी, हरिहर, हनगल, दावणगिरी, चित्रदुर्ग अशी चालुक्य काळातील स्थापत्यकलेची ठिकाणे पाहण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. (जाण्या-येण्याचा कालावधी त्यापेक्षा वेगळा..) याबरोबरच हळेबीड व बेलूर ही ठिकाणेही पाहता येतील.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(दावणगिरीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashank Chothe About 28 Days ago
सर, आपले सर्वच लेख सविस्तर माहितीपू्र्ण असतात. आपले लेख वाचत असताना प्रत्यक्ष ते स्थान पहात असल्यासारखे वाटते.
0
0
Milind Lad About 219 Days ago
खुपच सविस्तर माहिती. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर तुमचे लेख फार उपयोगी पडतील. सुंदर ! अप्रतिम ! छान लेख!!!
1
0

Select Language
Share Link